मोहमयी जीवन असताना आज त्याच्या विरुद्धार्थी *”निर्मोह”* हा शब्द घेऊन लिहितो आहे. एखाद्या वस्तूबद्दल वाटणारे आकर्षण म्हणजे मोह. त्यामुळे त्याचा संग्रह करण्याची वृत्ती बहुतेक सर्वांचीच असते आयुष्यभर आपण त्या गोष्टी जमवत असतो जसे की पैसा, मालमत्ता शेअर्स , प्रतिष्ठा आणि माणसही. आपल्याला चांगलं म्हणावं याच्यासाठी अविरत धडपड सुरु असते.
“कष्टाने पै पै बाजूला सारून जमवलेल्या या वस्तूचा मोह का आणि कशासाठी सोडायचा???”
हा प्रश्न तुमच्यासारखा माझ्याही मनात आहे.
आजचे विचार तरुण मंडळीना आज पटणार नाही, पण आयुष्याच्या उत्तरार्धात नक्की पटतील.
काहीतरी लिहिण्यासाठी कुठेतरी कथाबीज वा काव्यबीज तुम्हाला दिसतंय आणि मग कल्पना आणि प्रतिभेने नवीन कथा लेख वा काव्य जन्म घेते. सुरपाखराच्या मंचावर प्रकाशित झालेले आपल्या सर्वांचे अनेक लेख मला अजून काहीतरी लिहिण्यास स्फूर्ती देतात.
वाचण्यासाठी सर्वात सुंदर पुस्तकांपैकी एक म्हणजे टॉड हेन्री यांचे “डाय एम्प्टी”. मी अजून ते वाचले नसले तरी त्याचा सारांश माझ्या वाचण्यात आला होता. एका मित्राने पोस्ट फॉरवर्ड केली होती ती. खूप विचारप्रवर्तक होती ती. कवितेसाठी आणि आजच्या लेखाचे बीज त्या पोस्ट मध्ये मला मिळाले होते.
एका व्यावसायिक मिटिंग मध्ये संचालकाने उपस्थितांना विचारले: “जगातील सर्वात श्रीमंत भूमी कोणती?”
तेव्हा एकाने उत्तर दिले: “तेल-समृद्ध आखाती देश.”
दुसऱ्याने भर घातली: “आफ्रिकेतील हिऱ्यांच्या खाणी.”
त्यावर संचालक म्हणाले: “नाही, ती जागा म्हणजे स्मशानभूमी”.
तेथे उपस्थित सर्वांनी आश्चर्याने भुवया उंचावल्यात.
सर्वांचे चेहऱ्यावरचे आश्चर्य पाहून त्यांच्या मनातल्या प्रश्नाचे निराकरण करताना तो संचालक म्हणतो ,
“होय, तीच जगातील सर्वात श्रीमंत भूमी आहे; कारण तिथे पंचतत्वात विलीन झालेल्या लाखो लोकांनी आपल्यासोबत अनेक मौल्यवान कल्पना नेल्या, ज्या कधीच जगासमोर आल्या नाहीत किंवा त्यांचा इतरांना काहीच लाभ झाला नाही. त्या सर्व कल्पना त्यांच्यासोबतच स्मशानभूमीत नष्ट झाल्या.”
या उत्तराने प्रेरित होऊन त्या मिटिंग मधील एक श्रोता टॉड हेन्री यांनी “Die Empty” हे पुस्तक लिहिले.पूर्ण जगभरात खूप प्रती खपल्यात या पुस्तकाच्या.
त्यांच्या पुस्तकातील सर्वात सुंदर विचार म्हणजे,
” तुमच्यातील सर्वोत्तम गोष्टी स्वतःमध्येच घेऊन अंतिम प्रवासासाठी जाऊ नका.नेहमी ‘रिकामे होऊन जाण्याचा पर्याय निवडा.” आणि हो, “निर्मोही” झाल्याशिवाय हे शक्य नाही.
याचा खरा अर्थ असा आहे की, तुमच्यातील सर्व चांगुलपणा जगाला देऊनच जा. या जगातून जाण्यापूर्वी ते जगापर्यंत पोहोचवा.
