Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

पसारा

अपर्णा शेंबेकर फेब्रुवारी 25, 2026 1 minute read
0
1000544594.jpg

पसारे खूप प्रकारचे असतात. काही आपण मुद्दाम केलेले. काही आपल्याही नकळत झालेले. काही हौस म्हणून केलेले. घरातला पसारा आवरायला तसा सोपा. मजल दर मजल करीत आपण शेवटी तो आवरतोच. अवघड वाटतो तो म्हणजे मनात असलेला पसारा. नको त्या आठवणींचा पसारा. नको त्या प्रसंगांचा पसारा. मनात साचलेल्या भावनांचा पसारा. हा आवरायला काढण्याचा मुहूर्त लवकर काही निघत नाही. तो पसारा बघण्यासाठी आपल्याला वेळच नसतो. त्या पसाऱ्यातही आपण आपली वाट काढत मजेत जगत असतो. पण कधी कधी हा पसारा मनाला भलताच त्रास देतो. आपण गोंधळून जातो. त्या पसाऱ्यात हरवून जातो. मग जाणवतं की हा पसारा खूपच दुर्लक्षित झालेला आहे. याकडे वेळेत लक्ष द्यायलाच हवं. तरीही अजून काही दिवस पुढेही आपण दुर्लक्ष करतो. 

पण एखादा दिवसच असा उगवतो की हा पसारा आवरण्याची प्रचंड आवश्यकता आपल्याला जाणवते.

हा पसारा आवरण्याच्या काही नामी पद्धती आहेत खऱ्या. त्यातल्या कोणत्या पद्धती कोणासाठी उपयुक्त ठरतील आणि किती प्रमाणात ठरतील हे मात्र निश्चितपणे सांगता येणार नाही. 

मनाचा पसारा आवरायला मदत होते ती खास म्हणजे आपल्या मैत्रिणींची. त्यांच्याशी मन भरून बोललं ना की मनात विखुरलेले…साचलेले बरेचसे त्यांच्याशी बोलण्याच्या निमित्ताने मनातून बाहेर पडते आणि मन छान आवरून सावरून नीट स्वच्छ होतं. 

त्यामुळे मनाचा पसारा वाढला की आपल्या मैत्रिणीला जाऊन भेटावे. नाहीतर तिच्या आवडीचा एखादा छान पदार्थ घरी करून तिलाच बोलवून घ्यावे. 

मैत्रिणीला वेळ नसेल तर काय ?

हा प्रश्न येणारच हे मला माहित आहे. 

मैत्रिणीला वेळ नसेल तर मग अजून एक उपाय करून बघायचा. पायात जोडे घालून घराबाहेर पडायचे आणि दूरवर चालत चालत जायचे. चालता चालता मनातले विचार,आठवणी सगळं कसं हळूहळू बाहेरच्या गार वाऱ्याच्या झुळुकीबरोबर लहरत मनाच्या बाहेर पडतं. जरा दमल्यासारखं वाटलं तर एखाद्या झाडाखाली निवांत बसावं. झाडांच्या पानांची सळसळ… मध्येच शेपटी हलवत तुरुतुरु इकडून तिकडे उड्या मारणारी खार.. आपल्या पिलांसाठी चारा आणण्याच्या लगबगीत असणारी चिमणी बघत बसावे. आपल्या मनातील पसारा ती चिमणी आपल्या चोचीत घेऊन भुर्र उडून जाते…आपल्याही नकळत! 

किती गारवा असतो बाहेर.. नाही जमत प्रत्येक वेळी बाहेर जाणं. 

वाटलंच होतं मला असं कोणीतरी म्हणेल….

मग एखादा शांत कोपरा बघावा घरातला. कागद आणि पेन घेऊन बसावं. पेन लिहिता होईस्तोवर टक लावून बघत रहावा तो कोरा कागद. थोड्यावेळाने लक्षात येतं की पेनाच्या शाईत हळूच शिरला आहे मनातला पसारा. हळूहळू उतरत चाललाय तो कागदावर शब्दांच्या डोलीतून. काही वेळाने  मोकळे वाटू लागते मनाचे आभाळ.

काही नसेल जमणार तर मग भरपूर घरकाम करावे. हे घास… ते धुवून स्वच्छ कर…ते छान पुसून ठेव…याच्या घड्या करून ठेव…असं काही बाही काम करावं घर आरशासारखं लख्ख करावं. लक्षात येतं की मन देखील स्वच्छ झालं आहे घरासारखंच! 

 यापैकी काहीच जमले नाही तर आवडती गाणी लावावी. दोन-तीन गाणी ऐकली की पुढच्या गाण्यात मन स्वतःला अलवारपणे गाण्यात सोडतं. एखादं लेकरू पावसाच्या पाण्यात कागदी नाव सोडतं ना…  अगदी तसं!

ही झाली आपल्या सामान्य व्यक्तींची गोष्ट.

कलाकारांची मात्र बातच काही और! 

ह्याच पसाऱ्यातून कवी नेमके शब्द शोधून काढतात आणि त्या पसाऱ्यातूनच एक सुंदर कविता कागदावर उतरून येते.

चित्रकाराच्या मनातील हा पसारा रंगरेषांचे रूप धारण करून कागदावर अंकित होतो आणि जग त्याला निरखत राहतं.

एखाद्या संगीतकाराच्या मनात कुठल्या कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये मधुर चालीचे  नाद विखुरलेले असतात. संगीतकार त्यांना गुंफून एक सुंदर नादमय गीत बांधतो. मग ते गीत त्याचं न राहता प्रत्येक रसिकाच्या मनात जाऊन बसतं कायमचं! 

अशा व्यक्तींच्या मनातील पसारे कोणत्यातरी कलाकृतीला जन्म देणारे असतात.

कलाकारांच्या मनातील पसाराचे पिसारे होतात…त्यांचे मन मोर होतात!

मग कधी घेताय तुमच्या मनातील पसारा आवरायला? 

 
 
 
 

लेखक

  • अपर्णा शेंबेकर

    अपर्णा शेंबेकर या नागपुरातील सोमलवार शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

Post navigation

Previous: *प्रस्थान*
Next: धांदरटपणा की कामाचा ताण 
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

gumohor-water
  • ललित

आत्मबल – कवि वि.दा.सावरकर

ऐश्वर्या डगांवकर मे 28, 2026 0
gumohor-water
  • ललित

साप्ताहिक लेखन

ऐश्वर्या डगांवकर मे 21, 2026 0
WhatsApp-Image-2026-05-18-at-5.38.42-PM.jpeg
  • ललित

माणूस बदलतो की फक्त त्याचे मुखवटे बदलतात?

वर्षा पतके थोटे मे 18, 2026 0

ताजे लेख

  • आत्मबल – कवि वि.दा.सावरकर
  • साप्ताहिक लेखन
  • माणूस बदलतो की फक्त त्याचे मुखवटे बदलतात?
  • खिडकीतले आकाश
  • श्रावणबाळ!

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

gumohor-water
  • ललित

आत्मबल – कवि वि.दा.सावरकर

ऐश्वर्या डगांवकर मे 28, 2026 0
gumohor-water
  • ललित

साप्ताहिक लेखन

ऐश्वर्या डगांवकर मे 21, 2026 0
WhatsApp-Image-2026-05-18-at-5.38.42-PM.jpeg
  • ललित

माणूस बदलतो की फक्त त्याचे मुखवटे बदलतात?

वर्षा पतके थोटे मे 18, 2026 0
gumohor-water
  • ललित

खिडकीतले आकाश

ऐश्वर्या डगांवकर मे 14, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.