“अहो, शनिवारी अण्णांकडे जायचंय बरं?” बायकोने निघताना आठवण करून दिली.
“हो, हो. तसं मला वाटतंय की आपण थोडं लवकरच निघू. आणि त्यांच्यासाठी काही भेटवस्तू घ्याव्या लागतील. ते नुकतेच चार धामांची परिक्रमा करून आले आहेत. त्यामुळे आपल्याकडून काहीतरी दिलं पाहिजे. “
“हो ना? आता बघा ना, जवळपास 4-5 महीने झाले असतील आपली भेटच नाही झाली.”
“हो. शनिवारी नक्की जाऊ आपण.”
खरं तर अण्णा म्हणजे अण्णासाहेब धबडगावकर. असं मोठ्ठं, लांबलचक नाव असणारा हा बारीकसा, बुजरा माणूस.
अण्णा २ वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. त्यांना दोन मुलं—एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा बंगळुरूला, तर मुलगी हैदराबादला; दोघंही आपापल्या क्षेत्रात चांगल्या पदावर काम करत होती. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या काहीच चिंता नव्हती.
स्वतः अण्णा हेडक्लर्क म्हणून निवृत्त झाले होते. त्यामुळे त्यांना निवृत्तीचे पैसे मिळाले होते. निवृत्तीनंतर त्यांनी आणि काकूनी फिरायचे ठरवलं. त्यानुसार ते दोघं विविध ठिकाणी फिरायलाही जाऊ लागले होते.
अण्णा आणि मी पूर्वी एकाच कॉलनीत राहत होतो. आमची ओळखही तशी खूप जुनी होती.
अण्णा म्हणजे अत्यंत धार्मिक स्वभावाचा माणूस. देवपूजा, जप, वाचन, तीर्थयात्रा—या सगळ्यात त्यांना मनापासून रस होता.
पण पुढे मुलं वेगवेगळ्या ठिकाणी शिकायला गेली आणि नंतर बाहेरगावीच नोकरीला लागली. त्यामुळे एवढ्या मोठ्या, सहा खोल्यांच्या घरात दोघांनीच राहायचं कसं, हा एक प्रश्न होताच.
त्यात घराची डागडुजी, देखभाल, झाडलोट, पुसणे—ही सगळी कामं वयानुसार जमेनाशी झाली होती. आणि कामवाली बाईच्या हातचं काम काकूंना अजिबात आवडत नव्हतं.
शेवटी अण्णांच्या मुलांनी ठरवलं की, आई-बाबांसाठी एक छोटासा १ BHK फ्लॅट घ्यायचा, म्हणजे अण्णा आणि काकू दोघांनाही व्यवस्थित राहता येईल. आणि जेव्हा मुलं भेटायला येतील, तेव्हा गरज पडली तर ते हॉटेलमध्येही राहू शकतील.
त्यावेळी त्यांच्या मुलासोबत—म्हणजे shridhar सोबत—बसून अण्णा आणि काकूंशी व्यवस्थित बोलण्याचं, त्यांची समजूत काढण्याचं आणि त्यांना पटवून देण्याचं काम मीच केलं होतं. अर्थात त्याचा कुठे गाजावाजा केला नव्हता. पण अण्णांना ते माहीत होतं.
अण्णांचे आणि आमचे संबंध अगदी घरच्या माणसांसारखे होते. खरं तर आमच्या वयात जवळजवळ तीस वर्षांचं अंतर होतं. पण का कुणास ठाऊक, माझी आणि अण्णांची चांगलीच गट्टी जमली होती.
अर्थात, त्यांची भक्ती, पूजाअर्चा, स्वामींवरील नितांत श्रद्धा आणि माझा स्वभाव—या दोन्हींत बरंच अंतर होतं. तरीही आमच्या मैत्रीत त्याचा कधीच अडथळा आला नाही.
अगदी जातानासुद्धा, “चारधाम यात्रा करून येतो,” असं म्हणूनच ते निघाले होते. पण का कुणास ठाऊक, स्वामींनीच त्यांना बोलावलं असावं. आणि मग ते थेट उत्तर भारतातून गोव्याला पोहोचले.
आता गोवा म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते समुद्रकिनारे, पर्यटन आणि मौजमजा. पण अण्णा आणि त्यांचे स्वामी गोव्यात कसे काय पोहोचले, हे मात्र एक कोडंच होतं.
