“एखादी घटना घडून जाते ती कशी घडली याबद्दलचा सविस्तर आखो देखा हाल म्हणजे वृतांत.”
असाच एक गमतीशीर वृतांत आजच्या लेखाचा विषय म्हणून घेतला आहे. त्याचे शीर्षक आहे.
*” माझे तिसरे लंग्न “*
शीर्षक आश्चर्य देणारं अविश्वसनीय असलं तरी यात असत्य असे काहीही नाही.
शादी वो लडडू है
जो खाये वो पछताये l
जो न खाये
वो भी पछताये l
असं लग्नापूर्वी ऐकलं होत आणि नंतर पश्चातापाची भावना मला तरी कधी जाणवली नाही. सौभाग्यवती बरोबर अधून मधून भांडण झाली असतील खूप पण ती असलेल्या प्रेमापोटी होती आणि क्षणातच विरघळणारी होती.
लग्नात नांदा सौख्य भरे असा आशीर्वाद काय? आणि भांडा सौख्य भरे असा काय? दोन्हीही मला सारखेच वाटतात शेवटी सुखी आणि आनंदी सहजीवन म्हणजे लग्न असे मी मानतो.
अमीरखानचे तिसरं लग्न काही दिवसावर टीव्हीवर बघितलं. आणि दोन वर्षांपूर्वी माझ्या एकुलत्या एक बायकोशी तिसऱ्यांदा लग्न पार पडल्याची आठवण झाली
हा विवाहयोग शाळेतल्या बालमित्रामुळे दोन वर्षांपूर्वी ११ ऑगस्ट ला जुळून आला. ३ जुलै १९८८ ला आई वडिलांच्या संमतीने ठरवून केलेलं लग्न, नंतर तीस वर्षांनी २०१८ जूनमध्ये सी. ओ. इ. पी.च्या कौटुंबिक स्नेहमिलनात मित्रांनी औरंगाबाद येथेही सर्व कॉलेजात मित्रांनी असेच दणक्यात लग्न लावले होते एक तासापुरता का होईना मी या मेळाव्यास हजर होतो आणि यावेळी अजून सहा वर्षांनी ११ ऑगस्ट २०२४ ला इगतपुरीच्या रेन फ़ॉरेस्ट रिसॉर्टला आमचा तिसरा लग्न सोहळा पार पडला होता .दितीय स्नेहमिलन सोहळ्यात बालमित्रांनी हा लग्नाचा घाट घातला होता.
“उडे जब जब झुल्फे ‘तेरी…”
अशी हिंदी जुनी सदाबहार गीत
आणि मराठीतील
” दिवस तुझे ते फुलायचे
झोपळ्यावाचून झुलायचे!!”,
“फुलले रे क्षण
माझे फुलले ऱे “
ही मधूर प्रेमगीत ब्युटूथद्वारे गाडीच्या असणाऱ्या सुंदर म्युझिक सिस्टीम मधून ऐकत बहुतेकांची झुल्फे उडालेली विरळ वा पांढरी झाली असलेले सर्वं बासष्ट वर्षाचे प्रेमवीर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत असलेल्या आपल्या सात जन्माच्या अर्धांगिनीसोबत भुसावळच्या शालेय बालमित्रांची गँग दोन टेम्पो ट्रॅव्हलरने इगतपुरीच्या रेन फ़ॉरेस्ट रिसॉर्टला एक दीड वाजे पर्यंत पोहचलो, शाळेच्या स्नेहमिलनासाठी!! आणि आपल्या सौभाग्यवती बरोबर तो सुखद विवाह क्षण पुन्हा अनुभवण्यासाठी!
माझ्या लग्नात एकाने “Congratulation for joining brave army of married people!” असे अभिनंदन केल्यावर लग्न म्हणजे रणभूमी आहे का? असा भाबडा प्रश्न मनात त्या वेळी आला होता.
*”गैरसमज होता तो, खरंतर लग्न नाही तर प्रत्येकाचं संपूर्ण आयुष्यच हे प्रत्येका साठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि अस्तित्वासाठी एक लढाई असतें स्वतःच लढण्यासाठीची. आपण ती अगदी शेवटपर्यत लढत असतो.”*
के.एन.व्ही. १९७७ दहावी बॅचचे द्वितीय स्नेहमिलनासाठी भूतकाळ आज खेचून आणायची किमया माझ्या सर्वं मित्रांनी आणि सौ .वहिनींनी दाखवली.मित्र झब्बा पायजमा जाकीट परिधान केले होते, डोक्यावर टोपी पगडी फेटा आदी सर्वं ऑपशन उपलब्ध होते आणि त्यांच्या सौभाग्यवती आपल्या आवडत्या साडीत केसात आपल्या सौभाग्यासाठी प्रेमाचा गजरा माळून नटूनथटून आलेल्या होत्या. सर्वं नववधूच जणू भासत होत्या.
