_”आज टपालाचा दिन हो खास_
_क्वचित घरी आता येतो पोस्टमन_
_आनंद किती होता तॊ पत्र वाचण्याचा_
_मधुर स्मृतिची आज झाली आठवण_ ”
ता. ०९ ऑक्टोबर
रा. १०. १०
सर्व सुरपाखरांना ,
सप्रेम नमस्कार.
टपाल दिनाच्या
व्हाट्सअपच्या पोस्टने
अर्थात आधुनिक युगातील टपालानेच
तुम्हाला शुभेच्छा देतोय!!
🌹🌹🌹🌹
काल मला मित्राचे पत्र व्हाट्सअपवर मिळाले त्यात आज टपाल दिन असल्याची माहिती प्रिय मित्राने दिल्याने दिल्याने तोच विषय लेखासाठी घेऊन पत्ररूपात लिहितो आहे.
इंजिनीरिंगला कॉलेजमध्ये होस्टेलला होतो तेव्हा पोस्टमन बऱ्याच वेळा पत्र खोलीत न टाकता नोटीस बोर्डवर लावायचा. “अरे हेमंत, तुझं पत्र नोटीस बोर्डवर लागलंय!”असं कोणी म्हटलं की मी लगेच धावत धावत पत्र घ्यायला जायचो. पत्र एकदा वाचून माझे कधी समाधान व्हायचं नाही दोन-तीन वेळा शब्द अन अन शब्द वाचून काढायचो. वाचनाचे दोन तीन आवर्तन झाले की लागलीच त्या पत्रास उत्तर द्यायची सवय मला होती. बारावीला गरवारेला होतो त्यामुळे बारावी पासून तर बीई पास होईपर्यंत आलेल्या सर्व पत्रांचा मी जतन करून त्यांचा एक अल्बम तयार केला होता. भुसावळला जेव्हा मी गेलो तेव्हा ती पत्र जेव्हा मी माझ्या सर्व आई-वडील, मित्र व इतर नातेवाईकांना दाखवली, तेव्हा त्यांना मी त्यांचे पत्र जतन करून ठेवले याचे कौतुक वाटलं. आपण लिहिलेला मजकूर काही काळाने वाचण्यातील गंम्मत वेगळीच असतें सर्वांच्या चेहऱ्यावर तो आनंद मला दिसून येत होता.असो.
पत्रलेखन हा शाळेत परीक्षेत एक प्रश्न असायचा. आता खरंच त्याची गरज आहे का? हा प्रश्न हल्ली मोबाईलच्या युगात मला पडला आहे कारणं हल्ली पत्राचा मसुदा देखील ए. आय. वर आपोआप तयार मिळतो.
पत्रातून संदेश तर जातोच पण पत्र हे भावना व्यक्त करण्यासाठीचे ते उत्तम माध्यम होते. शास्त्राने प्रगती केली काही गोष्टी नष्ट होतात. कधीकाळी उत्तम हस्ताक्षराची असलेली किंमत आता संगणकाच्या युगात उरली नाही.आता तर कवितेला देखील देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स ने चाल लावून गीत गाता येते येते.त्यामुळे भविष्यात कलाकारांना लेखकांना समाजात किंमत राहीलच अशी खात्री वाटत नाही.
तीस वर्षांपूर्वी भुसावळला मोरूची मावशी या नाटकाचा प्रयोग झाला होता तेव्हा विजय चव्हाण व प्रदीप पटवर्धन हे आमच्या घरी उतरले होते. प्रदीप पटवर्धन यांना मी विचारलं
“का हो तुमचे खूप जोरदार नाटक आहेत तरी तुम्ही बँकेत नोकरी का बर करतात?
तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर अजूनही लक्षात आहे. ते म्हणाले, “उपजिवीकेचे साधन कला ठेवणं ही खूप मोठी रिस्क आहे, कला ही आवड छंद म्हणून ठीक वाटते, ती आनंद मिळवण्यासाठी आहे. कलेतून जे काही अर्थार्जन आम्हाला मिळतं तो आमचा बोनस असतो. आम्ही नशीबवान आम्हाला संधी मिळाली. आमच्यापेक्षाही गुणवान कलाकार आहेत पण अजूनही संधीची वाट पाहता आहेत. क्रिकेट खेळणारे खूप लोक असतात पण देशातर्फे फक्त अकरा मुलांनाच संधी मिळते ” असो.
“फुल तुम्हे भेजा है खत मे
फुल नही मेरा दिल है”
ही भावना गीतातून व्यक्त करणाऱ्या सरस्वतीचंद्र सिनेमातील नायक, नायिका नूतन आणि ती पद्धत आता काळाच्या पडद्याआड गेली आहे.आतातर डायरेक्ट मोबाईलवर संपर्क होतो.
