आज जरा गडबड होती. उशीर झाला होता. घाईघाईने मी कारमध्ये बसलो आणि रेडिओ लावला. पहिलाच शब्द कानावर पडला. मध्ये थोडी खरखर झाली आणि पुढे उद्घोषकांनी “गोविंद गोडबोले” हे नाव घेतले. ते नाव ऐकताच मन एकदम भूतकाळात गेले.
लहानपणी नागपूर आकाशवाणीवर दर रविवारी सकाळी नऊ वाजता ‘बालविहार’ हा कार्यक्रम लागायचा. गोविंद गोडबोले आणि त्यांचे एक सहकारी मुलांसाठी तो सादर करायचे. त्या काळच्या सकाळी आजच्यासारख्या आळशी नव्हत्या. आम्ही लवकर उठायचो, पटापट आवरायचो, फराळ करायचो आणि रेडिओसमोर जाऊन ठाण मांडून बसायचो. ‘ब्रेकफास्ट’ हा शब्द तेव्हा आमच्या गावीच नव्हता. ‘बालविहार’ कधी सुरू होतो याची आम्ही अगदी डोळे लावून वाट पाहायचो.
‘बालविहार’मधल्या श्रुतिका नेहमीच भारी असायच्या. गोविंदकाकांचा आवाज तर एकदम खास! आज व्हॉइस अॅक्टर्सची कितीही चर्चा झाली, तरी त्यांच्यासारखी शब्दफेक आणि सहजता क्वचितच ऐकायला मिळते.
‘बालविहार’प्रमाणेच मुंबई आकाशवाणीवरून दर महिन्याच्या पहिल्या रविवारी ‘बालदरबार’ लागायचा. मग आमच्यात “बालविहार भारी की बालदरबार?” यावर खास नागपुरी थाटात गप्पा रंगायच्या. त्यात आपला बालविहारच कसा ग्रेट, हाच एक सूर असायचा
त्या काळी मनोरंजनाची साधने फारच थोडी होती—रेडिओ आणि वर्तमानपत्र. कितीतरी गाणी आम्ही रेडिओमुळे पाठ केली. गीतकार, संगीतकार आणि गायक कोण, यावर आमच्या तिघा भावंडांत पैजा लागायच्या. कुणाचे उत्तर चुकले की त्याची लगेच फिरकी घ्यायची. गाण्याच्या सुरुवातीच्या संगीतावरून गाणे ओळखणे हा तर आमचा आवडता खेळच होता. त्यामुळे लता मंगेशकर यांनी कोणते गाणे पूर्वीच्या नाकातून गाणाऱ्या गायिकांसारखे गायले आहे किंवा मुकेश यांचे कोणते गाणे कुंदनलाल सैगल यांच्या शैलीचे आहे, अशा बऱ्याच गोष्टी माहिती झाल्या. विशेषतः “अमीन सयानी” यांच्या आवाजात ऐकलेले किस्से अजूनही आठवतात. त्यातली एक आठवण म्हणजे किशोरकुमारवर चित्रित झालेले पण मोहम्मद रफी यांच्या आवाजातले *शरारत* (१९५९) मधील **“अजब है दास्ताँ तेरी ऐ ज़िंदगी”**. हे गाणे पडद्यावर किशोर कुमार यांच्यावर चित्रित झाले असले, तरी ते मोहम्मद रफी यांनी गायले आहे.
आजही या आठवणी आल्या की मन अगदी ताजेतवाने होते. बिनाका गीतमाला, नंतरची सिबाका गीतमाला आणि सिलोन रेडिओवरील अनेक कार्यक्रम अजूनही आठवतात.
उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही आजीकडे जायचो. आम्ही तिला प्रेमाने ‘अक्का’ म्हणायचो. मावशीकडे एक छोटासा रेडिओ होता. त्याचा आवाज कमी असल्यामुळे अगदी जवळ बसून किंवा पडून कार्यक्रम ऐकावे लागायचे. पण त्यातच खरी मजा होती. दुपारी आंब्याच्या रसाचे जेवण झाल्यावर रेडिओ हमखास लागायचा. तेव्हा रेडिओ सेलवर चालायचे, त्यामुळे तो उगाच दिवसभर सुरू ठेवण्याचा प्रश्नच नव्हता. रात्री अंगणात झोपताना दहापर्यंतची गाणी ऐकतच डोळा लागायचा.
बहुतेक कार्यक्रम ठरलेल्या वेळीच असायचे. त्यामुळे “आता नाही तर नंतर ऐकू” अशी चैन नव्हती. आपल्या आवडीचीच गाणी लागतील, याची खात्रीही नसायची. जे मिळाले त्यात आनंद मानायची सवय बहुतेक त्यामुळेच लागली असावी.
म्हणूनच आजही “गोविंद गोडबोले” हे नाव कानावर पडले की आठवणींचा सगळा पट डोळ्यांसमोर उभा राहतो.
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६