#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२६
गुरूबद्दल संत कबीर आपल्या दोह्यात म्हणतात –
“गुरु गोबिंद दोउ खड़े, काके लागूं पांय
बलिहारी गुरु आपनो, गोविंद दियो बताय”
अर्थात, गुरू अन् देव एकाच वेळी समोर उभे ठाकले तर आधी नमस्कार कोणाला करावा? तर आधी गुरूला वंदन करावं कारण देवापर्यंत पोहचण्याचा मार्ग गुरूंनी दाखवलेला असतो.
नुकतीच गुरुपौर्णिमा होऊन गेली. महर्षी वेदव्यासांचा जन्मदिवस. मला सकाळी सकाळी माझ्या मावशीचा संदेश आला – ‘गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा’. खरं तर वडीलधारी म्हणून आणि शिक्षिका म्हणून मी तिला गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा देणं अपेक्षित होतं. पण तसं न होता मलाच शुभेच्छा मिळाल्या – थोडं आश्चर्य वाटलं – हे काय, आपण वयाने, ज्ञानाने अन् अनुभवाने कनिष्ठ असताना आपल्याला कसल्या शुभेच्छा – म्हणून विचारूनच घेतलं. तर मावशी म्हणाली – ‘तू सुद्धा अनेक बाबतीत माझी गुरु आहेस’. आता घरातल्या ज्येष्ठ श्रेष्ठ आणि ज्यांनी आपल्याला अगदी जन्मापासून बघितलेलं असतं त्यांच्या तोंडून आपल्या तोंडावर कौतुक होण्याची शक्यता न्यूनतम असते – त्यातल्या त्यात जर आपण भारतीय कुटुंबात असाल – त्यातही महाराष्ट्रीय अन् त्यातही विदर्भात. कारण समोर कौतुक केलं तर मूल शेफारते हा दृढ समज नव्हे नव्हे श्रद्धाच म्हणा ना!
असे असताना सुद्धा कौतुक होतंय म्हटल्यावर कोण संधी सोडेल? मग मी पुढला प्रश्न केला – ‘म्हणजे कुठल्या बाबतीत?’ मग तिने २ – ३ गोष्टी बोलून दाखवल्या – त्या इथे सांगत बसणार नाही कारण आत्मस्तुती ही आत्महत्येसमान असते असं कुठेतरी कोणीतरी लिहून ठेवलेलं मला आठवण करून देतील असे भरपूर लोक माझ्या आयुष्यात आहेतच.
मग पौर्णिमेची रात्र संपता संपता एका मैत्रिणीच्याही शुभेच्छा आल्या. आशय साधारण तोच.
मग वाटलं – आपण सहज जे वागून बोलून जातो त्याने कोणावर तरी खोल अन् दीर्घ काळासाठी परिणाम होतोय असं दिसतंय. असंच इतरही लोक आपल्यावर परिणाम करतच असतील. आपण ही त्यांच्याकडून कळत नकळत शिकत असतोच. श्री दत्त गुरूंनी सुद्धा २४ गुरु मानले. आपण तर सामान्य माणसं – अगदी असंख्य गुरू आपण मानू शकतो. संख्येची मर्यादा आपल्यासारख्या पामरांना का असावी?
मला आजवर जे चांगले शिक्षक लाभले त्यातले फार कमी सरळ स्वभावी होते – बरेच शिक्षक गुरुजी म्हणण्यापेक्षा मास्तर म्हणावं अशा स्वभावाचे. जितके हुशार, अनुभवी, अन् कर्तव्यदक्ष तितकेच किंबहुना त्याहूनही खडूस. गोड बोलणं तेही विद्यार्थ्यांशी हे त्यांच्या गावीच नसावं. पुढे पुढे कळू लागलं की आपलं भलं व्हावं, कुठल्या वाकड्या वाटेवर आपलं पाऊल पडू नये याचा ध्यास त्यांना आपल्याशी सरळ वागू बोलू देत नाही. जिथे आपली चांगली प्रतिमा बनवून ठेवण्याचा स्वार्थ नसतो तिथे दुसऱ्याच्या कल्याणासाठी कडवट शब्द उच्चारण्याचे धाडस होते. भविष्यात आपले विद्यार्थी मोठे होतील, आपल्याला विचारणार ही नाही असा स्वार्थी विचार इथे आडवा येत नाही. त्याला पुढे काही अडायला नको, आपल्याला नाही विचारले तरी चालेल पण त्याला स्वत: च्या पायावर ठाम उभे राहता यावे यासाठी तो सगळा खडूसपणाचा आव. कारण हे च शिक्षक आपण मोठे झालो, शाळा सोडून गेलो की अगदी सामान्य तऱ्हेने संवाद साधतात. कारण तेव्हा आपल्याला ठोकून पिटून घडवण्याची गरज राहिलेली नसते. जेव्हा मी शिक्षिकेच्या भूमिकेत गेले तेव्हा हे सगळं जगले त्यावेळी कळलं चांगले शिक्षक खडूस का असतात ते.
तसं तर आपण डोळे उघडे ठेवले तर आजूबाजूला सगळ्यांमध्येच आपल्याला एकेका गोष्टीसाठी गुरु सापडू शकतात. जसं वारकरी एकमेकांमध्ये विठू माऊलीचं अस्तित्व शोधून एकमेकांच्या पाया पडतात अगदी तसंच आपणही एकमेकांमध्ये गुरु शोधू शकतो.
कोणाकडून काही शिकण्यासाठी फार फार तर की लागतं – दुसऱ्याचा चांगला गुण ओळखण्याची नजर, तो गुण मान्य करण्याइतका मोठेपणा अन् तो गुण अंगी बाळगण्यासाठीचा नम्रपणा. इतकं पुरे.
तर उशिरा का होईना सर्वांना गुरुपौर्णिमेच्या अनेक शुभेच्छा अन् नमस्कार!!!