17/2/26

सध्याची कुटुंबपद्धती बहुतांशी न्यूक्लिअर झाली आहे. काळाच्या ओघात बदल अपरिहार्य असतात, पण काही बदल मनाच्या कोपऱ्यात नकळत हुरहुर निर्माण करून जातात. पूर्वीची एकत्र कुटुंबपद्धती म्हणजे आई-बाबा, आजी-आजोबा, पणजी, आत्या,काका-काकू, चुलत भावंडे अशा नात्यांनी भरलेलं समृद्ध घर. पहाटेपासून सुरू होणारी धावपळ— चहापाण्याची लगबग, गजबजलेलं स्वयंपाकघर, न्हाणीघरात तांब्याचा चकचकीत बंब, लाकडाच्या विस्तवाचा धूर, त्याची डोळ्यांत चुरचुर… कोणी घरकामात गुंतलेलं, तर कोणी लहान मुलांना आंघोळ घालत असलेलं, कोणी वर्तमानपत्र वाचत असलेलं… प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त, तरीही एकमेकांशी घट्ट जोडलेला.
घरातील वयस्क मंडळी हक्काने सगळ्यांवर लक्ष ठेवणारी, प्रेम करणारी, वेळप्रसंगी रागावणारी, अधिकार गाजवणारी असायची. घर म्हणजे फक्त चार भिंती नव्हत्या; ते स्वभावांचे, भावना-संवेदनांचे एक जिवंत विश्व होतं. चांगले-वाईट स्वभाव, सुख-दुःखाचे प्रसंग, झगडे-तंटे, हास्यविनोद , सर्व मिळतेजुळते—सगळं काही त्या घरातच सामावलेलं असायचं.
घरातील एखादा भाऊ उपजीविकेसाठी काही करत नसेल, तरीही बाकी भावंडे त्याला, त्याच्या पत्नी-मुलांना आपलंच मानून प्रेमाने, कर्तव्यभावनेने सांभाळत. “आपण” ही भावना केंद्रस्थानी होती.
कधी आणि कसं हे चित्र बदललं, ते कोणाच्या लक्षातही आलं नाही. व्यवसाय, नोकरी, शिक्षण यांच्या निमित्ताने घर, गाव सोडून वेगवेगळ्या शहरांत स्थायिक होताना हळूहळू घराशी आणि माणसांशी असलेले स्नेहबंध नकळत दुरावू लागले . “आपल्या पायापुरतं पाहणं” हा स्वभाव बळावू लागला. काम न करणाऱ्या भावाकडे सहेतुक दुर्लक्ष होऊ लागलं; इतकंच नव्हे तर आई-वडीलांनी कोणाकडे, किती दिवस राहायचं हेही भावंडं ठरवू लागली. हेच संस्कार पुढील पिढीवरही नकळत उमटले आणि मुले तर आई-वडिलांपेक्षाही अधिक व्यावहारिक झाली.
माझ्या स्वतःच्या आयुष्याकडे पाहिलं, तर माझं बालपण मुंबईतील फ्लॅट संस्कृतीत गेलं. त्यामुळे एकत्र कुटुंबाचा अनुभव केवळ उन्हाळ्याच्या सुट्ट्यांपुरताच मर्यादित राहिला—मामाच्या गावाला जाणं, किंवा आत्ते-मामे, चुलत भावंडांनी आमच्याकडे येणं. पण त्या थोड्याशा काळातही आम्ही भरभरून जगलो.
कधी गच्चीवर चांदण्यांची शाल पांघरून ,गप्पा मारत, हसत-खेळत रात्र सरायची; कधी बिछान्यावर पडल्यापडल्या एखादी मामी सिनेमाची गोष्ट रंगवून सांगायची; तर कधी भुताखेतांच्या गोष्टी ऐकताना मनातल्या मनात भीतीही दाटायची. सुट्ट्यांमध्ये खाण्यापिण्याची चंगळ असायची—घरी आईस्क्रीम बनवण्याचा उत्साह, समुद्रावर सगळ्यांसोबत फिरायला जाणं, तिखट , चविष्ट भेळेचा आस्वाद घेणं ,नारळपाणी पिणं… या सगळ्यात एक वेगळीच मजा होती. अशा वातावरणात आम्ही बहीण-भावंडे एकरूप होऊन जायचो. त्यामुळे परकेपणाची भिंत आमच्यात कधी उभीच राहिली नाही.
पुढे प्रत्येकाचं शिक्षण, नोकरी, व्यवसाय, लग्न, मुलं-बाळं—जीवन पुढे सरकत गेलं. पण आजही कोणाचं लग्न असो वा अन्य कोणतंही निमित्त, एकत्र आलो की तीच आपलेपणाच्या भावनेची सोनसाखळी अजूनही प्रत्येकाच्या मनात तशीच जिवंत असल्याचं जाणवतं.
