शीर्षक वाचून कदाचित भुवया उंचावल्या असाव्यात बहुतांश जणांच्या, किंवा प्रमाण मराठीच्या बाहेरचं काहीसं नजरेस खुपू शकतं अगदीच. तरीसुद्धा “ये हृदयीचे ते हृदयी” नीट पाेहचावं म्हणून हा प्रपंच …
तसं ‘चिल्लर’ या शब्दाच्या आकारावरून त्याला चिल्लर समजण्याची चूक आपण करू नये असं मला वाटलं आणि तसं वाटण्यामागचं कारणही चिल्लर नाही बरं का!
तर भल्या पहाटे उठून, आवरून म्हणजे अगदी कोंबडा आरवण्याच्या आधीच आवरून आपल्या लाडक्या परिवहन महामंडळाच्या सुंदर लालपरीमध्ये बसल्यानंतरची गोष्ट. दिवसाच्या पहिल्या तासाला लांब पल्ल्याच्या लालपरीमध्ये बसल्यानंतर अगदीच चिल्लर म्हणजेच छोट्या पल्ल्याच्या गावाचं तिकीट काढताना चक्क पाचशे ची नोट पुढे केल्यानंतर आपल्या लाडक्या लालपरीमध्ये आपल्यासारख्या चित्र विचित्र जीवांना गंतव्य स्थळी नीट वाहून नेणाऱ्या वाहक मामांच्या तोंडून तांडव नृत्याला शोभेल असे जे गाणे पहाटेच्या भूपाळीच्या ऐवजी बाहेर पडते त्याच्या मुळाशी असलेला मूलभूत प्रश्न म्हणजे – चिल्लर. वाहकावरून आठवलं – विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या वाहकाचं काम किती सोपं – एकाच आकाराचे, गुणधर्माचे कण एका सरळ रेषेत, एका विशिष्ट ठिकाणी वाहून न्यायचं की झालं. नाही तर आपले लालपरीचे वाहक – तऱ्हेतऱ्हेच्या स्वभावाचे, विचारांचे तऱ्हेतऱ्हेचे प्रवासी, तऱ्हेतऱ्हेच्या गावाहून बसणार, तऱ्हेतऱ्हेच्या गावी उतरणार – पण एक तऱ्हा मात्र कायम – चिल्लर न ठेवणे, असेल सोबत तरीसुद्धा जनाची तर नाहीच, मनाची सुद्धा न बाळगता चक्क नाही म्हणायचं. आता अशा परिस्थितीत वाहक म्हणून कर्तव्य पार पाडणे म्हणजे काय चिल्लर काम आहे का? त्यातल्या त्यात एखादा तिकिटाचे अगदी सत्तेचाळीस रुपये हातावर टेकवणारा देवमाणूस चिल्लर गणती, बाकी सर्व ठोकमध्येच रोख बाळगणारे. बिचारे वाहक मामा.
आता आपण परिवहन महामंडळात आहोत तर आणखी एक प्रसंग बघूयात – आता दुपार झालेली आहे. नाकातोंडाला बांधलेल्या महिला आपल्या शरीरयष्टीच्या दीड पट मोठा फडा घेऊन संपूर्ण बस स्थानक स्वच्छ करत आहेत. आणि बऱ्यापैकी सर्व स्वच्छ होतच आलेलं असताना अशाच एका थांबलेल्या लालपरीतली महिला तिचं चर्वण झाल्यानंतर रिकामं पाकीट अगदी सहज ‘ती मी नव्हेच’ च्या आविर्भावात बाहेर आवारात फेकते. ती सफाई कर्मचारी पुन्हा जाऊन तो कचरा उचलून आपल्या कामाला लागते. हेच जर आपल्या घरी झालं असतं तर? किती जणांना आपल्या तोंडाचा पट्टा आवरता आला असता?
तर असं सगळं निरीक्षणात आल्यानंतर माझ्या मनात प्रश्न निर्माण होतो – अगदी चिल्लर – म्हणजे क्षुल्लक बरं का! तर प्रश्न असा की आपल्याला प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध ‘येन केन प्रकारेण’ बंड करण्याची सवय, खोड अथवा नाईलाज जो जडला आहे त्यातून आपण ही व्यवस्था चालवायला हातभार लावणारे, किंबहुना ती जीवंत ठेवणाऱ्या आपल्यासारख्या सामान्य माणसांना त्रास देण्याचे वळण आपण लावून घेतले आहे आणि ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी चिल्लर अजिबातच नाही. एरवी दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ अगदी सहज शोधणारे आपण तत्परतेने सुटे पैसे सोबत का ठेवू नये? नाली सफाई कर्मचाऱ्यावर ती तशी स्वच्छ करण्याची वेळ आपण का आणावी? रोज सकाळी रस्ता आणि दिवसभर वारंवार बस स्थानक स्वच्छ करण्याची वेळ आपण का आणावी? अगदी आपल्याच घरातल्या महिला वर्गाला आपल्या उष्ट्या ताटाभोवतीची शिते उचलून, खरकटे हात धुतलेले पाणी सांभाळत ते ताट बाहेर टाकण्याची कसरत तरी का करायला लागावी? बँकांमध्ये पेनाला दोरीने, पाणपोईवरच्या पेल्यांना स्टीलच्या साखळीने बांधून ठेवण्याची वेळ का यावी? ‘येथे थुंकु नये’ या वाक्यावर पानाच्या पिचकाऱ्या आणि नो पार्किंगच्या समोर गाड्या का बघायला लागाव्या?
उदाहरण देत बसलं तर हातून एखादं महाकाव्य घडायचं. नकोच ते. आपण माणूस म्हणून असलेलं सौजन्य कुठे हरवून बसलो आहोत? मुळात ते तसं आपल्या ठायी होतं का हा प्रश्न भंडावून सोडू लागलाय. प्राण्यांना तरी निसर्गाचे नियम असतात, वळण असतं. ते त्यांच्या संस्कारांच्या बाहेर क्वचित जात असावेत. आपण बुद्धीच्या जोरावर मांडलेल्या पसाऱ्याला आवरण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि संसाधने वाया घालवतोय याचा खेद तर दूरच साधी जाणीव सुद्धा आपल्यातल्या बहुतेकांना नसावीच.
आज आपल्यातले बहुतांश लोक फक्त चिल्लरपणा करणारे निगरगट्ट अथवा बेफिकीर तरी बनून राहिलो आहोत आणि तरीही मोठेपणाची शेखी मिरवत आहोत ही तशी चिल्लर गोष्ट अजिबात नाहीय.
आता हे सगळं वाचून आपल्या संवेदनशील मनाला वेदना झाल्या असतील तर अगदीच चिल्लर व्यक्ती समजून होता होईतो ‘मज पामराला क्षमा करावी’ अन् चुकून कोणाला वाटलं की आपण चुकतोय तर ‘देर आए दुरुस्त आए’…
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जुलै२०२६