वामनदादा
क्रमशः पुढे १९८६ – २०२६
आमच्या वामनदादांच्या आयुष्यातील पहिल्या चार दशकात आम्ही सर्व बहीणभाऊ सोबतच राहत होतो आणि दादा हा आमचा “ त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव “ असे सर्व काही होता. मात्र १९८६ च्या दरम्यान ,त्याच्याच भक्कम पाठिंब्यामुळे , आम्ही सर्व बहीणभाऊ आपापल्या ठिकाणी , आपापल्या क्षेत्रात आणि आपापल्या पद्धतीने काम करायला लागलो . दादा सुद्धा स्वतःचा संसार,स्वतःचा व्यवसाय आणि आपल्या कामात व्यस्त असायचा . आमच्या कुटुंबात एकतर मी शेंडेफळ होतो , त्यामुळे माझ्याकडे कुटुंबाची कोणतीच जबाबदारी नव्हती . माझे वैद्यकीय शिक्षण संपल्यानंतर माझ्या डोक्यात समाजसेवेच्या भुताचे तांडव सुरू झाले आणि मी सातपुड्यातील वनवासी सेवा प्रकल्पात रममाण झालो . पाच वर्षानंतर नागपूरला परत येऊन स्वतःचा व्यवसाय (दवाखाना) सुरू करावा , असे माझे प्रयत्न सुरु असता, दादाला मी त्यांच्यासोबत व्यवसाय करावा , असे वाटत होते. त्यावर आमचे एकमत झाले नाही, आणि मी एम.डी. साठी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि सोबतच गोपालनगरला दवाखाना सुरु केला. मात्र माझ्या ह्या निर्णयानंतर पुढील आयुष्यात आमचे अनेक बाबतीत कायम दुमत असायचे, तरीही आम्ही नात्यातील गोडवा कायम जपून ठेवला आणि एकमेकांना अतीव न दुखावता आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहिलो. ह्या बाबतीत आम्हाला “अग्रीड टू डिसएग्री”, ह्या तत्त्वांचे कठोर पालन करून एकमेकांबद्दलचा आदर , प्रेम आणि विश्वास नेहमी टिकवून ठेवता आला .
वामनदादाचे माझ्या जीवनातील स्थान घराच्या बांधणीत पायवा असतो , त्यासारखे होते . पायव्याशिवाय वास्तूचा विचार करवत नाही, तसाच माझ्या दादाशिवाय माझ्या आयुष्याचा विचारच करता येत नाही. माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्वप्नात तो प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रित्या सहभागी असायचा. माझ्या वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यानेच मला नागपूरला आणले , त्यानेच मला हडस विद्यालयात भरती केले, पुढेही त्यानेच मला जिद्दीने शिकवून डॉक्टर केले, त्यानेच प्रचारकी जीवनात मला प्रोत्साहन दिले , आणि पुढेही आपल्या मुलासारखे संगोपन करीत माझे लग्न लावून दिले , अश्या पद्धतीने त्यानेच माझ्या जीवनाची घडी व्यवस्थितपणे बसवून दिली आणि पुढेही तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला , हे माझ्या जीवनातील वास्तव आहे. अगदी बालपणापासून माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्वप्नात त्याचा सकारात्मक सहभाग असायचा किंबहुना तो पाठीशी आहे , ह्याची मला खात्री असल्यामुळे मी नेहमी आश्वस्त असायचो . मला माझ्या व्यक्तिगत जीवनात जे काही यश मिळविता आले, त्यात माझ्या परिवारातील आणि परिवाराबाहेरील अनेकांचा नेहमीच पाठिंबा, आशीर्वाद आणि शुभेच्छा असायच्या,त्यात माझ्या दादांचा सिंहाचा वाटा होता , ह्याबाबत मला काहीही शंका नाही.
माझ्या दादांचे मला द्यात असलेले संपूर्ण आयुष्य एखाद्या योध्यासारखे होते. तो सदैव प्रत्येक क्षेत्रातील यशासाठी कसुन लढा द्यायचा आणि यश पदरात पाडूनच घ्यायचा. ते करतांना त्याला साम,दाम,दंड, भेद कशाचीही परवा नसायची . हाच न्याय त्याने आपल्या तब्येतीबाबतही पाळला , नियतीने त्याला मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचे किती प्रयत्न केलेत, पण हा पठ्ठा प्रत्येक वेळी यमाला हुलकावणी देऊन परत यायचा . मी माझे संपूर्ण वैद्यकीय शिक्षण पणाला लावून त्याच्या तब्येतीचा विचार करीत असे आणि प्रत्येक वेळी तो मला आश्चर्याचा सुखद धक्का देत , त्यातुन सुखरूप बाहेर पडायचा. माझा दादा स्वभावाने अतिशय जिद्दी होता आणि त्याने हीच जिद्द तब्येतीबाबत सुद्धा शतप्रतिशत दाखवली ,ह्यात मला काहीही शंका नाही.
ह्या वर्षी १४ सप्टेंबरला त्याचा ८२ वा वाढदिवस होता , त्या निमित्ताने माझी भेट झाली , तेव्हा त्याच्या डोळ्यात एक वेगळाच भाव होता. मला आमच्या घरी “ मुकुंदा “ ह्या नावानेच हाक देतात , पण त्या दिवशी त्याने मला “ मुकी “ अशी दोनदा हाक मारली . मलाही जरासे आश्चर्य वाटले , कारण ह्या नावाने तो मला अगदी बालपणीच बोलवायचा . त्या एका हाकेने त्याने मला जवळपास पन्नास वर्षे मागे नेले होते. त्याच भेटीत मला हे ही जाणवले, की ह्या योध्याने आता आपल्या म्यानातील सर्व शस्त्रे काढून टाकलेली आहेत. त्याला त्याचा हा एकाकी लढा एव्हाना नकोसा झाला आहे आणि त्यानंतर अगदी चवदा दिवसातच त्याने ब्रह्म मुहूर्तावर पितृ पक्षात आपली जीवनयात्रा आपल्या इच्छेनुरूप कोणत्याही वैद्यकीय उपचारा विना संपवली. माझ्या आईला आमचे घरचे सर्व नातलग “ गंगु “ ह्या नावाने हाक देत असत. दहाव्या दिवशी बिना संगमावर त्याची अस्थिविसर्जन करीत असता ,त्याला परत एकदा ह्या गंगेच्या उदरात सोडतांना एक वर्तुळ पूर्ण झाले . एक वादळी व्यक्तिमत्व अस्थिरूपात नेहमीसाठी गंगेच्या उदरात समर्पण करतांना , त्याने माझ्यासाठी सोडलेली एक भयाण पोकळी मनात खुप खोलवर जाणवत होती . आज त्याची तेरवी, त्यानिमित्ताने त्याच्या असंख्य आठवणी वादळागत येत आहेत , त्या मला माझ्या उर्वरीत आयुष्यात पुढेही आठवत राहणार, ह्याबाबत मी आश्वस्त आहे. तूर्त आजदिनी ही श्रद्धासुमने त्याच्या चरणी सादर अर्पण.