घरोघरी गणपती आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या उत्साहालासुद्धा उधाण आलं असेल. गल्लोगल्ली बसलेल्या गणपती मंडपातून कानठळ्या बसतील इतपत वाजणार्या हिडीस गाण्यांबद्दल ओरड होत असते. ती रास्तच. उत्सव म्हणाजे आनंद. त्यात त्रासदायक असे काही नसावे खरं तर. पण हल्ली आनंदाच्या व्याख्याच बदलल्या आहेत. हिडीस कान फुटणारी थिल्लर गाणी वाजवणे, ऐकणे, कानाचे पडदे फुटतील इतक्या मोठ्या आवाजात ढोल बडवणे हाच आनंद; असे मानणार्या पिढीचे हे उत्सव त्यांच्या त्यांच्या दृष्टीनं 'साजरेच' असतात. सोज्वळ करमणूकीच्या कार्यक्रमांची रेलचेल असणारे माझ्या तरूणपणी साजरे केले जाणारे गणपती उत्सव आता लुप्त झालेले आहेत तरी त्याच्या स्मृती अजूनही आहेत. आता मी मुंबईत नसले तरी ऐन उमेदीची वर्षे मुंबईतच गेली माझी. वेगवेगळ्या मेळ्यांची गाणी, व्याख्याने, शात्रीय गायन, भावगीत गायन, नाट्यगीतांचे कार्यक्रम, भजने, वादन, नर्तन, नाटके असे कार्यक्रम असायचे. गणपती उत्सवात आम्हा कलाकारांना आजिबात उसंत नसायची. याची तयारी खूप आगोदरपासून सुरू व्हायची. बाज्याच्या पेट्यांची दुरूस्ती, स्वर काढून घेणे, तबल्याला ओढ काढून घेणे, शाई चढवणे, तंबोर्याच्या जव्हार्या, तारा इत्यादींची डागडुजी किंवा नवीन खरेदी, मिरजेहून मागवणे अशी लगबग उन्हाळा संपत आला की चालायची. साथीदार सांगून ठेवणे, तबजली, पेटीवाले, सारंगीवाले अश्या नेहमीच्या माणसात निरोप. पत्रापत्री भेटीगाठी सुरू व्हायच्या की समजावे गणपती जवळ आले आहेत. माघ महिन्यात होणार्या उत्सवातदेखील कमी अधिक फरकाने असेच चित्र असायचे. एक तर अशा कार्यक्रमांना भरपूर मागणी यायची, दुसरे म्हणजे सार्वजनिक खर्चाची बाब असल्यामुळे चांगली बिदागी मिळायची. गाणार्या कलाकारांना निश्चित उत्पन्न नसायचे त्यामुळे आमच्यासारख्यांना ही एक पर्वणीच वाटायची. आत्ताच्या कलाकारांच्या मानधनाचे आकडे ऐकताना घेरी येते. अर्थात मला त्यात दु:ख ,मत्सर, असूया असले मुळीच नाही. ही चांगलीच गोष्ट आहे. पण त्या वेळी एवढे पैसे मिळायचे नाहीत, कुणी मागायचे सुद्धा नाहित. यदाकदाचित कुणी मागितले तर सहज देऊ शकतील अशी मंडळे फारशी नव्हती. काही होतीही. पण ती अगदी थोडी. ठराविक हिंदू उत्सव सोडले तर बाकी वर्षभर खाजगी गाण्यांतून जी कमाई होईल त्यात कलाकारांना भागवावे लागायचे. मुंबई पुण्यातील मोठीमोठी गणपती मंडळे अणि प्रतिष्ठित उत्सवांमध्ये अति प्रसिद्ध गाणार्यांची वर्णी लागायची. आईच्या काळात असे कलाकार कोणकोण होते त्यांची नावेच देते म्हणजे कल्पना येईल. गायिकांमध्ये चंपूताई म्हणजे हिराबाई बडोदेकर असायच्या. गंगूबाई असायच्या. मोगुबाई, केसरबाई ह्या गोवेकरणी, सरस्वती राणे, व्यतिरिक्त माणिकताई, ईंदिराबाई, जोत्स्नाबाई, प्रमिला