कधीही अण्णांच्या घरासमोरून गेलं, की प्रसन्न वाटायचं.कारण घरात काही ना काही मंत्र, सूक्त किंवा अभंग सुरूच असायचे. विशेषतः पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातील अभंग, किंवा पुरुषसूक्त, श्रीसूक्त आणि विष्णुसहस्रनाम.त्यामुळे कोणी आलं की त्यांना लगेच लक्षात यायचं की हे अण्णांचं घर आहे. घरात कमालीची स्वच्छता आणि टापटीप. अण्णा आणि काकू दोघेही घर अगदी नीटनेटके ठेवायचे.
शनिवारी आम्ही थोडं लवकरच निघालो. काकूसाठी एक छानशी साडी, अण्णांसाठी एक धोतर आणि सोबत थोडी मिठाई घेऊन आम्ही अण्णांच्या अपार्टमेंटपर्यंत पोहोचलो.
बरेच दिवस झाले होते, मी अण्णांकडे गेलो नव्हतो. आजकाल इतक्या नवीन इमारती उभ्या राहतात की नेमकी कोणती इमारत, हे माझ्याही लक्षात नव्हतं. पण बायको सोबत होती. तिने व्यवस्थित रस्ता दाखवला.
मी भराभर जिना चढत पहिल्या मजल्यावर पोहोचलो. दारासमोर उभा राहिलो आणि बेल वाजवणार, एवढ्यातच…आतून आशा भोसले यांच्या आवाजात “जब छाए मेरा जादू, कोई बच न पाए…” हे गाणं ऐकू आलं.
मी एकदम दोन पावलं मागे सरकलो. क्षणभर वाटलं, आपण बहुतेक बिल्डिंगच चुकलो… किंवा निदान मजला तरी चुकला असावा. पण दाराच्या बाजूलाच अण्णांच्या नावाची पाटी स्पष्ट दिसत होती.
मला काहीच कळेना. चुकून पाटी दुसऱ्याच दारावर लावली गेली होती का? की अण्णांनी फ्लॅट बदलला होता? मनात एकापाठोपाठ एक प्रश्न उभे राहिले.
मी याच विचारात असतानाच बायकोही वर आली. तिने काहीही विचार न करता धाडकन बेल वाजवली… आणि पुढच्याच क्षणी तीही थबकली.
“अरे… हे कोणतं गाणं? खरंच अण्णांचंच घर आहे ना? की आपण दुसऱ्याच दारात आलो आहोत?”
काही क्षणांतच दार उघडलं.
“या, या… आत या!” असं हसत म्हणत काकूंनी आमचं स्वागत केलं.
मला काहीच कळेना. ज्या घरात कायम स्तोत्रं, मंत्र आणि अभंगांचे स्वर घुमत असायचे, त्याच घरात आज आशा भोसले यांचं असं तडकतं-फडकतं गाणं ऐकू येत होतं. हा बदल माझ्यासाठी अगदीच अनपेक्षित होता.
मी काकूंना खुणेनेच विचारलं. पण काकू काही बोलायच्या आधीच अण्णा बाहेर आले.
“अरे, या… या… या! बऱ्याच दिवसांनी भेटतोय आपण.”
मी अण्णांकडे पाहतच राहिलो. गोव्याला खास घालतात ना, तसा नारळाची झाडं, पानं, फुलं छापलेला टी-शर्ट आणि खाली साधा पायजमा.
आयुष्यात या माणसाने धोतर आणि बंगाली शर्ट यांशिवाय दुसरा पोशाख कधी घातलेला मी पाहिला नव्हता. आणि आज ते माझ्यासमोर टी-शर्ट आणि पायजम्यात उभे होते.
मी नकळत डोळे चोळले. क्षणभर वाटलं, मी खरंच जागा आहे की स्वप्न बघतोय?
माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून अण्णा हसले.
“अरे अरे… एवढं काही झालेलं नाही. मी अण्णाच आहे! काही घाबरू नकोस.”
“काय अण्णा? गोव्यात गेल्यावर हे कपडे कॉम्प्लिमेंटरी म्हणून मिळाले का? आणि हे आशाबाईंच्या गाण्याचं काय प्रकरण?”
अण्णा हसत म्हणाले, “अरे, ये… सगळं सांगतो तुला. आधी कोकमचं सरबत घे. खास गोव्याहून आणलं आहे.”
