आज एकादशी होती. बाळाबाई भल्या पहाटे उठली. आज उशीर होऊन चालणार नव्हता देवळाच्या
अगदी पाय-यांजवळ जागा मिळायला हवी. नाहीतर त्या टवळ्या आधीच येउन बसायच्या. बाळाबाईनं मशेरी लावता लावता विचार केला. चहा केला तो घटाघट प्याली. तंबाखूचा बार भरला परसाकडे जाउन आली. दुर्गीला उठवल. आज तिलाही धुवायला हव होत. जवळच पाण्याचा पाईप फ़ुटला होता त्यातून पाण्याचा एक लांबलचक फ़वारा सतत उडे तिथेच जाऊन बाळाबाई आपली आंघोळ पांघोळ उरकत असे. तिच्या झोपडी पासून अगदी जवळच होता तो. लौकर गेल तर तिथ फ़ारशी गर्दीही नसे. उशीर झाला तर पाणी भरायला आलेल्या बाया दुर्गीला धुवायला देत नसत. मग वादावादी होई. कधी कधी एकच बादली पाण्यात दोघींचही उरकाव लागे. दुर्गीच्या गळ्यातली दोरी धरून बाळाबाई जाउ लागली. दुर्गीही निमुटपणे बाळाबाईच्या पाठोपाठ चालू लागली.
गेली तीन वर्षे तरी बाळाबाईचा हाच दिनक्रम होता. नगर जिल्ह्यातल्या दुष्काळी भागात तिचं माहेर होत. माहेर म्हणजे फ़क्त बापच. आई लहानपणीच गेलेली, बाळाबाई एकुलती एक.
पंधरा वर्षाची झाली आणि बापानं सासरच्या वाटेला लावल. नगर जिल्ह्यातल्याच पण बागायती भागात तिला दिल. धनी पस्तीशीतला होता. शिवाय त्याच पहिल लग्न झालेल,
ती बायको त्याच्यासोबतच रहात होती. मुलबाळ मात्र नव्हत. जमिनीचा छॊटासा तुकडा होता. नवरा बायको राबून खात होते. लग्न झाल आणि वर्षभरात बाप वारला. बाळाबाईच माहेर संपल.
नव-यानं दोन वर्ष वाट पाहिली. मुल होत नव्ह्त ते होईना, त्यात आणखी नव-याला दारुच व्यसन लागल. दिवसभर नशेत घरात लोळे. शेतावर जाणं नाही काही कामकाज नाही,
सार ठप्प. काहीकाळ दोघी सवतींनी कसबसं रेटल. पुढे सवतच तिच्यावर उलटली म्हणाली, ” तू अवदसा घरात आलीस आणि माझ वाटोळ झाल. चांगला हट्टाकट्टा धनी असा
दारुडा झाला मुलबाळ तर झालच नाही पण पोटचा घास देखील महाग झाला”. सवत खूप त्रागा करी, बाळाबाईशी भांड भांड भांडे. कधी उपाशीही ठेवी. घरातून हाकलून देण्याची भाषा बोलू लागली.
नवरा असा सदा न कदा दारुच्या धुंदीत, जगणं कठीण झाल. मग बाळाबाई एकटीच शेतावरच्या खोपटात राहिली. दिवसभर दुस-याच्या शेतात राबाव अन शिजवून खाव अस होऊ लागल.
पण एवढे कष्ट झेपेनात. एक दिवस तिनं विचार केला,खोपटात एक गाय उरली होती तिला घेतल आणि कोणालाच न सांगता पहाटे ऊठून शहराची वाट धरली माहेरच्या गावाला तिच कोणीच नव्हत,
मजल दर मजल करत नगर गाठल तिथं काही दिवस काढले. शेवटी एका वारक-यांच्या तांड्याबरोबर मुंबईत आली. बरोबर गाय होतीच.