पण आमच्या मुलांच्या बाबतीत मात्र तसं घडलं नाही. एकत्र राहणं तर दूरच; सुट्ट्यांमध्येही क्वचितच सगळे एकत्र येत. दूरदूर राहिल्यामुळे लग्नप्रसंगीही फार थोड्या वेळासाठी भेट व्हायची. परिणामी प्रेमाचे ते रेशीम बंध तयार होऊ शकले नाहीत ही जाणीव अनेकदा हृदयाला बोचते आणि एक सततची रुखरुख मनात दाटते.
माझा मुलगा—उच्च शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने नेदरलँड्समध्ये असणारा—अलीकडेच काही दिवसांसाठी भारतात आला होता. त्याचे लाड-कोड, त्याला आवडणारे पदार्थ, त्याच्यासोबत बाहेर फिरणं, आणि तो कायम दूर असल्यामुळे थोडं अधिक भावनाविवश होऊन त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव—हे सगळं साहजिकच घडलं.
त्याच दरम्यान तो भारतीय सैन्यात अधिकारी असलेल्या माझ्या मुलीच्या म्हणजेच त्याच्या बहिणीच्या पोस्टिंगच्या ठिकाणीही गेला. तिथे त्याचं यथोचित प्रेमाने स्वागत , सन्मानजनक पाहुणचार झाला. व हळव्या मनाने तिने ३-४ दिवसांनी भावाला निरोपही दिला . पुढील फ्लाईट मुंबईहून असल्याने तिच्याच परिचयामुळे तो दोन दिवस कुलाबा येथील नेव्हीच्या आलिशान गेस्ट हाऊसमध्ये राहिला.
या प्रवासात तो स्वतःहून माझ्या काकूकडे भेटायला गेला. तिथे त्याची काकूआजी, तिची मुले म्हणजे माझ्या मुलाचे मामा-मामी, त्यांची मुले आणि माझी चुलत बहीण—म्हणजे त्याची मावशी—सगळ्यांनीच त्याचं अत्यंत प्रेमाने स्वागत केलं. घरातील चालीरीतीनुसार सुंदर ताट मांडून, सजवून , मनापासून जेवण वाढलं. मायेचा खाऊ बांधून, भावनाशील होऊन त्याला निरोप दिला.
तो स्वतःही या प्रेमाने गहिवरून गेला होता. “आपल्या येण्याने कोणी इतकं आनंदी होतं, इतकं प्रेम देतं,” हा अनुभव त्याला नवीन आणि भारावून टाकणारा होता. त्या क्षणी पुन्हा एकदा मला न्यूक्लिअर कुटुंबपद्धतीचं वैषम्य तीव्रतेने जाणवलं—आणि पुढील पिढीला एकत्र कुटुंबाचा साधा परिचयसुद्धा नसावा याचं वाईटही वाटलं.
असाच आणखी एक प्रसंग मनात खोलवर रुतून राहिला. काही दिवसांपूर्वी माझ्या शाळेतील मैत्रिणीचा म्हणजे मेधा पाठारे हिचा वाढदिवस होता. मी तिला तिच्या हुशारीचा, रसिकतेचा, सुज्ञपणाचा, प्रगल्भ विचारवंत स्वभावाचा उल्लेख करत शुभेच्छा दिल्या. त्यावर ती विनम्रपणे म्हणाली, “माझ्यात असं काही नाही गं .”
बोलता बोलता तिने सांगितलं—तिला सहा जावा, अकरा नणंदा आहेत. ती सगळ्यात लहान. सुना, लेकी, बाळं यांची रेलचेल असते. गणपती, भाऊबीज, सण-उत्सव—सगळे एकत्रच साजरे होतात. घरात कायम अनलिमिटेड मजा सुरू असते आणि तिला हे सगळं प्रचंड आवडतं.
तिने त्या सर्वांची एकत्र असलेली अनेक छायाचित्रे दाखवली. प्रत्येकाच्या वाढदिवसाचे, विविध प्रसंगांचे प्रेमळ वर्णन सांगितले. ते पाहून मी खरंच आश्चर्यचकित झाले—आणि तितकीच भावूकही.
मनात एक विचार उमटून गेला—आज घरे बदलली, व्याख्या बदलल्या, राहणीमान बदललं, विचार बदलले. पण जर आपल्या पिढीतील समान विचारांचे लोक मुलाबाळांसकट जाणीवपूर्वक एकत्र आले, आपल्या संस्कृतीचं पालन केलं, आणि केवळ घरच नव्हे तर मनंही एकत्र ठेवली, तर ते सोन्यासारखे सुगीचे दिवस पुन्हा नक्कीच येऊ शकतात.
पण त्यासाठी फक्त विचार करून थांबायचं नाही—प्रत्यक्ष कृती करावी लागेल. तेव्हाच हे स्वप्न वास्तवात उतरेल… आणि कदाचित पुढील पिढ्यांच्या आयुष्यातही “आपण” या शब्दाला पुन्हा अर्थ प्राप्त होईल असं मला वाटतं.
सुषमा ठाकूर
भोपाळ