जर तुमच्याकडे एखादी कल्पना असेल, तर ती प्रत्यक्षात आणा.
जर तुमच्याकडे ज्ञान असेल, तर ते इतरांना द्या.
जर तुमचे एखादे ध्येय असेल, तर ते साध्य करा.
प्रेम करा, वाटून घ्या आणि ते पसरवा; ते स्वतःमध्येच साठवून ठेवू नका.
चला, देण्यास सुरुवात करूया. आपल्यातील चांगुलपणाचा प्रत्येक कण बाहेर काढूया आणि तो सर्वत्र पसरवूया.
चला, या प्रवासाला सुरुवात करूया.
चला, आपण ‘रिकामे होऊन’ (सर्वस्व अर्पण करून) जाऊया.
आपण सर्वजण आयुष्याच्या मावळतीला नकळत असेच करतो आहे . काहीजणांनी साठी पूर्ण केली असली तरीही आपल्याकडे अजून बराच वेळ शिल्लक आहे.
चला, उरलेल्या वेळात आपले सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करूया. कारण कोणतीही गोष्ट करण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो.
कुटूंबवत्सल माणसाला मोह सोडणं अशक्य आहे,ज्यावर जीव जडला आहे प्रेम आहे ती माणसं त्या वस्तू सोडणं फारच कठीण आहे आणि मोह नसला तरच काही सहज वाटणं शक्य होते येते. नाहीतर एखादी जुनी वस्तूसुद्धा गृहिणीच्या हातून सहजासहजी दिली जाता नाही.आपल्याला बरोबर न्यायचे नाही ही भावना असली की ते देणे सहज जमते.
निसंग अन निर्मोह
पूर्णपणे अगदी खाली..
देवाच्या घरी जाताना
न्यायचे न काही..
कल्पना खूप सुंदर
जगताना आल्यात ..
जाताना सदैव मात्र
सर्वं त्या वाटव्यात ..
ध्येय प्रेम साधण्या
हा जन्म तो एकच..
पुनर्जन्म सर्वं ते खोटे
कर्माशिवाय बोलणे व्यर्थ..
प्रज्ञानाने समृद्ध
श्रीमंत या धरेवर..
शिष्यास ते देऊन
मुक्त व्हा चितेवर..
धनलक्ष्मी जीवनी
ज्यांना प्रसन्न जाहली..
सत्कार्या तिला देता
सार्थकता मिळाली..
जो न धरेल अंगी
हा वसा वाटण्याचा..
अटकेल उगाच जीव
त्रास जर्जर शरीराला..
शेवटी भेटतो राम
नक्की होईल सत्य..
जर वाटले सर्वानी
ज्ञान धन जे प्राप्त ..
वाटण्यासाठीच खरा
ईश्वराने दिला जन्म..
सत्कर्माने मिळवलेले
दान करा ते खुशाल..
सतर्क लवकर व्हा
देण्या न उशीर व्हावा..
आमंत्रण येण्याआधी
कार्यभाग हा उरकावा ..
जो हे कार्य साधतो
वाटून होतो तो श्रीमंत..
त्यागी दानशूर म्हणती
कुणी तयांना पूज्य संत..
जीवनाला चार आश्रमात विभागलेल्या आपल्या हिंदू संस्कृतीत शेवटच्या टप्प्यात,*” निर्मोही होऊन जे आहे ते वाटत चला. “* हाच संदेश दिला गेला आहे.
प्रत्येकाला आपला जीव प्यारा आहे त्यामुळे मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य स्वीकारण्यास कुणीच तयार नसतो आणि त्यामुळे अचानक आमंत्रण आलं की सर्व त्याच्याबरोबर त्याच्या कल्पना आणि विचारही जातात . भरपूर पैसा असूनही त्याची विल्हेवाट लावली नाही तो बँकेत अनक्लेम्ड राहतो. अशा कोट्यावधीच्या ठेवी बँकेत आजही आहेत. हे मात्र नक्की खरं आहे .