मी माझे हे काही शब्द
नकळत देई तो अहंकार..
मी फक्त्त आहे कारणमात्र
जीवनी अंती हा साक्षात्कार..
जळले जरी ते सर्वं काही
अहं जळण्या आहे भारी..
नात्याचाही गर्व नको तो
ओंडक्याना लाट दूर नेई..
जाणकार जाणे सर्वं काही
मी पासून नाही तरी सुटका..
संतत्व येण्याकरीता मात्र
विसरा प्रथम स्वतः स्वतःला..
मी मानवाचे आहे लक्षण
नसता तयाला येईल देवपण..
मी जेव्हा तो नष्ट पावता
तत्परतेने होईल ईश्वरभेट..
मी तूनच दुःखाचा उगम,
विसरता सर्वं आनंदी आनंद..
विसरणे त्यास अति कठीण,
जरी येतात ते अंतिम क्षण..
कार्य करविता वरती एक
आपण करतो मनी आभास..
स्वतः मध्ये उगाच गुरफुटता
बुद्धीचा ‘स्वार्थ” करितॊ नाश..
“मी” बरोबर येणाऱ्या स्वार्थ भावना आणि अहंकार वर ओळीत अधोरेखित करणारी ही कविता लिहिली खरी.. पण लिहिताना माझ्या मनात विचार आला मी म्हणजे नेमका कोण? आणि नकळत तोच लेखाचा विषय घेऊन लिहिता झालो.
मी कोण आहे? हे पूर्ण मला माहित आहे असे छातीठोकपणे कुणी सांगत असेल तर स्वतःशीच प्रतारणा करतो आहे.
आमच्या शाळेचे घोषवाक्य होते “मीच माझा भाग्यविधाता.” मुलांना खूप आदर्श वाटावे असच होते ते . पण त्यावेळी बहुतेकांची मेडिकलला जाण्याची इच्छा असूनही दोन तीन वगळता बाकी सर्व इतर मार्गाला लागली. असं बघितलं की ते त्यांचे भाग्य स्वतः घडवू शकले नाही हे अधोरेखित होते. बहुतेक सर्वजण प्रवाहपतित जीवन जगतात.
“मी कोण?”
हा प्रश्न स्वतःला विचारून पहा. तुमच्यात काय दडले आहे हे अजूनही तुम्हालाच माहिती नसते. एखादा चांगला गायक असल्याची जाणीव निवृत्तीनंतर होते. आपण काहीतरी लिहू शकतो हे बऱ्याच जणांना कळतही नाही आणि मग उतारवयात सुरपाखरूसारख्या मंचावर प्रतिभेस पंख फुटतात.अगदी वाटसुरूना लुटणारा वाल्या कोळी आयुष्याच्या उत्तरार्धात रामायण लिहून वाल्मिकी ऋषीं बनतो. शाळेत टारगट मुलं मोठेपणी आदर्श बनतात आणि आदर्श ठरलेला विदयार्थी दारुडा व्यसनाधीन बनतो असे अनेक उदाहरणं आपण बघतो.थोडक्यात आपल्यातला मी ही परिस्थितीनुसार बदलणारा असतो हे मात्र नक्की.
बोमन इराणी वयाच्या चाळीस वर्षपर्यत फोटग्राफर म्हणून कार्य करीत होते त्यांच्यात एक अद्भुत सिनेनट दडला आहे हे त्यांनाही माहित नव्हते.
आपल्यातला “मी” जाणंण खूप कठीण आहे… अगदी देव म्हणजे नेमके कोण? या प्रश्नासारखाच मी म्हणजे कोण? हा प्रश्न आहे. म्हणूनच की काय देवालाही स्वतःत शोधा असे म्हणतात.
मी कोण? याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर अनेक अगणित उत्तर मिळतील परिस्थिती नुसार रंग बदलणाऱ्या या दुनियेत आपल्यातला “मी” पण आहे.
पण मी यातला नव्हे असा अहं घेऊन सर्व वागत असतो. दुसऱ्याला सहज दुषण देणारे आम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवताना स्वतःकडे चार बोट आहेत हे सर्रास विसरतात.
“मी” हिमनगासारखा आहे जेमतेम काही टक्के भाग तुम्हास दिसणारा… आणि उरलेला अनाकलनीय गूढ असा. जसं फुल उमलते आणि एकेक पाकळी नवीन रूप दाखवते तसेच काहीसे आहे.
काही घटना अशा घडतात कधी आदर्श वाटणारी व्यक्ती असे वागू शकेल असं वाटत नसताना विचित्र वागून चांगुलपणावराचा विश्वास उडवते. संत असल्याचा बुरखा पांघरून बोकाळलेले भोंदूबाबा जागोजागी आहे आणि त्याचे असंख्य अंधभक्त त्यांच्यातल्या “मी” ला सर्रास विसरून बाबा म्हणतात ती पूर्व दिशा असे समजून वागतात आणि मोठी फसवणूक होते तेव्हा उशीर झाला असतो.
“मी” नेमका कोण तो
माहित कुणास नाही
शोध घेताना त्याचा
रूप मात्र अनेक दावी!!
लिहिलं नव्हते कधीही
उभ्या आयुष्यात काही
एक शब्द पुरेसा आता
लिहिण्यास हो खूप काही!!
वागलो होतो तेव्हा कसा
पश्च्याताप होतो उतारवयी
वेळ लगेच ती निघून जाते
माफी मागण्या तो नाही!!
मी कोण? हे अद्भुत कोडे
शोधात आयुष्य ते सरते
चितेवर अंती लेटतानाही
प्रश्नचिन्ह कायम असतें !!
ना मिळाले उत्तर
या जन्मी तर
जन्म पुन्हा नक्की मिळणार
मी कोणचे उत्तर शोधण्या
“मी” पुनः अवतारणार!!