भिक मागणे बरे वाटेना! पोट तर जाळायच होत. एक दिवस फ़िरत फ़िरत महालक्ष्मीच्या देवळात गेली तिथे तिला गाय घेउन बसलेल्या काही बायका दिसल्या.
मंदिरात येणारे भाविक त्यांना पैसे देत मग त्या बाया गाईला हिरवा चारा भरवत. तिच्याकडेही गाय होतीच मग ती ही तसंच करु लागली.
सुरवातीला तिथं बसणा-या इतर बायका तिला बसू देईनात पण त्यांना ही पुरुन ऊरली. मग शुक्रवार,मंगळवार- महाक्ष्मी , सोमवार-एकादशीला भुलेश्वराला,
बुधवार-गुरुवार गावदेवी अशी त्या त्या देवळाच्या बाहेर बसू लागली. गाईच नाव ठेवल ’दुर्गा’. स्वत: स्वच्छ राहू लागली. कपाळावर मोठं तांबड कुंकू लावे. गळ्यात काळ्या मण्यांची पोत घाली.
पैसे देणार-या भाविकाला आशिर्वाद म्हणून काय बोलायच ते देखील ईतर बायकांच पाहून शिकली.
चांगले पैसे मिळू लागले. शिल्लक पडली. त्यातून दूर एक झोपडं घेतल. त्यात दुर्गा आणि ती राहू लागली.
आजही एकादशी होती म्हणूनच लौकर ऊठून देवळात पोचायच्या घाईत ती होती.
आता बाळाबाईच बरं चालल होत. बरं म्हणजे दोन वेळच पोटाला मिळत होत, रहायला कसा का होईना, निवारा होता इतकच. हळूहळू तिची गि-हाईकही बांधली गेली.
ती बाळाबाईच्या गाईलाच चारा घालीत. आपल लहान मोठ काम झालं की खुष होऊन कधी अधिक पैसे किंवा क्वचित एखाद कापड, जुनी साडी अस बाळाबाईला देत.
आता बाळाबाईच्या आयुष्याला एक दिशा मिळाल्यासारखं झाल. जशी वाट मिळेल तस तिच आयुष्य आकार घेत होत हे खरं पण या नविन आकारात पूर्वीची भेसुरता नव्हती हे ही खरं होत.
पावसाळा सुरू झाला. धोधाट सरी कोसळू लागल्या. अफ़ाट मुंबई ला पावसाच्या तांडवानं सहज कवेत घेतल. गोरगरीबांचे हाल होऊ लागले. पावसाच मान या वर्षी जरा जास्तच होत.
अशा पावसात दुर्गीला घेउन देवळातही जाता येईना. दोन दिवस तर पावसाने कहर केला होता. झोपडीतली जमीन ओलीगच्च झालेली. त्या वर दुर्गी शांतपणे पडुन होती.
तिच्या अंगावर पावसाच्या धारा गळत होत्या. असेच दोन दिवस लोटले. दुर्गीचं काहीतरी बिनसल होत. ती काही खातपीत नव्हती. ’गारठली आसलं, बसुनच आहे म्हणून खावं वाटत नसल’
असा बाळाबाईनं विचार केला. पण दुर्गी गपगार पडूनच होती. ’खा बायो खा. ऊठ ऊठ’ बाळाबाई दुर्गीच्या पाठीवरून हात फ़िरवू लागली, तिची मान खाजवू लागली. पण दुर्गी जागची हलेना.
तिनं बाळाबाईकडे नुसत पाहिल. कदाचित बाळाबाईची असहाय्यता त्या मुक्या जनावरानं ओळखली होती. बाळाबाईच्या पोटात कालवाकालव झाली.
तिन दुर्गीला चारा भरवण्याचा प्रयत्न केला पण कसच काय! तिच हे असं बघुन बाळाबाईलाही घास जाईना. दोघींच अस्तित्व एकमेकीत गुंतलेल होत.
