Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

ड्रॉईंग शीट

हेमंत नाईक जुलै 9, 2026 1 minute read
0
1001093877.jpg
 
 *”ड्रॉईंग इज द लँग्वेज ऑफ इंजिनिअर्स”*
     असे आम्हाला इंजिनीरिंग ड्रॉईंगचे महत्व सांगताना इंजिनीअरिंग असताना मनावर बिबवले गेले होते. पहिल्यावर्षी हा विषय असायचा..ड्रॉईंग शीटवर पूर्णत्वाची सही देण्यासाठी काही शिक्षक दयाळू तर काही अत्यन्त खडूस असायचेत.
ऍप्रॉन आणि स्थेथोस्कोप गळ्यात असला की मेडिकल स्टुडन्ट आहे हे कळायचं तसच हातात मिनी ड्राफ्टर आणि शुभ्र पांढऱ्या शीटचीं मोठी पुंगळी ही आमच्यावेळी अभियंताची ओळख होती. हल्ली ड्रॉईंग शिट्स देखील ऑटोकॅडमुळे संगणकाच्या युगात  नामशेष होण्याच्या मार्गांवर आहे. असो.
खुप दिवसांनी मला पांढऱ्या शुभ्र गुळगुळीत ड्रॉईंग  शिटसची मला आठवण झाली.  आज  तिचीच कथा लिहितोय .. तिच्याच शब्दात,
    हो, मी ड्रॉईंगशीट बोलतेय,
       ” मी त्यावेळी  बाबूच्या रूपात वनात मस्त धुंदीत  होते जमिनीतून अन्न आणि भरपूर सुर्यप्रकाश आणि वाऱ्यावर लहरणे असे एकदम मस्त जीवन होते ते.
        दिवस सुखाचे लवकर संपतात… एकदिवस अचानक माझे जमिनीशी नातं तोडले गेले आणि माझे एक कोरडे,  शुष्क आयुष्य सुरु झाले.अनेक आघात आणि प्रक्रिया होऊन शेवटी माझे रूपांतर पांढऱ्या शुभ्रशीट मध्ये झाले हिरवारंग पूर्ण बदलला होता. मजल दरमजलं  करत मला लक्ष्मी स्टोअर्स नावाच्या भंडारात माझ्या असंख्य बहिणीसोबत एका कप्प्यात ठेवण्यात आले. माझ्या या रुपाचे “ड्रॉईंग शीट” असे नवीन नामकरण झाले होते.
       एक स्मार्ट मुलगा त्या दिवशी आला आणि माझी मागणी करताच मला गुंडाळून त्याचे हवाली झाले. आज पासून तो माझा मालक झाला होता. COEP च्या एका मोठया हॉल मध्ये मला बोर्डवर पसरवून चारी कोपऱ्यात घट्ट पट्ट्या लावून काटकोनकृती साहित्याने तो माझ्यावर हळुवार पणे पेन्सिलने उभ्या आडव्या रेषा मारत होता.
        
        अधून मधून एक चश्मेवाले  गृहस्थ कारण नसताना उगाच बिचाऱ्यावर खेकसत होते.
       “हो सर, सर्व खोडतो पुन्हा सर्व दुरुस्त करतो “
         तो निमूटपणे बोलणे ऐकून घेत होता.मी शुभ्र राहावी म्हणून रुमाल व ट्रेसिंग पेपर ठेवून तो काळजीपूर्वक काम करत होता.
    ” नीट ड्रॉईंग कर…शीट काळी झाली तर फाडून टाकील.”
     अस सज्जड दम देणारे ते गृहस्थ मला खडूस वाटले. असं विचित्र वागूनही तो त्यांना आदराने सर.. सर म्हणून संबोधत असताना पाहून मला आश्चर्य वाटत होते.
       पांढऱ्या रबराने माझी अधून मधून सफाई करत माझेवर रेखाटणे सुरु होते अधून मधून ती सर नामक व्यक्ती माझ्या धन्याची उलट तपासणी करून त्याला रडवून सोडत होती. मला खूप दया येत होती बिचाऱ्याची. 
      असे खडतर दहाबारा दिवस पार पडले आणि एकदिवस सरांच्या केबिन मध्ये मला नेण्यात आले. टेबलावर ठेवून ते माझ्याकडे डोळे फाडून बघत होते, अनेक ठिकाणी बोट दाखवून माझ्या धन्याच्या अकलेचा पंचनामाही करत होते. सर्व बरोबर अचूक असले तरी धनी फक्त “येस सर” हे दोनच शब्द उच्चारत होते.
        