ह्या तरूण गायिका. गायकांमध्ये व्यासबुवा, सुरेशबाबू, फुलंब्रीकर मास्तर, भीमसेन अण्णा, ओंकारनाथ, मन्सूरअण्णा, वसंतराव, कुमार, छोटे गंधर्व, मराठेबुवा असायचे. आणि फडके, वाटवे, नावडीकर असे अनेक तरूण भावगीत गायक असायचे. शोभाबाई, आई , सुमनताईही असायच्या. या शिवायही पुष्कळ असायचे. काही अपवाद सोडले तर सगळ्यां कलाकारांची एकमेकात उठबस असायची. एकमेकाच्या तारखा सांभाळून घेतल्या जायच्या. अर्थात पुन्हा सांगते की अपवाद असायचेच. एकदा, ” गणपतीच्या दर्शनाला या”. असा हिराबाईंचा निरोप आईला आला. त्यांच्या घरी गणपती बसत असे. एवढ्या मोठ्या बाईंचा निरोप आला तेंव्हा अनमान कसा करणार? “आपण जाऊया” आई म्हणाली. आईचं गाणं होतं रात्री म्हणून संध्याकाळी आम्ही गेलो. तो प्रसंग अजूनही आठवतो. नवारोज हिलच्या पलिकडच्या परिसरात त्या रहात. चौरंगावर गणपती बसवला होता दोन्ही बाजूने चांदीच्या कमरेएवढ्या उंचीच्या समया लावलेल्या. सुगंधाचा घमघमाट होता. आपापले कार्यक्रम आटोपून किंवा सांभाळून बरेच कलाकार येत होते. रात्री त्यांच्याकडे गाणंही असायचं. पण आम्ही दर्शन घेऊन परतलो. एवढी अति प्रसिद्ध बाई ,पण शांत सौम्य. आमच्याशी आवर्जून बोलल्या. माझी चौकशी केली. त्या वेळेस मी लहान होते. गाणं शिकत होते. आटवलेल्या केशर दुधाचा आणि पेढ्याचा प्रसाद दिला. मी नमस्कार केला तर मोठी हो असं म्हणाल्या. आईशी बोलल्या. थोड्या वेळाने आंम्ही परतलो. ही आठवण आजही ताजी आहे. मुगभाटात, शास्त्री हॉलला, घारपुरे लेन, फणसवाडी , गायवाडी असे जवळ जवळ गणपती बसायचे. एकमेकाच्या कार्यक्रमांना एकमेक कलाकारही येऊन बसायचे. साथीदार उसने दिले घेतले जायचे. सगळ्यांना सांभाळून घेतले जायचे तसे साथीदारांची पळवापळवीही चालायची. एक कला सोडली तर कलाकार म्हणजे सगळे मनोविकार असलेली सामान्य माणसेच असतात याचे दर्शन घडणारे अनेक प्रसंग घडत. पण आईने आयुष्यभर पाळलेले काही नियम मी सुद्धा पाळले. ते म्हणजे कुणाची निंदा नालस्ती करायची नाही. कुणाच्या कलेला जाहीर नावे ठेवायची नाहीत. त्या बाबतीत आपले मनातले मनातच ठेवायचे. या नियमांमुळे कलाक्षेत्रात कुणाशी संबंध पराकोटीचे बिघडले असे झाले नाही. मतभेद झाले पण त्याला सार्वजनिक स्वरूप आलं नाही. असे वागण्याचे तोटेही आहेत पण ते परवडले. आणखी एक आठवण सांगते आणि हा भाग पुरा करते. हा अनुभव आईचा. मागच्या भागात 'मालकंसाची गोष्ट' असा जो उल्लेख आला आहे तोच हा अनुभव. त्या वेळेस आंम्ही गावदेवीला रहात होतो. ते घर बरेच मोठे होते पण आम्ही काहीच खोल्याच वापरीत होतो. बाकीच्या खोल्यांना घरमालकाने मोठी कुलुपे लावलेली होती. घर तसे बरे होते पण त्या घरात शिजवलेले अन्न पुरत नसे. नेहमी अन्न कमी व्हायचे. घरातील माणसे जेवायला बसली की प्रचंड भूक लागायची. एक