मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून अधिकृत मान्यता मिळाली, आम्हा सगळ्यांसाठी किती आनंदाची आणि गौरवाची बाब ही! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि साहित्य परंपरेचा मोठा सन्मान!
प्राचीन आणि समृद्ध अशा मौलिक साहित्य परंपरेचं महत्व राष्ट्रीय पातळीवर मान्य झालं आणि आता जागतिक स्तरावरही मराठीची ओळख ठळक होत जाईल.
एक विचार डोकावला, यानंतर लेखकांची मराठी भाषेची शुद्धता राखण्याची जबाबदारी वाढते का? बरेच लोक याला 'हो नक्कीच' असं उत्तर देतील. पण 'शुद्धता राखणं म्हणजे काय?' असा काटेकोर प्रश्न अनेक दिशांतून येईलच की! तसे बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात मराठीचं वेगवेगळं स्वरूप दिसतं, ते भाषेचं वैशिष्ट्यच गणलं पाहिजे. आता त्याला 'बोली' असं म्हणून 'लिखित' भाषेपासून दूर ठेवण्याचा सल्लाही मिळेल. पण मराठी साहित्यात त्यांचा वापर दिसतोच की, तेही सौंदर्य वाढवत. असो. मी भाषातज्ज्ञ नाही म्हणून मी पामर अशा प्रश्नांना काय उत्तर देणार.
भाषाशास्त्राच्या दृष्टिनं भाषा ही सतत बदलणारी असते. एका बाजूला जुनी परंपरा असते आणि दुस-या बाजूला हळुहळू बदलही घडून येत असतात. मग शुद्धता जपणे म्हणजे काय? मज पामरास वाटते की, व्याकरण सुसंगतता, अर्थ-स्पष्टता, अभिव्यक्तिची समृद्धी जपणे यात मोडत असावे. थोडक्यात नैसर्गिक विकासाला वाव देणे आणि भाषेची समृद्धता कायम जपणे ( थोडं जड वाटतं आहे ना, इतरांचं वाचून असं व्हायला लागतं).
भाषा हे मानव जातीचं वैशिष्ट्य आहे. आंतरजालावर शोधतांना आढळलं की नोएम चोम्स्की या आधुनिक भाषाविद विचारवंताच्या मते माणसाच्या मेंदूत भाषा शिकण्यासाठी अंतर्निहित रचना असते. जगातील सर्व भाषांमागे काही मूलभूत व्याकरणीय तत्त्वे असतात, त्यांत समानता असते, ही तत्त्वे मेंदूत जन्मजात असतात. मग पुढचे भाषाशास्त्रज्ञ त्याला खोडून काढायचा प्रयत्न करतात. डॅनियल इवरेट, मिशेल टोमासेलो यांच्यामते भाषा शिकण्यात सामाजिक आणि सांस्कृतिक घटक महत्वाचे असतात. परत त्यांना खोडून काढणारे शास्त्रज्ञ पुढे येतात… या सगळ्यातून मला जे समजले ते असे: एका बाजूला जैविक क्षमता आणि दुस-या बाजूला सामाजिक संवाद अनुकरण, हेतू समजणं इत्यादी क्षमता यांचा भाषा शिकण्यावर प्रभाव असतो.
थोडक्यात सामाजिक वापरातून विकसित होणारी प्रणाली मान्य होत आहे आणि भाषेत बदल होणे अपरिहार्य आहे.
इतर भाषांचे शब्द आपल्या भाषेत येणे नवीन नाही, म्हणजे भाषांमध्ये परकीय शब्द येणे ही नैसर्गिक आहे, ऐतिहासिक प्रक्रिया आहे.
मराठीतील “खिडकी” (पोर्तुगीज), “साबण” (अरबी), “दुकान” (फारसी), “कागद” (अरबी), “बाजार” (फारसी) हे शब्द आज इतके मराठी झाले आहेत की ते परकीय वाटतही नाहीत.
तर भाषेत बदल होणे सार्वत्रिक आहे. प्रत्येक भाषेत हे होतं आहे. मग त्यात घाबरण्यासारखं काय आहे ? काय त्याचा एवढा बाऊ करायचा? असे प्रश्न ही येतील.
