Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

देव बरें करूं……..२

गौरीबाई गोवेकर जुलै 12, 2026 1 minute read
0
gumohor-water
गोव्यात असताना ‘देवाच्या सेवेकरणी’ आणि ‘कलावंताचं घराणं’ या बिरूदांपलीकडे गरिबीशिवाय दुसरं काहीच नव्हतं आमच्याकडे. बिरूदांनी पोट भरण्यासारखं नव्हतं. आई स्वतंत्र मैफली करायला लागेपर्यंत हीच परिस्थिती कायम होती. खांसाहेबांनी तालीम देण्याचं मान्य केलं नसतं आणि शेवटपर्यंत ते आपल्या शब्दाला जागले नसते, तर आमचे हाल कुत्रा खाता ना. म्हणूनच मुरादाबादचा सांगीतिक वारसा सांगणाऱ्या या घराण्याचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. उस्ताद छज्जूँ खां, उस्ताद नजिर खां, अमान अली खां, झंडे खां, मम्मन खां, शब्बीर खां, अमीर खां, अंजनीबाई, मुहम्मद हुसेन खां अशी एक एक गानरत्नं या घराण्यात पैदा झाली. हे सर्व गायक घराणेदार गायक तर होतेच, त्याहीपेक्षा ती अतिशय सज्जन अशी माणसं होती. मोठे खांसाहेबसुद्धा अतिशय सज्जन होते. त्यांच्या सज्जनपणाचा वारसा अपरिहार्यपणे आईकडे गाण्याबरोबर आला. दुसऱ्याच्या परिस्थितीचा फायदा घेणं, वावगं वागणं अशा गोष्टी या मोठ्या माणसांनी कधी केल्या नाहीत.