स्पीकरवर बिस्मिल्ला खान यांचे सनईचे मंजुळ सूर मांगल्याची अनुभूती देत होते. आपल्या मित्रासमोर समोर पुन्हा सुखद विवाह सोहळा होण्यासाठी सर्वं मित्रांनी घातलेला घाट कसा काय होतो? याची उत्कंठा सर्वांच्याच मनात होती.
या विवाह सोहळ्यात खास शंकर महादेवन यांनी मराठी चित्रपटात गायलेली मंगलाष्टक धनिमुद्रित केली होती ती अचूक वेळी आलटून पालटून वाजवण्याची जबाबदारी अचूक निभावली.खूप मित्रांनी ही वेगळ्या उडत्या चालीची मंगलाष्टक प्रथमच ऐकली होती.वराकडून रितसर मागणी घातल्यावर वधूचा होकार असल्यावरच वेळेच्या कमतरतेमुळे एका मंगलाष्टकावर लग्न लावले जाणार होते.
कार्यक्रमात विशेष रंगत देण्यासाठी बिर्लाच्या एका मोठ्या कंपनीत डायरेक्टर असलेला आमचा प्रिय मित्र खास पुण्याहून आला होता. त्याने प्रसंगानुरूप एका पेक्षा एक सुंदर गाण्याची तयारी या सोहळ्यासाठी केली होती.मैत्रीत लहान व मोठं असं काहीही नसत, एक उंच पदावर पोहलेला हा दोस्त शाळेतील बालमित्रासाठी गात होता. बहारो फुल बरसाओ हे प्रत्येक लग्नात वाजणारे रफिचे अजरामर गीत तेवढ्याच ताकतीने त्याने सादर करून टाळ्या मिळवल्यात!!
बरोडा पुणे दिल्ली अकोला मुंबई नागपूर इथें आता वास्तव्यास असणारे साठीचे बालमित्र या गेट टुगेदरच्या सोहळ्यात सौभाग्यवतीसह होते.
सुंदर मोठा AC हॉल, त्यात सोनेरी खुर्च्या हॉलला सुशोभित करत होत्या.
आमचे सचिवालयातील मित्रास अगदी वेळेवर सांगितल्यावरही नाशिकहून विवाहासाठी सुंदर फुलांच्या माळा, गजरे, आणि गुलाबपुष्प त्यांनी नाशिकला गोदातिरी जाऊन खास निवड करून आणली होती त्याच्या कार्यालयीन भाषेत, “हु. हु.ची पु.पू.झाली.” असा त्यांनी फोन केलेला असताना आम्हाला काहीच बोध झाला नाही आम्ही बहिरे झालो की काय अशी शंका मनात असतांना, त्याने व्हाट्सअप पाठवलेल्या मेसेज मुळे सांकेतिक कोडं उलगडला, राजेंद्र आणि माझा जीव भांड्यात पडला आमचे कांन शाबूत असल्याची खात्री पटली.a वाचणाऱ्या मित्रासाठी जे “हु..हु. ची पू.पू झाली .” म्हणजे नेमके काय? याचे उत्तर हवे असल्यास उद्याच्या लेखाच्या शेवटी देत आहे.
संध्याकाळी ठीक ७. ०० वाजेचा या साठीच्या युवकांच्या लग्नासाठी गोरज मुहूर्त काढला होता.
*लग्नाच्या अनेक किस्से*
*रंगतात पुन्हा त्या गोष्टी*
*मित्र साठीला घाले घाट*
*विवाहला उभे पुन्हा दोन्ही..*
*सुखद आठवला क्षण*
*दूर गेलेला भूतकाळ*
*कालचक्र मागे फिरले*
*आला पून्हा तो शुभदिन..*
*”नांदा सौख्यभरे भरे” चा*
*दिला अधीर्वाद जरी तेव्हा..*
*क्षणिक भांडलो जरी हो*
*त्याविना संसारा नाही मज्जा..*
*तिचे ते खोटे खोटे रुसणे*
*गाल लाल मोठे फुगवणे*
*पुन्हा तिला त्याने हसवणे*
*असते हेच सुखाचे जिणे*
*तिसरे लग्न आमचे याजन्मी*
*आनंदालो आम्ही दोन्ही..*
*साथ तीच ती हवी आम्हाला*
*येणाऱ्या अनेक जन्मी..*
आज इथंच थांबतो..बाकी उद्याच्या लेखात.
#सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग जुलै २०२६