येथे तुमच्या लेखाचा कोणताही शब्द न बदलता, केवळ विरामचिन्हे (Punctuation) आणि परिच्छेद (Paragraphs) व्यवस्थित करून तो अधिक वाचनीय स्वरूपात मांडला आहे:
नवीन वर्षाची सुरूवात
नवीन वर्षाची सुरूवात होणार आहे. सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आणि नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करायचे. पण निरोप देणं हे इतकं सोपं असतं का? निरोप दिल्याने खरच आपण गतस्मृतींना विसरू शकतो का? कशा-कशाला निरोप द्यायचा आणि कुणी कुणाचा निरोप घ्यायचा?
अनादी अनंत काळापासून वर्ष बदलत आहे. आपणही अनेक वर्ष बदलताना पहात आहोत. जानेवारी हे नाव ज्या रोमन देवतेच्या नावावरून प्रसिद्ध झालं, तिचं नाव ‘जानस’ (Janus) होतं. तिला दोन चेहरे होते. एक मागे, ज्याची दृष्टी मागच्या वर्षाकडे पहायची आणि पुढील चेहरा भविष्याकडे पहायचा. आपण म्हणतो, मागील सर्व विसरून जा. नवीन वर्ष म्हणजे नवे संकल्प करण्याची वेळ. जुने जावे, नवे येवो. ह्याचा मतितार्थ वेगळाच आहे. जे जे वाईट आहे ते ते सर्व विसरावे, काळाला न शोभणारे ते ते जावो; त्याचप्रमाणे काळानुसार चांगले ते बदल येवो. परंतु हे सर्व स्वीकारताना मागील वर्षात केलेल्या संकल्पांची पण आठवण ठेवून, पहिले त्यांची पूर्तता कशी होईल हे लक्षात घेणे जरुरी आहे.
दिनदर्शिका मधील लाल-काळ्या चौकोनातील तारीख आणि वार बदलत आहे. मनुष्य रोज काहीतरी योजना बनवत असतो. दर महिन्यात विशिष्ट तारखांवर खुणा करत असतो. तीस किंवा एकतीस तारखेनंतर दिनदर्शिकेचे पान उलटत असतो. वर्षाच्या शेवटच्या दिवशी विचार करतो, आपण ज्या योजना आखल्या होत्या त्या प्रत्यक्षात किती उतरल्या आणि किती सफल झाल्या? हाती काही फारसं आलं नसतं, दिनदर्शिकेतील काळ्या चौकोनांसारखच वर्ष गेलं असतं. रात्री झोपताना पुढील वर्षाची योजना मनातल्या मनात आखत असतो. परंतू त्याला हे कधीच समजत नसतं की, जीवनाची पूर्ण दिनदर्शिका ज्याने लिहीली असते, ‘तो’ मात्र मजेत पिंपळाच्या झाडाखाली पहुडला असतो. बासरीच्या सूरांवर सर्व जगाला नाचवत असतो आणि एक-एक वर्षाचे पान पालटत असतो. तेव्हां ‘त्याला’ विसरता कामा नये. म्हणूनच ‘त्या ईश्वराला’ नमन करूनच नव्या वर्षाचे स्वागत करू या.
त्यावरच माझी रचना…
निरोप
निरोप कसला देता मजला
अनादी अनंत काळापासून
नित्य माझे येणे जाणे
उगाच का हो जाता विसरून
काय सरले काय उरले
आता कशास ते आठवायचे
नव्या वर्षाचा नवा दिनकर
क्षितीजावर उगवताना पहायचे
निरोप कुणाला अन् कसा द्यायचा?
सुहृदांच्या प्रेमाला वा शत्रूच्या शत्रूत्वाला
जीवनातील सुखदु:खाच्या क्षणांना
नव्या जुळल्या नात्याला
का सोडून गेलेल्या जिवलगांना.?
झाल गेलं विसरून जायचं
पुन्हा नव्याने सुरुवात करणं
सोपं असतं का हो इतुके
जीवनाच्या या फळ्यावर
नित्यनवे धडे गिरवणे.
निरोप द्यावा अंगी वसणा-या
मोहमायादि षड्रिपूंना
नात्यांमधल्या कटू क्षणांना
नववर्षाचे स्वागत करू या
आशीर्वाद ‘ त्या ‘चा घेऊन.
~ सौ ऐश्वर्या डगांवकर. पुणे