कवी म्हटला की, तो कविता या विषयावर 'कविता करणारच' असं ठरलेलं दिसतं; अशा त्या शिवाय कवी ही 'सनद' त्याला मिळत नसावी. (इथं मी कवी म्हणत असलो तरी ते कवयत्रीलाही लागू होतं हे वेगळं सांगायला नको.)
अर्थात कवी-नाम- सिद्धिसाठी 'माझी कविता' अवतरली. कविता अवतरण प्रक्रियेचे विविध पैलू समोर आणण्याचा प्रयत्न असतो. कवितच्या गुणांच वर्णन त्यात असतं आणि कवीचं मन, हृदय आणि स्वतः कवी कवितेत कसा गुरफटलेला असतो हे अनेक प्रतिमांतून कवितेत फुलवलेले असतं (हे फुल फुलण्याच्या संदर्भात घ्यावं, फुगा फुलवण्याच्या संदर्भात नव्हे)
“माझी कविता, ही अशी माझ्या जवळच असलेली बरी” या शीर्षकाच्या माझ्या कवितेशी माझं किती ममत्व आहे आणि कविता कशी नाजूक आहे, हे मी प्रकट करणार होतो.
एका साहित्य सम्मेलनात मी ती वाचलतोय, टाळयांचा कडकडात, श्रोत्याकडून 'व्वा' 'व्वा'चे उद्गार वगैरे, जमल्यास 'वंस मोर' अशी दाद, आणि मन पुन: शेवटचं कडवं म्हणणार आणि दुस-या कवितेचं पान उघडणार असं काही बरंच… स्वप्नवत मी विचार करीत होतो पण…
संमेलनाच्या उद्घाटन-समारंभातच बहुमूल्य वेळ कामी आल्यामुळे, आणि इतर परिसंवाद छान रंगले, त्यात प्रत्येक वक्त्यास वेळ साभांळण्यासाठी सूचनांवर प्रत्येकाकडून काणाडोळा होतं गेल्यानं संमेलन संचालकांना काव्य-वाचनाच्या वेळेवर गदा आणावी लागली. निमंत्रित कवी-वर्गाने मात्र इमाने-इतबारे संमेलनाच्या आतापर्यंतच्या कार्यक्रमात हजेरी लावून शोभा वाढवली, सारस्वत-व्रत पूर्ण केल्याचा मनोमन आनंद मानला.
आयोजकांना काव्य- वाचनाचा कार्यक्रम नाईलाजानं पुढे ढकलावा लागला. कवींनी पुढेपुढे जात राहवं, असा अंतरीचा भाव त्यात निश्चितच दडला असावा, तो माझ्या कवि-मनाला दिसला. इतर कवींचे काय भाव होते मला कळले नाही. साधारण उच्चदर्जाचे कवी आपले भाव असे आपसातल्या मोकळ्या संवादातून प्रकट करीत नसावे. ते भाव आपल्या पुढच्या कवितेसाठी जपून ठेवीत असावेत. (हे माझे तर्क वितर्क, नेहमीचेच).
खास आकर्षण म्हणून सायंकाळी सूर्यास्ताच्या साक्षीनं नौकायानाचा आनंद घेत कवींनी काव्यवाचन करता यावं असं आयोजकांनी ठरवल्याचं जाहिर करण्यात आलं. आम्ही आमच्या मनातल्या कटू भावना विसरलो!
(उद्घोषक नौकायनाच्या ऐवजी नौकानयनाचा आनंद असा शब्द उच्चारून गेले हे माझ्या संवेदनशील कविमनांने ते टिपलं).
आता नौकायनासाठी पाच वाजता आमच्या दोन मिनी बसेस नदी किना-याकडे निघाल्या तेव्हा 'तीस-पस्तीस आमंत्रित कवी कसे मावणार ' अशी शंका आम्हा काही आमंत्रितांच्या मनात डोकावली. बघूया काय काय होतं पुढे.
नदी काठी पोहचल्यावर ते अफाट पात्रानं मन मोहून घेतलं. गार वारा वाहत होता, वा-याचा वेगही वाढतो आहे हे जाणवत होतं. दूर पर्यंत नदीच्या पात्रात नौका, स्टिमर, छोटे मोठे रंगीबेरंगी क्रुझ दिसत होते. सगळं फारच आकर्षक होतं. आम्हा आमंत्रितांना एका छान सजवलेल्या क्रुझवर नेण्यात आलं. बसण्याची व्यवस्था करण्यात संयोजकांची तारांबळ होत असल्याचं दिसत होतं. कवि-सम्मेलनासाठी ही जागा योग्य नसल्याचं जाणवायला लागलं. संमेलनाच्या संचालकांना, सन्माननीय अतिथींना आणि उद्घोषकांना बसायला काय, उभं राहायला जागा कमी पडत होती, तिथेच कवीनं पोहचून आपल्या कविता सादर करायच्या होत्या. अर्थातच बराच वेळ बैठक आयोजनात गेल्यामुळे, नाईलाजानं, प्रत्येक माननीय आमंत्रित कवी/ कवयत्रीस आपली केवळ एक कविता सादर करण्याची घोषणा, उद्घोषकास करावी लागली. वा-याचा वाढलेला वेग, आजूबाजूच्या क्रुझचा गलका, कमी जास्त आवाज करणारा माईक आणि जनरेटरचा आवाज… यातून काय होत असावं याची कल्पना केलेली बरी.
उद्घोषकाचा आवाज कवी/ कवयत्रीपर्यंत पोहचणं, मग त्यानं/ तिनं साभांळत ओल्या झालेल्या वाटेवरुन तथाकथित मंचापर्यंत पोहचणं, एका हातात माईक, दुसऱ्या हातात कवितेची वही, माईक वरून श्रोत्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करता करता वहीतलं कवितेचं पान उघडणं, त्यात वाराही चेकाळल्यासारखं करीत होता. इतर वेळी या वा-याचा आनंद घेतला असता पण इथं कविता सादर करतांना त्याच्या विषयीचा आदर कमी होत होता. हातातली वहीच तो उडवून नेणार का, अशी भीती वाटत होती; आज वारा शत्रू पक्षात सामील झाल्यासमच होता. एकीकडे त्याच्या घोंघावणारा प्रभाव, आणि दुसरीकडे प्रभावहीन ध्वनीवर्धन व्यवस्या…
माझी कविता मलाच ऐकू येत नव्हती. फडफडणारी माझी कवितेची वही जरी माझ्या हातात होती, माझी कविता मला आणि श्रोत्यांना सोडून वा-यावर उडून गेली होती…
क्रुझ वरच्या कविसम्मेलनाची प्रशंसा मात्र 'व्हायरल' झाली होती!
२० जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#प्रयोग२०२६
#जुलै२०२६