सध्या साठीच्या जवळपास असलेल्या आमच्या वयाच्या पिढीने आपल्या आयुष्यात , जमेल तेवढी मेहनत प्रामाणिकपणे करून , आपल्या भविष्याची भक्कम सोय करून ठेवली आहे. स्वतः साठी आणि आज आपल्या सोबत आहे त्या कुटुंबासाठी , सुख,समृद्धीने सहज रित्या जगता येईल , अशी आर्थिक तरतूद केलेली आहे . स्थावर संपत्ती, मोटर वाहन,आर्थिक सुरक्षित ठेवी सर्व व्यवस्था यथासांग झालेली आहे. सध्या भारतीय पुरुषांचे वा स्त्रियांचे सर्वसाधारण आयुर्मान ७१-७२ वर्षे आहे , वैद्यकीय निष्कर्षानुसार साधारणपणे निरोगी जीवनशैली असेल तर , अजून १० वर्षे त्यात वाढ मिळते , म्हणजे आम्ही सर्व कमीतकमी ८१ – ८२ वर्षे जगणार आहोत. त्यात येणाऱ्या भविष्यकाळात आम्हाला उपलब्ध असलेल्या स्वास्थ सेवा विचारात घेता , त्यात अजून किमान ५ वर्षे वाढ अपेक्षित आहे .सर्वांची बेरीज करता , आज दिनी आमच्या पिढीतील प्रत्येकाला ८६ – ८७ वर्षे जगण्याचे नियोजन करायचे आहे. त्यामुळे साठीनंतर आम्हा सर्वांना अजून किमान २५-२६ आनंदाने जगायचे आहे , म्हणून त्याचे नियोजन केले पाहिजे, असे मला वाटते.
आमच्या पिढीने जमा केलेली ही शिल्लक खूप मेहनतीने कमावली तर आहेच, पण त्यासोबतच खूप काटकसर करून टिकवली आहे. ही काटकसर कधीही मुलांसाठी न करता, फक्त स्वतः साठी केलेली आहे. एव्हाना ही काटकसर आपल्या पिढीची व्यक्तिगत सवय झालेली आहे. त्यामुळे आता आपल्याला स्वतः खर्च करायला शिकले पाहिजे , तो कसा, हे आता पाहूया.
धन : स्वतः च्या आजच्या आनंदासाठी आणि भविष्यातील खर्चाची योग्य तरतूद करून सुद्धा जर आपल्याकडे जास्तीचे धन असेल, तर त्याचा समाज जीवनात उदारपणे खर्च करायला आपण शिकले पाहिजे. उदाहरणार्थ भाजीवाले, छोटे छोटे व्यापारी, ऑटोवाले, आपल्याला घरी व्यक्तिगत सेवा देणारे कर्मचारी ह्यांच्याशी खूप हिशोबी न बनता त्यांचेवर आता मोकळ्या मनाने खर्च करा
साधने : आपल्याकडे बरीच सुस्थितीत असणारी साधने आपण वापरत नसतो, उदा. सायकल,स्कूटी, कुलर, ,जास्तीचे फर्निचर हे समाजोपयोगी कामासाठी योग्य त्या किमतीत वा मोफत देऊन द्या.
वेळ : ह्या कालखंडात आपल्याकडे बराच मोकळा वेळ असतो, त्याला विधायक कामात खर्ची करा उदा. माझा एक मित्र निवृत्तीनंतर शाळेत जाऊन हस्ताक्षर सुलेखन वर्ग स्वखर्चाने करीत असतो , दुसरा एक मित्र भागवत कथा करतो, असे कितीतरी पर्याय आवडीनुरूप निवडून आपला वेळ खर्च करा.
कौशल्य : आपण आयुष्यभर जे काम केले आहे, त्याचे कौशल्य आपल्याला आत्मसात झालेले असते , ते योग्य प्रकारे खर्ची घातले पाहिजे. उदा. माझा एक आर्किटेक्ट मित्र , त्याच्याकडे येणाऱ्या लोकांना त्या क्षेत्राविषयीचे मार्गदर्शन करतों, हे मोफतच केले पाहिजे असे नाही, कारण त्याची किंमत नसते . पण ते कौशल्य स्वतः कडे गंजत न ठेवता , त्याला खर्ची लावा .
अनुभव : आपण आपल्या क्षेत्रात खूप अनुभव घेतला असतो, ही अनुभवाची पुंजी आपण योग्य ठिकाणी खर्ची करू शकतो.उदा. माझे एक इंजीनियर मित्र आहेत,ते निवृत्तीनंतर , प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत सरकारी कामावर क्वालिटी कंट्रोल चे काम करतात ,
असे अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील, साठी नंतर येणाऱ्या पंचवीस वर्षे जर आपल्याला चांगले जगायचे असेल , तर आपल्याला आपल्या धनाचा, वेळेचा, साधनांचा, कौशल्याचा आणि अनुभवाचा आपल्या आवडीनिवडी नुसार खर्च करायला शिकले पाहिजे,असे मला वाटते.