मुकी होत चाललेली घरं आणि त्यामुळे कुटुंबात होणारे बदल
१-महिला कामावर जातात त्यामुळे घराची भूमिका बदलते
२-सोशल मिडियाच्या आक्रमणामुळे कुटुंबातील संवाद खुंटला
३-कौटुंबिक मूल्ये आणि परंपरा सुद्धा बदलत आहे.
सर्वात मुख्य संवाद हीनता वाढल्याने घरं मुकी होत चालली आहेत.कुटुंब लहान झालं, संबंध कमी झाले.सणवार घरात एकत्र साजरे करण्यापेक्षा बाहेर जाऊन मित्रांसोबत पार्ट्या करणे किंवा बाहेरुन जेवण मागवून औपचारिक रित्या सण साजरे केले जातात.त्यामुळे घरात सर्वांनी मिळून स्वयंपाक करणे किंवा त्यावर चर्चा होत पंगती बसवणं हे सर्वच कमी झाले आहे. शिष्टाचार कमी झाला लाज-लज्जा कमी झाली .घरात खाणे कमी झाले पुस्तक वाचन कमी झालं. त्यावर चर्चा करणं कमी झालं. बहिण भावातील प्रेम कमी झालं.आनंद घटला आणि मन:शांती कमी झाली पाहुणे कमी झाले
सत्य कमी झालं सभ्यता कमी झाली मनो मिलन कमी झालं .एकमेकांप्रती समर्पण कमी झालं.मोठ्या माणसांबद्दलचा सन्मान कमी झाला .सहनशक्ती कमी झाली धैर्य कमी झालं. श्रद्धा-विश्वास कमी झाला.मदतीचा हात आखडता घेतला जातो.
ज्यामुळे जीवन सोपं होतं सरळ होईल अशा आणखी बऱ्याचशा गोष्टी कमी झाल्यात.पण त्यासाठी काय कारणं आहेत हे जाणून घेतलं पाहिजे संवाद हीनता पण वाढली आहे . विभक्त कुटुंब झाल्याने घरावर संस्कार करणारे वयस्कर व्यक्ती कमी झाल्या आहेत तरी आईवडिल आपल्या मुलांना सणावाराला नातीगोती जपणारे असतील तर संस्कार होतील.परंतु घरातील स्त्री नोकरीनिमित्ताने घराबाहेर पडली आणि काही प्रमाणात घरात दुर्लक्ष होऊ लागले परंतु नोकरी करणेही गरजेचं आहे.त्यामुळे सणावाराला तसेच रोज रात्री जेवण करताना मुलांची एकत्र बसून विचारपूस करणं आणि चार गोष्टी हिताच्या समजावणं हे
जरी केलं तरी खूप काही साधेल असं मला वाटतं.व्यवहारात इंग्रजी भाषेची गरज असली तरी आपले संस्कार देणं ही गरजेचं आहे .हे काम घरातील मोठ्यांचे आहे.पण त्यांनीच सर्व सोडतं घेतलं तर काम कठिणच आहे.
घरात वयस्कर व्यक्तींची उणीव–
पूर्वी घरांत उंबरठे आणि मोठी माणसं असायची. त्यामुळे घराचा कारभार मर्यादेत आणि धाकात चालायचा.कुठल्याही कार्याचा श्रीगणेशा करण्याआधी घरातील जेष्ठ मंडळीचा सल्ला घेतला जायचा. त्यांच्या अनुभवाचे सर्व विचार करायचे. त्यामुळे घरातील देवघरा नंतर महत्वाचे स्थान म्हणजे घरातील वयस्करांचे होते.आताची वास्तविकता पार वेगळी आहे. काळानुसार घरात गुळगुळीत फरश्या बसल्या आणि घरातील सदस्य घराच्या मर्यादा आपआपल्या सोयीने ठरवू लागले. स्वयंपाकघर काय अन् देवघर काय.. सगळीकडे घरभर चपला घालून फिरायला सुरुवात झाली.
मोठी माणसं नाहीशी होत आहेत त्यामुळे धाक नावाची गोष्ट सुद्धा लोप पावत चालली आहे. मर्यादा, धाक , शिस्त , संस्कृती इत्यादि प्रकारच्या या गोष्टी हल्ली व्हॉट्स ऍप वर सकाळी सकाळी वाचण्यापुरत्या राहिल्या आहेत.पूर्वी ह्याच गोष्टी, चालीरीती घरातील मोठी माणसे सांगायची. म्हणून घरात मोठी वयस्कर माणसे पाहिजेत. संध्याकाळी दिवे लावणीला शुभंकरोति – रामरक्षा- आरतीचे स्वर कानावर पडायलाच पाहीजेत. रात्री घरी उशिरा आल्यानंतर काळजीपोटी प्रश्नोत्तरं व्हायची.
रात्रीचं उरलेलं अन्न टाकून देण्याऐवजी त्याला फोडणी -फोडणी देऊन आणखी चविष्ट व चटपटीत बनवून सकाळच्या न्याहारीत कामी घेतलं जायचं.
मोजून-मापून खर्च कसा करायचा हे शिकवणारी मोठी माणसं घरोघरी असायची. चुकलं तर रागवायला आणि यश मिळाल्यास तोंड भरून कौतुक करायला पण पुढे सरसावयाची. एकाच छताखाली सर्वांना एकत्र पद्धतीत बांधून ठेवणारं, टिव्ही बंद ठेवून सर्वांनी सोबत जेवण कां करावं यामागचं कारण उत्तमरित्या पटवून देणारं, घराबाहेर पडतांना देवापुढचा अंगारा कपाळावर लावणारी, आनंदाच्या वेळी पटकन देवापुढे साखर ठेवणारी तर संकटाच्या वेळी आपल्यासाठी देवाला पाण्यात ठेवून माळ जपत प्रार्थना करणारी मोठी माणसं पाठीशी खंबीरपणे उभी रहायची.कसं कां असेना पण चुकल माकलं सांगणारं सावरणारं कुणी घरात हवं .ज्या झाडाला फळं-फुलं येत नाही त्या झाडाला आपण बिनकामी झाड म्हणतो. परंतु ते झाड फळ-फुलं जरी देत नसलं तरी निदान सावली तरी देतं.त्या सावलीसारखीच घरातील मोठी-वयस्कर माणसं असतात!
त्यांच्या असण्याचा आपल्याला खूप आधार असतो त्यांचे अस्तित्व आपल्यासाठी खुप मोलाचे असते. घरातून बाहेर पडतांना त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करून घेतलेला त्यांचा आशीर्वाद लाख मोलाचा असतो !