नारायणाचा नर
आदिमानवाच्या काळात “देव” नव्हता.
… म्हणजे ती संकल्पना नव्हती.
पुढे भूकंप, ज्वालामुखी, अतिवृष्टी , वादळ इत्यादी अरिष्टांचा नित्य सामना करावा लागल्यावर ती -ती नैसर्गिक शक्ती ही देवता मानली गेली. हिंदू धर्मापुरते बोलायचे तर इंद्र, सूर्य, वरुण, भूमाता , वायू, वगैरे.
पुढे निर्माण -प्रतिपालन-संहार या तीन प्रमुख कार्यांचे अधिकारी ब्रह्मा-विष्णू-महेश मानण्यात येऊ लागले व त्यांच्या अनुषंगाने इतर देवता प्रचलित झाल्या .
यापुढे मग या देवतांचेच अंश, अर्थात श्रीराम, श्रीकृष्ण, हनुमान इत्यादी, प्रामुख्याने पुढे आले.
यानंतरची पायरी म्हणजे या दैवी अंशांचा प्रचार करणारे असे संत . त्यांच्या कार्यातून रामदासी, वारकरी, सनातनी वगैरे पंथ निर्माण झाले .
आणि अगदी अलीकडचा टप्पा म्हणजे या पंथांतही आपला स्वतःचा वेगळा गट तयार करणाऱ्या व्यक्ती, जशा जग्गी वासुदेव .
आता तुम्ही आजूबाजूला पाहाल तर असे दिसते कि बहुसंख्य हिंदू समाज या अशा असंख्य छोट्या मोठ्या गटांत विखुरला गेला गेला आहे. प्रत्येक गटाचा गुरु वेगळा, उपासना पद्धत वेगळी , जप वेगळा , नाम वेगळे . इथे आपला प्रवास नारायणापासून नरापर्यंत असा उलटा झाला आहे, म्हणजे सर्वशक्तिमान “ईश्वर’ ही संकल्पनाच बाजूला पडून मानवी व्यक्तींचेच स्तोम माजले आहे.
गंमत अशी कि यापैकी (म्हणजे समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम वगैरे) कोणीही माझी उपासना करा, माझी मूर्ती करून मंदिरे बांधा, असे सांगितले नाही. सर्वांनी मूळ ईश्वराचीच उपासना सांगितली आहे.
आता तुम्ही म्हणाल कि गुरु महत्वाचा आहे!
नक्कीच! गुरु पाहिजे यात दुमत नाहीच, पण त्या गुरूने शिष्याला धर्माची वाट चालायला शिकवले पाहिजे, न कि त्याला फाटे फोडून इथे तिथे नेले पाहिजे.
दुसरे म्हणजे, ही “फुटीरता” वादी प्रवृत्ती आपल्या समाजमानसात इतकी खोलवर रुजली आहे कि ती प्रत्येक क्षेत्रात दिसून येते. “राष्ट्रहित प्रथम” हा एवढा साधा सोपा निकष असतानाही आपण आपला आवडता राजकीय पक्ष काय सांगतो ते पाहतो . भारतीय संघ जिंकणे महत्वाचे, ते सोडून धोनी कंपू, टीम विराट वगैरे फालतू टोळीयुद्ध चवीने चघळत राहतो.
हे कुठेतरी थांबले पाहिजे. मूळ सिद्धांत अभ्यासून त्यानुसार आपले निकष स्वतः तयार केले पाहिजेत. एखादी गोष्ट कोण सांगतोय हे पाहून मन डोलावण्यापेक्षा त्यापेक्षा त्या गोष्टीवर सारासार विचार केला पाहिजे .
सर्वात महत्त्वाचे म्हणजे – याची सुरुवात आपण आपल्यापासून केली पाहिजे.
गौतम सोमण
१ जानेवारी २०२६