बाऊ करण्यासारखं यासाठी आहे की, आपल्या भाषेची परंपरा, तिचं सौंदर्य, त्यामागची संस्कृती या 'स्वैर भाषिक-मिश्रणा'नं पुसट व्हायला लागली तर त्याची जबाबदारी कुणाची?
भाषा शुध्दीच्या आग्रहा बद्दल बरीच मतं दिसतात. कुणी म्हणतं, आपल्याला कुणी वेडं म्हणेल इथपर्यंत आग्रह धरु नये. म्हणून भाषाशुद्धीचा एवढाही आग्रह धरु नका.
दुसरं मन सांगतं, जोपर्यंत वेड लागेल एवढे विचार ठाम होत नाहीत, तोपर्यंत सामाजिक बदल होत नाहीत. ध्येयासाठी वेडे झालेले निष्ठावान आपण कमी का बघतो? ज्योतिबांनी काही वेड डोक्यात धरलं नसतं तर?
असा दरवेळी मी निरुत्तर होत असतो.
कल्पना करा, कडक शिस्तीच्या वरिष्ठ अधिका-यामुळे त्रस्त झालेला युवक, आपला राग असा व्यक्त करतो आहे.
“ऑफिसला जायला रेडी झालो आणि रिअलाईज झालं की फादरचं काॅरपोरेशनचं इंपाॅर्टंट काम आधी फिनिश करायला पाहिजे. ऑफिसला आजही लेट होईल आणि तो बाॅस परत शाउट करेल. एव्हरी टाईम हाच प्राॅब्लेम आहे. तो बाॅस मला अंडरस्टॅन्ड करूनच घेत नाही. आता मेसेज टाकतो आणि लिव्ह अप्लाय करतो.”
आता कुठल्या भिंगानं मराठी शोधायचं यात?
हे असंच अमर्याद चालू राहिलं तर, देवा, काय होईल रे!
तर खरा प्रश्न “परकीय शब्द का येतात?” हा नसून “स्वतःचे शब्द विसरले जातात का?” हा आहे.
जर “कार्यक्रम” ऐवजी नेहमी “इव्हेंट”, “अभिप्राय” ऐवजी “फीडबॅक”, “संवाद” ऐवजी “कम्युनिकेशन” असेच वापरले जाऊ लागले, तर मराठीची स्वतःची शब्दसंपत्ती हळूहळू मागे पडू शकते.
पण जिथे नवे तांत्रिक शब्द आवश्यक आहेत, तिथे काही प्रमाणात परकीय शब्द स्वीकारणे अपरिहार्य असले तर ठीक. त्यातही आपण नवीन शब्द शोधू शकतो ना?
दूर ध्वनी, भ्रमण दूर ध्वनी, आंतरजाल, संगणक, विजेरी, यासारखे शब्द वापरायला लागलो आहोत की आपण!
भीती ही आहे की, इतरभाषांच्या प्रभावाखाली मी माझी भाषा विसरणार तर नाही?
मराठी शब्द प्रयत्न करून वापरले नाहीत तर ते विसरायला होतील आणि काही पिढ्यांनंतर ते होते का असा प्रश्न पडेल कदाचित!
तर दोन्ही बाजू आहेत, पूर्ण शुद्धता जपण्याच्या प्रयत्नात भाषा कृत्रिम होऊ शकते आणि अतिरेकी परकीय शब्दांच्या वापरामुळे आपल्या भाषेची वैशिष्ट्ये हरवू शकतात.
तर समतोल राखायला हवा, त्याविषयी जाणीव नेहमी जागृत ठेवायला हवी. मराठीचे सौंदर्य टिकवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मराठीतील समृद्ध, नेमके आणि सुंदर शब्द जाणीवपूर्वक वापरणे—पण आवश्यक तेथे नव्या शब्दांचे स्वागत करणे.
इथं हिंदी भाषेतली ही ओळ मदतीला येते आहे पहा, प्रश्न सोपा करायला. 'आटे में नमक या नमक में आटा इसका ख्याल हमेशा रखना चाहिए '.
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जुले२०२६
#प्रयोग२०२६