आज काय आणि कशा वर लिहावं हा विचार करून थकलो दोन्ही हात जोडून चेहेरा झाकून शांत डोळे मिटून आरामखुर्चीवर पहडलो असताना डोळे उघडले तर दिसली माझ्या हाताची *”ओंजळ “*.
आणि
तीच मला आज लिहिण्यासाठी विषय देऊन गेली.
शाळेमध्ये असताना आता नेतात तशी शाळेत पाण्याची बाटली घेऊन जाण्याची पद्धत नव्हती. नळाला पाणी असायचे एका हाताने नळ पकडायचा आणि दुसऱ्या हातची ओंजळ करून पाणी प्यायचो तेव्हा मला ओंजळीची ओळख झाली.
त्या आधी देवाचं तीर्थ आणि सत्यनारायणाचा प्रसाद उजव्या हातांच्या ओंजळीत घे असा आईचा आदेश नेमकी ओंजळ म्हणजे काय ते सांगून गेले होता.
अशी तळहातावर खोल भाग करून एक हाताची ओंजळ कशी वापरायची हे लक्षात आले.
पण देवीच्या कुळाचार पूजनासाठी पाच घरी जोगवा मागून धान्य आणायची अशी प्रथा आमच्या घरात होती. बहुतेक आपल्यातील अहंम जाण्यासाठी असावी तेव्हा दोन्ही हाताची “ओंजळ” ही दिलेले स्वीकारण्यासाठी आणि दुसऱ्याला काही देण्यासाठीही उपयोगात आणायची असते हे समजलं.
जीवनात देण आणि घेणं हे अविरत सुरु असते जो देतो तो दाता आणि जो घेतो तो याचक हे कार्य करणारी असते ती “ओंजळ” , दात्याची वरती आणि यांचकाची खाली.
विं दा करंदीकर यांची देण्या घेण्यावरची सुंदर कविता आठवली.
देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
एकदिवस घेणाऱ्याने
देणाऱ्याचे हात घ्यावे
विंदा करंदीकर यांच्या कवितेतील ह्या ओळींचा अर्थ असा होतो की प्रत्येक वेळी व्यक्तीने घेणाऱ्याच्या भूमिकेत असू नये.एखादी व्यक्ती आपल्याला काही देत आहे म्हणून आपण सतत घेत राहावे आणि एक दिवस देणाऱ्याच्या हातही घ्यावे म्हणजे त्याच्या अंगी असलेले दातृत्व घेऊन आपणही देण्यास सुरवात करावी.
जर कोणाकडून एखादी चांगली गोष्ट मिळत असेल तर त्याचा मोबदला म्हणून आपणही त्याच्यासाठी काहीतरी करायला हवे हा भावार्थ कवीने सांगितला आहे.
तीन वर्षांपूर्वी,एका मित्राने त्याच्या सिमला पर्यटनाचा एक फोटो पोस्ट केला होता, त्याच्या साठी नंतर सिमला येथे काढलेला. त्याचा फोटो आज आठवला. तो त्याची ताज्या गुलाबी फुलांनी पूर्ण भरलेली ओंजळ त्याच्या पत्नीच्या ओंजळीत रिती करत होता. इथं न कुणी दाता होता न कुणी याचक. फक्त आणि फक्त प्रेम व्यक्त होण्यासाठी ओंजळीचा वापर झाला होता. त्याचे ते सुखी आणि आनंदी जीवनाचे सार्थ जीवनचित्र होते.
विवाहाच्या लाजाहोमाच्या विधीत वधू याच ओंजळीचा उपयोग सायलीच्या लाह्याची अग्नीत आहुती दिली जाते. हा विधी वधूचे नवीन कुटुंबातील आगमन आणि तिच्या त्यागाचे व समर्पणाचे प्रतीक मानला जातो.
अशा या प्रेमाच्या ओंजळीवर या ओळी लिहून माझ्या मनातील शब्दाची ओंजळ रिती करतो.
ओंजळीत माझ्या..
गुलाबी फुले ती,
प्रेमाचा तोच रंग..
हा योगायोग नाही..१
सुखद क्षणाच्या या
अविस्मरणीय स्मृति,
जपे ओंजळीत साठा..
हरवायच्या नाही .२
ओंजळीत लपला..
रात्री चंद्र भुतलीचा
रात्रीचा तो दिवस..
मावळला नाही..३
ओंजळीत जपल्या..
फुलांच्या त्या माळा ,
मोगऱ्याचा तो सुगंध..
विसरायचा नाही..४
काळाने ओंजळीला..
थरकाप दिला जरी तो
धर हात घट्ट हातात..
घाबरायचे नाही ..५
प्रेमाच्या ओंजळीचे ..
हेमंत सांगे मर्म
याचक बनून कुणाचे ..
प्रेम मिळत नाही..६