मैने प्यार किया या चित्रपटात असलेले व जनमानसात प्रिय झालेले झालेले “कबूतर जा जा जा मेरे प्यार की पहिली चिठ्ठी साजन को दे आ.. ” किंवा “मेरा प्रेम पत्र पढकर तुम नाराज ना हो ना तू मेरी जिंदगी हो ” असे प्रियेस म्हणणारा प्रियकर, सीमेवर लढणारा फौजी देखील घरून चिठ्ठी आल्यावर आनंदात “चिठ्ठी आई है चिठ्ठी आई है” हे गीत गुणगुणताना बॉर्डर चित्रपटात दाखवले आहे. भविष्यात मात्र असे असे गीत बघणं दुर्मिळ आहे.
परवा बऱ्याच दिवसातून घरी पोस्टमन मुलीचे इलेक्शन कार्ड घेऊन आला होता. कधीकाळी गलेलठ्ठ असलेली त्याची खाकी बॅग अदृश्य झाली होती हातात मोजकीच दहा-बारा पत्र नव्हे तर सरकारी पाकिटे होती.पोस्टकार्ड तर आता अदृश्य झाले आहें. कधीकाळी रोज खाकी गणवेशात घरी येणारा पोस्टमन दोन तीन महिन्यात एकदा येतो. त्याची ही अवस्था पाहून मनात खूप वाईट वाटले.
आमचे आजोबा, वडील, वकील असल्यामुळे वकिलाने दिलेली नोटीस आमच्यासाठी कॉमन प्रकार होता.त्याच्या लिहिलेल्या नोटीसा पोस्टात जाऊन रजिस्टर करण्याचे काम मी पाचवी पासून रोज करत असे. त्यामुळे पोस्टाचे माझे लहानपणापासून ऋणानुबंध होते.
लहानपणी कधी बहिण भावाचे क्वचित भांडण झाले तर लेखी नोटीस चिठ्ठीद्वारे देऊन दुसऱ्याची चूक सांगत असू. यातला गमतीचा भाग सोडला तरी पत्रलेखन, चिठ्ठी लेखन, प्रेमपत्र, आवेदन पत्र आदी सर्व प्रकार हे मोबाईल कंप्युटर, ई-मेल या क्रूर राक्षसांनी गिळंकृत केलेले आहे.
तारयंत्रणा आता तर इतिहासाचा भाग झाली आहे. वर्षापूर्वी मी “कट्टकडकट्ट” हा विषय घेऊन काहीतरी “काहीही” या नावाने लिहिलेल्या माझ्या एकवीस लेखाच्या मालिकेत लिहिले होते.
लिहिताना असं होतं की एक सुचत आणि लिहिता लिहिता अजून अनेक विषय सुरु होतात. आज मात्र मित्राच्या एका पोस्ट मुळे खुले पत्र लिहिण्याचा आनंद मला प्राप्त झाला लहानपणी पेन फ्रेंड्स म्हणून आम्ही तीन चार मित्र एकमेकांना पत्र पाठवायचो.
😄😄
हल्ली ऑकलंडला मुलाकडे वर्षातून चार पाच महिने मुक्काम असतो.धंद्यातून व्यसता कमी झाली आहे. एखादी छोटी स्कीम सुरू असते. जुने कस्टमर श्रद्धा ठेऊन येतात. त्यांची काम करतो आणि पैसे कमवण्यातला आनंद जसं जसं वय वाढतं तसं तसं आपोआप तो कमी होतो, याचाही अनुभव घेत आहें.
तुमच्या सारख्या रसिक मित्रांनी मला लावलेलं लिहिण्याचं व्यसन मात्र चांगलं फोफावलं आहे आणि तुम्ही सर्व त्याचे साक्षीदार ही आहे.
चिरंजीव आकलंडमध्ये त्याच्या विश्वात मजेत आहे तर कन्यका बीडीएस होऊन तिच्या भावाकडे ऑकलंड येथे मास्टर्स करत आहे.
घरी मी,सौभाग्यवती आणि नव्वद वर्षाची माझी आई अशी तीनच मंडळी सर्व मजेत आहोत.
आपण सर्वही मजेतच असाल.
_*येणाऱ्या दसऱ्याच्या आपणास व आपल्या सर्व कुंटुंबियांना खूप खूप शुभेच्छा.*_
पत्र लिहिताना मनाला येईल ते अगदी बिनधास्त लिहिलेले आहे. विषयांतर झालेलंही वाटेल पण समजून घ्या!
*शुभ रजनी!*
आपल्या घरातल्या सर्वांना नमस्कार…लहानांना आशीर्वाद.
टपाल दिनाचा सर्वाना पत्र लिहिण्याचा हा माझा खटाटोप गोड मानून घ्या!
🙏🙏🙏🙏
पत्र जरी ९ तारखेला रात्री लिहिले असले तरी पोस्ट सकाळी करेन.
तेवढाच तुमचा चहा पिताना टाइम पास!!
😄😄
तुमचा मित्र,
हेमंत.
( सारखी आवड आणि छन्द असले तरी मैत्री प्रत्यक्ष संपर्क नसला तरीही सहज होते आणि विशेष म्हणजे या अशा मैत्रीसाठी वयाचेही बंधन नसते हे मात्र नक्की!!.)