गोष्ट अगदीच काही जुनी नाही …..
श्री दत्त जयंती चा दिवस. अस्मादिक सर्व MBBS (म्हणजे मियाँ बीवी बच्चो समेत) दत्त मंदिरात दर्शनाला गेलो होतो. दर्शन, प्रसाद घेणं झालं. घरी जाताना आमच्या पुढच्या पिढी कडून (वय वर्षे ६ व ७) प्रश्नाची सरबत्ती सुरु झाली. पहिला बॉल, फुल्ल लेंग्थ डिलिव्हरी, “बाबा, दत्तात्रेयांना ३ मुखं का?” बॉल टप्प्यात आला होता. सरळ सीमापार फेकला. म्हणालो, “ब्रह्मदेव, नारायण आणि महादेवाचं एकत्र प्रतीक आहेत.” दिलेल्या उत्तरांनी समाधान झालंय ह्याची खात्री करून घेतली. पुढचा चेंडू अजून जोरात आला, “मग बाबा त्यांचा जन्म कसा झाला?” आता सरळ हाफ पीच येऊन सिक्सर होता. घर येईपर्यंत पूर्ण गोष्ट सांगून झाली. समजल्या सारखी वाटली. पुढचा प्रश्न मात्र टो क्रशर योर्कर होता. “बाबा, त्या अत्रि ऋषीं च्या बायकोला अनुसूया (असूया नसलेली) ला नग्न भिक्षा वाढायला देवांनी कसं काय म्हटलं? आपल्या आईला असं कोणी म्हटलेलं चालेल का? बरं समजा देवांनी म्हटलं असं समजूया…. मग पतिव्रतेला असं मानवेल तरी कसं? खरंच मोठ्या देवांना लहानस बाळ कसं काय केलं असेल?”
आमचा त्रिफळा चूर्ण…..
प्रश्न खराच विचार करायला लावणारा…. श्रद्धा देवावर पूर्ण आहेच, पण वैज्ञानिक दृष्ट्या प्रश्न पण नाकारण्यासारखा वाटला नाही. मग उत्तर कसं द्यायचं ? अध्यात्म आणि संदर्भ ग्रंथांप्रमाणे सांगून चालणार नव्हतं …. शंका दडपून टाकायची नव्हती आणि रूपकात्मक आणि इतर पद्धतीने सांगून त्या लहान वयाला उमगलं असतं हे समजणंच चुकीचं होतं …. नंतर सांगतो म्हणून तात्पुरती वेळ मारून नेली खरी पण….. प्रश्न बोचरा होता…. उत्तरं शोधली, ती सगळी लहान मुलांना पटण्यासारखी नव्हती. चमत्कारांचें विज्ञान आणि विज्ञानाचा चमत्कार ह्यात कुठेतरी गोंधळ उडाला होता….
शेवटी मीच माझ्या आईला विचारलं… तिनी पण अगोदर ठराविक साच्यातली उत्तर दिली. पण जेव्हा हा प्रश्न तिच्याच नात नातवानी विचारलाय असं कळलं तेव्हा तिनी सोप्पं उत्तर दिलं …..
ती म्हणाली, “सगळेच आपापल्या ठिकाणी बरोबर आहेत. आपणच कुठेतरी अर्थ लावायला चुकतोय असं वाटतंय. म्हणजे बघ नं … त्रिदेव परीक्षा घ्यायला आलेत. पतिव्रता अनुसूयेपुढे पेच पडला. नग्न भिक्षा कशी वाढणार? मग नक्की काय घडलं असेल? कशी काय भिक्षा वाढली असेल?”
नग्न भिक्षा….. ह्यातच कुठेतरी मेख होती …
सहज आई म्हणाली, जाऊ दे, अगोदर सांग कच्चा चिवडा खातो? की नुसतं श्रीखंड देऊ? की मस्त सोलकढी घेणार?
मला कळेचना की अचानक प्रश्नाला बगल देऊन हे काय नवीन?
आई हसली. म्हणाली, “अरे लक्षात येतंय का? हे सगळे पदार्थ अग्नीचा वापर ना करता तयार होतात. एक परीनं नग्न, अग्नी नसलेले पदार्थ आहेत हे….. “
ताबडतोब उजेड पडला…. अग्नी चा वापर न करता केलेले….. नग्न….. शक्यता नाकारता येईल? नवीन काहीतरी कळतंय …. सांगायला, समजावयाला सोप्पं, पटायला सहज आणि मुलांना लगेच क्लिक होईल असं …..
ताबडतोब करायला बसलो…. नग्न आणि बघता बघता नो फायर कूकिंग चे शेकडो पदार्थ सापडले…. गोपाळकाला, दूध पोहे, कच्चा चिवडा, गूळ पोहे, झालमुडी, सातू लाडू, मेतकूट लाडू, सातू-दूध, दडपे पोहे, कच्ची उसळ, ताकातली लापशी, सोलकढी, तिवळ, श्रीखंड, पियुष, मठ्ठा, रायते, शेकडो प्रकारच्या कोशिंबिरी, लोणचे भिजवलेल्या डाळींचे पदार्थ (कैरीडाळ इ.), अनेक चटण्या, मिठाया, जसेकी अंजीर लाडू, खजूर लाडू, विविध सुके मेवे, अनेक सरबते…. यादी वाढतच जाणार…… आणि शेवटी तड लागलेल्या पोटासाठी त्रयोदशगुणी तांबूल….. सगळेच पदार्थ अग्नी न वापरता केलेले…. एक प्रकारे नग्नच…..
“नग्न भिक्षा”….. असं इंटर्प्रिटेशन करता येईल? असं असेल? कदाचित असेलही…. कदाचित नसेलही …. पण ह्यांनी माझा सनातन धर्म, संस्कृती, रंजक पद्धतीनं का होईना, माझ्या मुलांपर्यंत सहज सुलभ जातेय न….. ते मला जास्त महत्वाचं ……
बघा पटतंय का?