एक जण वेड्यासारखा जेवायचा. कितीही खाल्ले तरी पोट भरले असे वाटायचे नाही. आईचे गाण्याचे शिक्षण पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे तालमीचे झाले. खां साहेब आमच्याचकडे राहून शिकवत असत. ते आले की त्यांचा मुक्काम दोन दोन अडीच अडीच महिने सुद्धा असे. मी फारच लहान होते. मला हे काही आठवत नाही. पण आई नेहमी सांगत असे. आईचे कार्यक्रम आणि तालिम दोन्ही सुरू होते. असेच खां साहेब आलेले होते. रात्री जेवण खाण झाल्यावर बर्याच उशीराने खांसाहेब आईला म्हणाले “हमारा तानपुरा लाओ” आईला नवल वाटले. पण विचारायचे कसे. रात्रीचे साडेअकरा वाजले असतील. तिनं खां साहेबांचा तंबोरा आणला. खां साहेबांनी मध्यमात तो लावला. आणि मालकंस गायला सुरवात केली. ते अप्रतिम गायन आई अवाक होऊन ऐकू लागली. अस्थाई झाली आणि आता अंतरा सुरू होणार इतक्यात कुठूनतरी एक वेगळाच सुगंध येऊ लागला. हळुहळु खोली त्या सुगंधाने भरून गेली. अंतर्याची दोन आवर्तनं होतात तो सुगंध घरभर सार्या खोल्यांतून झाला. मला घेऊन जिबाई आत झोपल्या होत्या. (ज्यांच्या अंगाखांद्यावर मी वाढले त्या आमच्याकडे असणार्या बाई. त्यांच्याबद्दल पुढे लिहीन) पसरलेल्या सुगंधानं त्यांनाही जाग आली. आत्ता रात्रीचे कोण उद-धूप जाळत आहे? असे वाटून पहाण्यासाठी त्या घरभर फिरून बाहेर आल्या. खांसाहेब भान हरपून अस्सा मालकंस गात होते की एका एका स्वराबरोबर वीज चमकावी. ते अद्भूत गाणे आई आणि जिबाई ऐकत राहिल्या. तासाभराने ते अलौकिक गायन संपले आणि खां साहेबांनी तंबोरा खाली ठेवला. गायन सुरू होते तो पर्यंत सुगंध येतच राहिला. गाणे संपल्यावर तो हळुहळु कमी होत नाहिसा झाला. पण तो कुठून आला आणि कुठे गेला हे शेवटपर्यंत कळलेच नाही. दुसर्या दिवसापासून आधीच्या अंदाजानुसार शिजवलेले अन्न शिल्लक राहू लागले. घरातील माणसांना ती 'राक्षसी' भूक लागेनाशी झाली. अन्न गायब होणे बंद झाले. ते घर बाधित होते हे पुढे समजलेच. तसेही लौकरच आंम्ही ते सोडले. पण ही हकिकत आईने खां साहेबांना सांगताच ते म्हणाले “मालकंस बडी रुहानी चीझ है. उस वखत इस नाचीझ के गले से बडे दुरुस्त सूर लगे होंगे. तभी तो कोई करिश्मा मुमकिन हुआ.” पुढे अनेक कलाकारांनीही सांगितले की अतिशय सुरेल मालकंस जर मध्यरात्रीच्या सुमारास गायला तर त्या जागेत असलेली बाधा नाहिशी होते. खां साहेबांच्या त्या जादुई सूरांनी त्या वास्तूत असलेली बाधा नाहिशी केली होती. त्या घरात असे काही विचित्र घडत असे हे त्यांना माहितही नव्हते पण त्यांच्या गळ्यातल्या त्या सच्या सुरांची ती किमया होती. ही आठवण माझी आई आणि जिबाई कितीतरी वे़ळा सांगत असत. स्वर आणि आत्मा यांचे नाते असते असे मला या वरून आणि मला आलेल्या अनेक अनुभवांवरून वाटते.
गौरीबाई गोवेकर.