आणखी दोन दिवस गेले. आता दुर्गीच पोट फ़ुगल होत पाय ताठ करून ती निपचीत पडली होती. तोंडातून फ़ेस येत होता. ही लक्षणं काही चांगली नव्हती. बाळाबाई अस्वस्थ झाली.
काय कराव ते तिला सूचेना. दुर्गीला ’दवा डाक्तर’ करायचा अस बाळाबाईन ठरवल. शेवटी तिच्यासारख्याच एका गायवाल्या बाईला जनावरांच्या डॉक्टरचा पत्ता विचारायला ती बाहेर पडली.
बाहेर पावसाच थैमान चालूच होत. सगळे रस्ते पाण्याखाली गेलेले. चोहीकडे पावसाच्या धारांशिवाय काहीच दिसत नव्हत. मनाचा हिय्या करून बाळाबाई पाण्याचा अंदाज घेत हळू हळु पुढे जाऊ लागली.
झोपड्यांच्या छ्परावर बसलेल्या काही माणसांनी बाळाबाईला अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्या कडे दुर्लक्ष करून बाळाबाई पुढे जात राहिली.
परतली तेंव्हा सार आटोपल होत. जमिनीवर शेणा-मुताच्या थारोळ्यात आ वासून दुर्गी पडली होती. डोळे फ़िरवले होते. नाकातोंडातून फ़ेस आला होता. पोट फ़ुगून दगडासारख कडक झालं होत.
दुर्गीचा तो नि:ष्प्राण देह पाहून बाळाबाईन हंबरडा फ़ोडला. तिच्या गळ्यात पडून बाळाबाई जोराने रडू लागली. कितीतरी दिवस बाळाबाई झोपडीतच पडून होती. चूलही पेटवली नव्हती.
दुर्गीच्या सहवासाची तिला इतकी सवय होती की आता दुर्गी नाही हा विचारच बाळाबाईला सहन होत नव्ह्ता. तिच्या मनात एक अव्यक्त पोकळीच निर्माण झाली या पोकळीमधे दुर्गीच्या आठवणी होत्या,
स्वत:च्या पोटाची चिंता होती. अखेर ब-याच दिवसांनी बाळाबाई बाहेर पडली. बाहेरच विश्व तसच होत. नेहमीप्रमाणे देवळातले भाविक होते. गायवाल्या ईतर बायका होत्या.
ती सवयी प्रमाणे सगळ्या देवळांमधुन जाउन आली. उगाचच आजुबाजूला घुटमळली. बाळाबाईच्या नेहमीच्या जागेवर दुसरीच एक बाई बसली होती. तिची गाय बघुन बाळाबाईला दुर्गीची खूप आठवण आली.
ईकडे पावसाच्या सरी कोसळत होत्या आणि बाळाबाईच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. आता पुढे काय याची चिंता बाळाबाईला सतावू लागली. जवळचे साचलेले पैसे ह्ळू ह्ळू संपत आले होते.
गाय नसल्यामुळ देवळातही जाउन बसता येत नव्हत. गाय विकत घेण्याइतके पैसे तिच्याजवळ नव्हते. आयुष्याच्या चाललेल्या गाड्याच एक चाक अचानक निखळून पडल.
एक दिवस काही विचार केला आणि तडक बापाच गाव गाठल. कोणास ओळख न लागेल अशा बेतानं गावात फ़िरू लागली. लोकांची गाईगुरं वावरात जाता येताना निरखू लागली.
कोणाची खिल्लारं कोणत्या वेळी परततात, बरोबर कोण असत ते पाहून ठेउ लागली. असच एका वावरात तिन्हीसांजेची गेली. झाडाच्या आडोशाला उभी राहीली.
थोडया वेळात गोवारी गुरे घेउन येणार हे तिला माहित होत. गेले काही दिवस रोज ती हे निरखत होती. तिन मनाशी काही ठरवल होत. थोड्या वेळान गुराखी जनावरांना घेउन आला.