इतक्यात काकूंनी सरबताचे ग्लास आणून समोर ठेवले. सरबताची चव तर फारच जबरदस्त होती.
सरबताचे दोन घोट घेताच अण्णांनी अचानक विचारलं,
“काय रे, तू कधी नाचला होतास का?”
मला काहीच कळेना. नाच… आशा भोसले यांचं गाणं… अण्णांचा हा गोव्याचा पेहराव… नेमकं चाललंय तरी काय?
पण अण्णा अजूनही गालातल्या गालात हसत होते.
मी म्हटलं, “हां लहानपणी नाचलो असेन. आणि आजकाल काय… गणपती, एखादं लग्न किंवा फार तर होळी—अशा वेळीच नाचणं होतं. बाकी तसा काही चान्सच मिळत नाही ना!”
“ते ही खरंच म्हणा.” अण्णा मिश्किलपणे हसत होते.
“काय अण्णा, माझी मजा घ्यायला बोलावलंय का? म्हणजे तुम्ही तिकडे छान एन्जॉय करून आलात, आणि आता आमची मजा घेताय?”
अण्णा म्हणाले, “अरे, मी खरंच विचारतोय तुला. खरंच नृत्य करायला आवडेल का?”
'नृत्य' हा शब्द ऐकताच मला थोडंसं हसू आलं.
मी म्हणालो, “अण्णा, मी कलाकार नाही! नाचणं हा प्रकारच आम्हाला कधी जमणार नाही. एखाद्या गाण्यावर थोडंफार हलता येईल, पण नृत्य म्हणजे… ते काही आपल्या आवाक्यातलं नाही.”
“अगदी मीसुद्धा असंच म्हणायचो… स्वामी स्वरूपानंदांना भेटायच्या आधी. पण एकदा स्वामींना भेटलो, आणि सगळंच बदलून गेलं.”
“पण अण्णा, तुम्ही तर चारधाम यात्रेला जाणार होतात. मग मध्येच हा गोवा कसा काय?”
अण्णा हसले.
“अरे, त्याचीच तर गंमत आहे.
आम्ही चारधाम यात्रेची तिकिटं काढून ठेवली होती. सगळी आरक्षणं झाली होती. त्याचबरोबर स्वामी स्वरूपानंद त्या वेळी हरिद्वारला असणार होते, म्हणून त्यांच्या भेटीसाठी हरिद्वारचंही आरक्षण करून ठेवलं होतं.
पण निघायच्या अवघ्या आठ दिवस आधी स्वामींचा फोन आला. ते म्हणाले, ‘मी आता हरिद्वारहून निघतोय. काही ठिकाणी जाऊन आठ-दहा दिवसांनी गोव्याला पोहोचेन. तुम्ही तिथेच या.’
मला थोडं आश्चर्य वाटलं. स्वामी… आणि गोवा?
नंतर कळलं की गोव्यात त्यांचा एक आश्रम आहे. कदाचित त्यांनी मुद्दाम आम्हाला तिथे बोलावलं असावं.
मग आम्ही चारधाम यात्रेचं सगळं आरक्षण रद्द केलं आणि गोव्याचं आरक्षण केलं.
आता मला माहीत होतं, की मी जर लोकांना सांगितलं असतं, ‘आम्ही गोव्याला चालले आहेत,’ तर त्यावर किती गदारोळ झाला असता! त्यामुळे आम्ही कोणालाही काहीही न सांगता गुपचूप गोव्याला पोहोचलो.
पहिले एक-दोन दिवस स्वामींच्या शिष्यांसोबत तिथली मंदिरं पाहिली. गोव्याचं वातावरण इतकं सुंदर होतं! कुठे गडबड नाही, गोंधळ नाही, गर्दी नाही. सर्वत्र स्वच्छता आणि शांतता.
त्यामुळे गोव्यातील ती मंदिरं इतकी भावली, की तुला काय सांगू! असा अनुभव मला याआधी कधीच आला नव्हता.”
“अरे वा! खूपच सुंदर. पण त्याविषयी आपण नंतर बोलू. तुम्ही स्वामी स्वरूपानंदांबद्दल काहीतरी सांगत होतात ना?”
“हो… तेही सांगतो. पण थोडा धीर धर ना!”
क्रमशः
# सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६