‘कलावंतिणी’ म्हणजे लोकांची बघण्याची दृष्टी जी बदलते, त्याला कारण म्हणजे पुढे प्रसिद्धीच्या शिखरावर गेल्यावर हाती अमाप पैसा, कीर्ती, आलेल्या काही कलावंतिणी आणि त्यांचं बेछूट वागणं हेच होय. पैसा, प्रसिद्धी, मानमरातब या गोष्टी वापरू तशा वापरल्या जातात, हे सर्व मिळूनसुद्धा आपल्या कलेशी इमान राखून, आपल्या जबाबदार व एकनिष्ठ वागण्याने ज्या थोड्या राहिल्या, त्याच खऱ्या कलावंत होत. नपेक्षा काळाच्या ओघात किती जणींची माती झाली. ना धड कला, ना धड गाणं, शेवटी अत्यंत निर्धन अवस्थेत त्या मृत्यू पावल्या. माझ्या आजीने आणि आईने फार कष्टाने, मेहनत करून आपली गरिबी नाहीशी केली. गोवा सोडलं, तेव्हा त्या मायलेकींजवळ काही म्हणता काही नव्हतं. रिकामे हात. मनात मात्र कला शिकायची भरपूर इच्छा. गाण्याच्या शिक्षणासाठी त्या पै पै वाचवत राहिल्या. मोठ्या खांसाहेबांसारखा गुरू मिळाला नशिबाने. गाणं शिकायचं असेल तर इतरांकडून ते भरपूर गुरुदक्षिणा घेत. त्यांना शिकवायचं नसेल त्याला भरपूर फी सांगत. इतकी की तो ती देऊ शकणार नाही याची खातरीच असे. पण हे अंगात मुळची कला नसणाऱ्या हौशा-नवशा-गवशांसाठीच असे. तळमळ असलेला कलावान कुणी विचारील तर त्याला फी-दक्षिणेची काही अट नसे. भरभरून विद्या देत. मोठ्या खांसाहेबांचा शिष्यपरिवारही बराच मोठा आहे. आईचे कलागुण पाहून अमुक एक द्या असं न सांगता ते शिकवायला तयार झाले. अटी फक्त दोनच – एक म्हणजे कमीत कमी दहा ते बारा वर्षं तालीम घेतली पाहिजे. दुसरी म्हणजे त्यांनी सांगेपर्यंत जाहीर कार्यक्रम कुठेही करता कामा नयेत. या अटी मान्य करून आईची तालीम सुरू झाली ती थेट खांसाहेब मुंबई सोडून पुण्याला स्थायिक होईपर्यंत अखंड चालू राहिली. ते मुंबईत आले की आमच्याकडेच उतरत. त्या वेळेस मलाही त्यांची तालीम मिळाली. पुढे छोट्या खांसाहेबांकडे त्यांनीच माझ्या तालमीची तजवीज केली. माझ्या वेळेसही दक्षिणा-फीचा प्रश्न आला नाही, कारण एक म्हणजे त्यांच्या गुरूंनी – म्हणजेच मोठ्या खांसाहेबांनी त्यांच्यावर सोपवलेली मी शिष्या होते. दुसरं म्हणजे तेव्हा खांसाहेब आमच्या घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तीसारखेच होते. आमच्याचकडे राहत. खांसाहेब आणि आई गुरुबंधू-भगिनी असल्यामुळे त्यांच्यात बहीणभावाचं नातं होतं. तिसरं कारण म्हणजे त्या वेळेपर्यंत आमची सांपत्तिक स्थिती खूपच सुधारली होती. आम्ही द्यावं आणि त्यांनी मागावं असं काही नव्हतं. जे काही होतं, ते सर्व मोठ्या खांसाहेबांमुळेच असल्याची आम्हा सर्वांना जाणीव होती. जे काही देणं-घेणं होतं ते प्रेमाचं. काटेकोर, नियमबद्ध शिक्षणातून आईचं गाणं घडलं. गाण्याबरोबर आयुष्यही घडत गेलं. अमाप कष्ट करून, देशभर फिरून मैफली करून तिने दारिद्र्यावर मात केली. आपल्या आईचं स्वप्न पुरं केलं. गाणं शिकत असतानाच घराला आधार हवा म्हणून तिला विवाहाचा पर्याय स्वीकारावा लागला. गाण्याचं शिक्षण पुरं होईपर्यंत विवाह आधारभूत ठरला. पुढे माझ्या जन्मदात्याच्या मृत्यूनंतर तिला फार मानसिक यातनांतून जावं लागलं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरच्या लोकांनी आमच्याशी सर्व संबंध तोडून टाकले. पण आई त्यातून सावरली. त्याच सुमारास खांसाहेबांनी तिला गाण्याच्या स्वतंत्र मैफली करण्याची आज्ञा दिली. उत्तरार्धात परिस्थिती आमूलाग्र बदलली. कलेची सेवा करून त्या काळाच्या मानाने तिने अपार धन मिळवलं. ते राखलं. त्याचे परिणाम म्हणून आम्हा सर्वांच्या आयुष्याला अतिशय स्थैर्य आलं. माझ्या आजीचा व आईचा मला अत्यंत अभिमान वाटतो. केवळ तिच्या चरणाशी नतमस्तक होणं आणि अजन्म माझ्या गुरुजनांच्या ऋणात राहणंच मी पसंत करीन. *** एकदा एके ठिकाणी माझ गाणं होतं. सायंकाळच गाणं, मी कुठेशी बाहेर गेले होते ती अगदी वेळेला घरी आले आणि निघालेच लगेच. वेळेत पोहोचायला हवं होतं. नेसलेली साडी तशी काही वाईट नव्हती. त्या वेळी फिक्या रंगाच्या साड्यांची फॅशन होती. गळ्यात नेहमीची चेन, हातात एक एक बांगडी होतीच. केस सारखे करून एक फूल तेवढं माळलं केसात आणि आईला नमस्कार करायला गेले. मला पाहताच ती चिडून म्हणाली, “तानू, तूं खय वैंता? मैफिलीक की बाजारान गो? फुड्यान असतले ते रसिक आमचे मायबाप. उठोळ नाका पण आमीं साजराँ, गोमटाँ दिसूक जाय इतलें क्ळों ना तुका!. किदें हें दळडीरपणाची लक्षणां? बेगीन वोस. चांगला तयार हो. हांव तुकां जैत मेळूं म्हण आवडता.” तिने मला साडी बदलायला लावली. कानात, गळ्यात मोजके पण चांगले दागिने घालायला लावले आणि पाहून म्हणाली, “मैफलीला जाताना प्रसन्न असावं, प्रसन्न दिसावं. आपण प्रसन्न असलो, दिसलो तर गाणं प्रसन्न होतं आपलं.” ते मी आयुष्यभर लक्षात ठेवलं.

 हार – आईची आठवण. 






लेखक

  • गौरीबाई गोवेकर
    गौरीबाई गोवेकर

Post navigation

Previous: कट्ट कड कट्ट!!
Next: रेडिओ
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.