त्याचा तो रोजचाच दिनक्रम होता. गुराखी म्हातारा होता. शिवाय त्याला कमी दिसत असावं त्यानं जनावरांना खोपटात घालवल त्याच्यावर कुडाची झापड लावली आणि तो निघून गेला.
सूर्य अस्ताला गेला होता. वावरात दूरपर्यंत कोणीही नव्हत. आता या वेळेनंतर ईथं कोणी येत नाही हे देखील तिला माहित होत. बाळाबाई हळूच खोपटाकडे गेली. कुडाची झापड काढली आत दहापाच जनावरं सुस्तावली होती.
बाळाबाई एक एक जनावर निरखू लागली. दोन गाई होत्या त्यातली कब-या रंगाची एक बाळाबाईनं हेरली. तिच्या गळ्यातली दोरी धरली आणि तिला ऒढतच खोपटाबाहेर आणली.
खोपटाच झापड लाउन घेतल. बाळाबाई गाईला सरावाची नसल्यानं ते मुकं जनावर क्षणभर थबकल. गोंधळल पण बाळाबाईनं नेट लावला. गाय घेउन अंधारात चालू लागली. आता वेळ घालवून चालणार नव्हत लौकरात लौकर गावातून दूर जायला हव होत. बाळाबाई रात्रभर चालत राहिली. पहाटेला घाट उतरून सपाटीवर पोचली तेंव्हा कुठे जीवात जीव आला. पण रात्रभर चालून चालून थकली होती. रस्ता सोडून एका आडवाटेला थांबली. गाईला एका झाडाला बांधली आणि झाडाखाली बसून विसावा घेउ लागली. तांबडं फ़ुटायला लागल होत. अंधाराच राज्य संपल्याची ती खूण होती. बाळाबाई झाडाच्या बुंध्याशी शांत बसून राहिली. थंडगार वारा अंगाला झोंबत होता. कितीतरी वेळान ती भानावर आली. सूर्य उगवत होता त्याचे कोवळे किरण झाडांच्या शेंड्यावर पडले होते. हळू हळू दिसू लागल. बाळाबाई गाईकडे पहात होती. ईतकी सुंदर गाय पाहून ती मनोमन सुखावली. गाईचा कबरा रंग सकाळ्च्या ऊन्हात चमकत होता. झुपकेदार शेपटी, मोठाले डोळे आणि डौलदार शिंग. गाय फ़ार वयाची नव्हती. पहाता पहाता बाळाबाईच लक्ष गाईच्या कासेकडे गेलं आणि ती चरकलीच. गाईची आचळं तटतटली होती. त्यातून दुध ठिबकत होत. गाय पान्हावली होती. काही दिवसांपूर्वीच व्याली असावी.
आता गाईच्या हंबरण्याच कारण तिच्या लक्षात आलं. गाय आपल्या वासराला शोधत होती. त्याच्यासाठीच हा पान्हा होता. त्याच्या आशेनं ईकडे तिकडे बघत ती हंबरत होती. दोरीला हिसके देत होती. बाळाबाईच्या पोटात धस्स झालं. ती विचारात पडली. आईविना लेकराची परवड ती जगली होती.
तिची आई तर तिला आठवतही नव्ह्ती. बापाच्या कोरडया मायेत वाढल्यामुळं आईच्या मायेचा ओलावा तिच्या वाट्याला कधी आलाच नव्ह्ता. तिनं पुन्हा गाईकडे पाहिलं, गाईच दोरीला हिसके देणं, हंबरणं चालूच होत. हिचे वासरु असेल की कालवड? बाळाबाईच्या मनात विचार आला. गाय मान वर करून हंबरू लागली. बाळाबाईला वाटलं ती आपल्या वासराची शपथ घालते आहे. गाईची धडपड पाहून बाळाबाईचे डोळे पाणावले. गळा दाटून आला. ती जागेवरून ऊठली. गाईची दोरी सोडली, तिला घेउन पुन्हा रस्त्यावर आली आणि घाटमाथ्याच्या दिशेनं चालू लागली
गौरीबाई गोवेकर