Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

पंचवटी

सायली कराडे जुलै 14, 2026 1 minute read
0
199607.png
– पंचवटी. पंचवटी म्हटलं की आठवते रामायणातली पंचवटी नाशिकजवळची. जी सध्या खरेदीसाठी प्रसिद्ध आहे.
– पण आमची पंचवटी म्हणजे अमरावती शहरातला पंचवटी चौक अगदी पहिल्यांदा नवख्या, खेडुताच्या मनात धडकी भरवणारा पण कॉलेजमधून किंवा इतर कुठूनही खोलीवर परततांना अगदी सुरक्षित वाटणारा.
पंचवटीवरील लोकांचं निरिक्षण करतांना दिवस अगदी सहज निघून जातो. किती प्रकारचे लोक – हौसे आणि गवसे असतात, नवसे मात्र नसतात! मुख्यत: शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी पंचवटी ही हक्काची आणि आपलीशी वाटणारी जागा. बाकी फार काही नाही तरी चायनीजच्या (इंडो-चायनीज म्हणावं लागेल) दोन-तीन गाड्या, चहा-नास्ता चाटच्या दोन-तीन गाड्या, नारळपाणी, मोसंबी रस, ऑटोरिक्षा स्टँड, सिटी बस स्टॉप, स्वस्तातले वॉलेट्स आणि ‘दोन रुपयांत वजन करून मिळेल’ असा बोर्ड अशा असंख्य गोष्टींनी सजलेला पंचवटी चौक वरून जाणाऱ्या उड्डाणपुलासमोर जाम मिरवतो.
– साधारणत: दुपारी १० ते १२ च्या आणि संध्याकाळी ५ ते ७ च्या सुमारास निरनिराळ्या चित्रविचित्र गणवेशांमध्ये शाळा-कॉलेजला जाणारे-येणारे विद्यार्थी; बहुतेकांची राधानगर – गाडगेनगरला वस्ती. सोबतच तोंडाला फडके बांधून गाडीवरुन सुसाट फिरणाऱ्या भटक्या जमाती. पायी जाणाऱ्या होतकरू नि मेहनती विद्यार्थ्यांसाठी एकमेव अडथळा म्हणून राठी शाळेच्या एका रांगेत चालकाच्या आज्ञेत उभ्या असणाऱ्या स्कूल बसेस आणि बसच्या दरवाज्याजवळ चालकानं मारलेल्या पानाच्या पिचकाऱ्या. चाट आणि चायनीजच्या गाडीवरची गर्दी कॉलेजमधल्या लोकसंख्येपेक्षा जास्तच. भारताची एकंदर लोकसंख्या वाढत असली तरी ती कॉलेजमध्ये कमी का आढळते? हा सध्याचा ज्वलंत प्रश्न.
– संध्याकाळी पंचवटी दिव्यांच्या आरासीपेक्षा परतीच्या वाटेवर असलेल्या निरनिराळया रंगांच्या, ढंगांच्या बोलक्या पाखरांमुळे अधिकच आकर्षक, सुंदर नि जीवंत वाटते. तीन-चारच्या घोळक्यात एक-दुसरो के दिलो का दर्द, कुणाचे घरमालक कसे आहेत? आज मेसच्या डब्यात काय होतं? किंवा आता परत जाऊन खिचडी लावावी लागणार, आज रात्री जागरण-उद्या सबमिशन आहे अशा छोट्या-छोट्या गोष्टींपासून ते ‘विदर्भ वेगळा व्हावा की नको’ पर्यंत चर्चा रंगतात. पंचवटीतल्या भिंतींवरचा ‘यह आजादी झूठी है, देश की जनता भुखी है’ हा नारा घर सोडून शिक्षणासाठी बाहेर राहणाऱ्या जीवांना उगाचच दुखावून जातो. सकाळी याच पंचवटीवर एकत्र येणारी पाखरं सायंकाळी परततांना एकमेकांना इथेच सोडून आपापली वाट पकडतात – उद्या पुन्हा भेटण्यासाठी.
– अशाच एका संध्याकाळी पंचवटीवर पाऊस अवतरतो. एरवी पार्किंगसाठी आणि मदिराप्राशन करुन झोपलेल्या सुखी माणसांसाठी किंवा सणाच्या दिवशी हार-फुले विकणाऱ्यांचा छोटेखानी कारखाना असणारी उड्डाणपुलाखालची जागा माणसांनी गजबजलेली असते. तशात जीवनाचा आनंद लुटू पाहणारे काही जीव मात्र मनसोक्त भिजत, हसत-खिदळत जातांना पुलाखालच्या लोकांकडे बघून एक कीव करणारा कटाक्ष टाकतात; जणू काही त्यांनी गमावलेला आनंद यांना जाणवत असतो.
– आयुष्याचा स्ट्रगल पंचवटीवर उत्तमरित्या जाणवतो. कॉलेजमधून परततांना दिसणाऱ्या मोसंबी रस आणि नारळपाण्याची तहान खोलीतल्या बादलीतल्या कोमट पाण्याने भागवली जाते. शाळेमधली एक-दोन मुलं शाळा सुटल्यावर आपल्या सवंगड्यांना आपापल्या आई-वडिलांबरोबर घरी जातांना बघून केविलवाण्या नजरेनं आपल्या घरी जायच्या वेळेची वाट बघत बसतात. असाच कितीतरी वेळ निघून जातो. सिटी बसची वाट बघत ताटकळणारी गर्दी बस येताच जीवाच्या आकांताने धावते. एक पाय आत, एक पाय बाहेर अशा अवस्थेत लटकणारे कित्येक जीव घेऊन सिटी बस निघते. ट्रेनच्या जागी सिटी बस असली तरी आतले आणि बाहेरचे हा संघर्ष तसाच असतो. नारळपाण्याच्या गाडीकडे बघत जाणाऱ्या घोळक्यातला प्रत्येक जण एक दिवस आपण नारळपाणी नक्की पिऊ असे म्हणून एकमेकांना सुखावण्याच्या प्रयत्नात असतो. पायी-पायी जातांना पूर्वी खेड्यातली टयूशनही दूर आहे अशी तक्रार करणारे मात्र पंचवटीहून जयस्तंभ, राजकमल, गांधी चौक पायी भटकून येतात कारण वाचवलेल्या १० रूपयांत कुल्फी किंवा पाणीपुरी खायची असते ना! अख्खी अमरावती भटकून पंचवटीत आलं की अगदी हायसं वाटतं कारण इथून पुढचा रस्ता आपलाच असतो.
– असा हा पंचवटी चौक दिवसभराच्या कालावधीत एकूणच जीवन किती सुंदर आहे हे शिकवण्याची ताकद जवळ बाळगतो.
#सूरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६

लेखक

  • सायली कराडे
    सायली कराडे

Post navigation

Previous: निर्मोह
Next: राहिली नाही
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.