प्रेम ही काय फक्त भावना आहे , की त्याची काही व्याख्या ही असते ? डॉ. एम स्कॉट पेक ह्या मानसशास्त्र तज्ञाने त्याच्या “द रोड लेस ट्रॅवेल्ड “ ह्या प्रसिद्ध पुस्तकात ही व्याख्या सांगितली आहे. त्याच्यामते , प्रेम ही फक्त एक भावना नसून , ज्यावर हे प्रेम केले जाते ,आणि जो हे प्रेम करतो, त्या दोघांचीही आध्यात्मिक वाढ करणारी कृती असते . ह्यामध्ये भावेनेपेक्षा कृतीला अधिक महत्व दिले गेले आहे. प्रेमाला एका भावनेपुरते मर्यादित ठेवणे, हे समुद्रात वरवर पोहण्यासारखे आहे , जेव्हा तुम्ही त्याच्या खोल तळाशी जाऊन अनुभव घेता , तेव्हा तुम्हाला अनेक आश्चर्यकारक गोष्टींचा शोध लागतो आणि अनेक नवनवीन अनुभव येतात. आईचे बाळावरचे प्रेम, नुसता विचार जरी केला तरी आनंदाचा अनुभव येतो. हीच आई जेव्हा काही योग्य संस्कार देण्यासाठी बाळाला मारताना दिसते, तिची ती कृती काय प्रेम नसते ? पण बाळाची योग्य सर्वांगीण वाढ होण्यासाठी तिला तसे करावे लागते, हे आपण समजून घेतले पाहिजे.
आपण ह्या जगात सर्वांवर प्रेम करीत असतो आणि केले पाहिजे , ह्यात काही दुमत होऊच शकत नाही . आपले कुटुंब,आपला समाज,आपला देश, आपली नोकरी, आपला निसर्ग अश्या विविध गोष्टीवर आपण प्रेम करत असतो पण बरेचदा स्वतःवर कधी कोणी प्रेम करतांना दिसत नाही.ह्या संपूर्ण विश्वात सर्वात महत्वाची कोणती व्यक्ती असेल , ज्यावर आपण निरंतर प्रेम केले पाहिजे , ती कोणी अन्य नसून आपण स्वतः आहोत , हे नक्की जाणून घेतले पाहिजे.
मग स्वतःवर प्रेम कसे करायचे, तसे खूप सोपे आणि करायले गेले तर तितकेच कठीण आहे .
१ : स्वतः ला वेळ देऊन : रोज नियमितपणे स्वतःला एक नियोजित वेळ द्या, त्याला “मी टाइम “ म्हणा , तेव्हा तुम्ही फक्त तुमचेच रहा, कोणाचेही नाही आणि तुम्हाला जे मनापासून आवडते , तेच करा
२ : स्वतः शी संवाद साधून : रोज स्वतःशीच नियमितपणे बोला, मी ह्या भूतलावर काय करतोय, परमेश्वर माझ्याकडून कोणते कार्य करवून घेण्याचा प्रयत्न करतो आहे, माझा आध्यात्मिक मार्गावर प्रवास कोठवर आला, असे अनेक प्रश्न तुम्ही तुम्हालाच विचारू शकता.
३ : स्वतःच्या गरजा पूर्ण करून : स्वतःच्या मूलभूत शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक गरजा ओळखा आणि त्या प्रामाणिकपणे पूर्ण करा. रोज सात तास झोप, एक तास व्यायाम, २-३ वेळा वेळेवर जेवण, भरपूर पाणी, सलाद आणि फळे अश्या किमान गरजा तरी पूर्ण करा .
४ : स्वतःपुरते गरजेनुरूप मौनव्रत ठेऊन : दैनंदिन जीवनात आपण बऱ्याच वेळा उगीचच बोलत असतो आणि त्यामुळेच आपल्याला अनेक त्रास होत असतात. जर आपण समयोचित मौनव्रत ठेऊ शकलो , तर आपल्याला अनेक दुःखापासून मुक्ती मिळते , असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंतांनी व्यक्त केले आहे . मौनात ताकद असते,त्या ताकदीचा अवश्य अनुभव घ्या.
असे जर आपण वागू शकलो तर आपण आपल्या वर प्रेम करतो आहे असे समजावे. असे केल्याने आपली आध्यात्मिक प्रगती तर होतेच , शिवाय आपल्याला आपल्या जीवनात सुख ,समाधान आणि आनंद मिळत राहतो . पाहूया का मग आपण सर्वांनी , असा प्रयत्न करून एकदातरी ?