       शेवटी सरांनी खिशातून पेन काढला करू की नको अशा विचारात शेवटी इंग्रजी अक्षरांत “सी” लिहून खाली गिचमीड अक्षरांत सही केली. त्याच्यावर आज दैव प्रसन्न झाले होते.
     “थँक्यू सर”, म्हणत तो केबिन बाहेर आला त्याचा आनंद चेहऱ्यावर लपत नव्हता. जणू गुलबकावालीच फुलांची प्राप्ती झाली होती त्याला. त्याच्या साठी हा मोठ्या विजयाचा आणि आनंदाचा क्षण होता केबिनबाहेर उभे असलेले त्याचे मित्र त्याचा हेवा करत होते कारण त्या केबिन मधल्या त्या क्रूर माणसाने बऱ्याच जणांच्या शीटस अगदी मधोमध फाडून त्यांचा बळी दिला होता. 
        त्या दिवसापासून माझी डिमांड वाढली धन्याच्या एका मित्रापासून दुसऱ्याकडे रोज रवानगी होऊ लागली.
        कुणी काचेवर ठेवून खाली दिवा लावून त्यांच्या शीटवर माझ्यावर रेखाटलेली आकृती हुबेहूब  तशीच उतरवू लागले.
        “जिटी मारू नको”,  असे  सांगूनही, मित्र दुर्लक्ष करून सर्रास ग्लास ट्रेसिंग करत होते. एकाने तर सरांची स्प्रिंग सारखी वाटणारी सही देखील रेखाटली,  त्याच उद्या ते सर काय करतील,  याचीं मला चिंता वाटू लागली पण मुकी असल्याने,  “अरे बाबा ती स्प्रिंग नाही सरांची सही आहे… खोडून टाक नाहीतर तुझी उद्या बिन पाण्याने होईल. ” असं मी बोलुही शकत नव्हते. 
        माझ्या सारख्या अनेक शीट एकत्रित करून सबमिशनचे मिशन अखेर पूर्ण झाले धन्याने सुटकेचा श्वास सोडला होता. मला कपाटात जपून ठेवून तेथे मला मानाचे स्थान होते.
         शेवटच्या प्रॅक्टिकल परीक्षेच्या वेळी माझ्यावर काढलेल्या आकृतीवर प्रश्न विचारल्यावर  माझे काम पूर्ण झाले होते. हॉस्टेलवर आल्यावर माझ्या फाईलची रवानगी  कॉटखाली झाली. कुणीही आता माझ्याकडे ढुंकूनही बघत नव्हते. गरज सरल्यावर सर्वांची होते अगदी तशीच अवस्था माझी झाली होती .  
       तीनचार महिने उलटून गेली आता माझ्यावर धूळ आणि जळमट खूप झाली होती.  कॉलेजच्या जी.एस. च्या निवडणुकीचे वेळी पोस्टर रंगावण्यासाठी माझ्या दुसऱ्या कोऱ्या बाजूचा वापर केला गेला.  मोठ्या दिमाखात  कॉलेजच्या गेटजवळ मला विराजित केले गेले. येणारे जाणारे मला निरखत होते गालातल्या गालात हसत होते काय लिहिले होते माझ्यावर ते देवच जाणे.
        सात आठ दिवस झाले निवडणुकीला, परवाच्या जोरदार वादळात त्या भिंतीवरून सटकली. मी जीर्ण होऊन जमिनीवर दुर्लक्षित चोळामोळा होऊन पडली आहे. तरीही  आज मी खुशीत आहे. माझे कार्य पूर्ण झाले असल्याने, माझे जीवन खऱ्या अर्थाने सफल झाले आहे. येणाऱ्या जोरदार पावसाने माझा लगदा होऊन खूप वर्षांने जिथून जन्मले त्या मातीसवे पुन्हा एकरूप होण्याची माझी अंतिम इच्छाही लवकरच पूर्ण होणार आहे.
गरजेपुरता मान असतो 
गरजसरता तोही जातो 
उपेक्षिताचे ते येते जिणे  
सत्य हेच जगरहाटी सांगे..
उगवत्यास नमस्कार हो 
मध्यान्ही तो तळपतो 
अंती जाता मावळतीला
अस्त तो निश्चित असतो.. 
जाणे येणे अविरत चक्र 
सुखदुःखासम चलाचलांचे 
पिकली पाने गळून जाता 
लाल पाने पुन्हा जन्मता.. 
प्रतिक्षा शेवटी पूर्ण जाहली 
मातीतून आली त्यात मिळाली 
कामी येता जीवन सार्थक 
इच्छा ती माझी तृप्त जाहली..
हेमंत नाईक
#सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग जुलै २०२६
Yahoo Mail: Search, organise, conquer

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा  असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Post navigation

Previous: नागपूरचा इतिहास – ९
Next: नागपूरचा इतिहास – राजा बख्त बुलंद शहा
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.