Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

सांगायलाच हवंय असं नाही…पण वाचायला मात्र हवाच

यामिनी दळवी ऑगस्ट 4, 2025
bhagwan-nile-cover

‘कविता’ म्हणजे थोडक्यात सृजनाच्या मार्गाने आयुष्याचा तळ गाठायचा प्रयत्न. वास्तव आणि कल्पनाविष्कार यांची सुयोग्य सांगड घालून नेमक्या शब्दात केलेली बांधणी. भगवान निळे हे नाव तसं कवी आणि पत्रकार म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेच परंतु त्यांच्या प्रत्येक कवितेच्या गाभ्यात उतरायचं असेल तर एकमेव गोष्ट आपल्याला तिथवर नेऊन पोहोचवते ती म्हणजे – ” सांगायलाच हवंय असं नाही”.

“सांगायलाच हवंय असं नाही” हा भगवान निळे यांचा पहिला काव्यसंग्रह. गेली ३५ वर्षे अखंड सुरु असणारा कविता लेखनाचा प्रवास आणि आयुष्याच्या पोकळीतले खाचखळगे शोधत असताना पावल पावलावर मिळणारी वेगळी अनुभूती यांचा अद्वितीय आविष्कार म्हणजे हा कवितासंग्रह. सुमारे ८० च्या दशकापासून सुरु असणा-या असंख्य घटनांचे पडसाद आणि मुख्यतः स्त्री- पुरुष यांच्यातील नाते अधोरेखित करणारा असा हा वेगळा काव्यसंग्रह. मुळातच कवी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता अशा विविधांगी भूमिका पार पडत असताना भगवान निळे यांच्या कवितांचा विस्तारलेला परिघ आपल्याला या काव्यसंग्रहातून जाणवतो. त्या सोबतच सड़ेतोड़ भाषा , नेमके आणि अचूक शब्द , समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातील घटनांचे अनुभव या सा-यांनीच हा संग्रह इतर गुलछबु कवितासंग्रहांपेक्षा ‘वेगळा’ आहे. या संग्रहातील कोणतीही कविता फ़क्त कवी पुरती मर्यादित राहत नाही. प्रत्येक कविता वाचकाला गुंतवून ठेवते.  जसजसे आपण उत्तरार्धाकड़े सरकू लागतो तसतशी वेगळी अनुभूती आपल्याला मिळत जाते. आणि प्रत्येक कवितेची शेवटची ओळ आपल्याला ” क्या बात है” म्हणण्यास भाग पडते.

भगवान निळे यांच्या कवितेत कुठेही अट्टाहास नाही. ओढून ताणून आणलेले शब्द की रूपकं नाहीत. वायफळ उपमा नाहीत. जे आहे ते सड़ेतोड़ आहे. स्पष्ट आहे. सहज आहे. आणि त्यामुळेच प्रत्येक कविता आपल्या मनपटलावर तिचं स्थान उमटवून जाते. या संग्रहातील प्रत्येक कवितेचे केंद्र आहे ‘माणूस’. म्हणूनच कविता आपल्या प्रत्येकाशी संवाद साधू लागते आणि आपल्याला आपली वाटू लागते.

या कविता संग्रहाचे दोन टप्पे आहेत.
पहिला टप्पा आहे – स्त्री पुरुष नातेसंबंध आणि दूसरा टप्पा आहे तो म्हणजे कवीच्या इतर विषयांवरील कवितांचा. वाचकाला या दोन्ही टप्प्यांचा प्रवास पार करून कवितेच्या आत उतरत जायचे आहे.

पहिल्या टप्प्यात कवी स्त्री, पुरुष व् त्यांच्यातील नातेसंबंध यांविषयी आपल्या कवितेतून व्यक्त होतात. स्त्री व पुरुष या दोघांचेही भावनाविश्व , दोन्ही मनात चालणारी घुसमट , असंख्य प्रश्न , कधीही दिली न जाणारी उत्तरं अशा अनेक गोष्टींचा उहापोह या कवितांमधून आपल्या पर्यंत पोहोचतो. दोन्ही मनांमध्ये सतत चालणारा कोलाहल त्यांच्या प्रत्येक कवितेतून उपसलेला जाणवतो.

” वीस वर्षांच्या संसारातही ती
नव-याकडे पुरुष म्हणूनच पाहाते
आणि
नवरा तिच्याकडे बाई म्हणून…”

किंवा

” रात्र सवत बनून झोपली आहे उशाला
अन्
माझ्या टिकलीचा कायदेशीर धनी
माझ्यावर नुकतीच हुकूमत गाजवून
निवांत झोपी गेला आहे पाठमोरा…”

या कवितंमधून आपल्याला केवळ ‘शरीर’ या एकाच गोष्टशी बांधली गेलेली असंख्य जोडपी आणि त्यांच्या मनातील घुसमट यांची झळ पोहोचते.

“पुरुष सळसळतो तेव्हा बनतो
किनारा नसलेला समुद्र
तर बाईच्या हरेक कोप-यात
दडून बसलेली असते गर्दी…”

किंवा

” दमून भागून घरी आल्यानंतर सवयीप्रमाणे
बायको काढून ठेवते मंगळसूत्र
आता तिला हलके हलके वाटत असावे…”

या कवितांमधून आपल्याला स्त्रियांच्या मनाच्या कोप-यात चालू असणारी आंदोलनं स्पष्टपणे ऐकू येतात.
त्याचसोबत ;

“कूस बदलताना आपलं कुंकू पुसणार नाही
याची ती काळजी घेत असते
नि , मी ,
शहरात दबा धरून बसलेल्या सुप्त मराणांना
हुलकावण्या देत असतो…”

किंवा

“मी तीस वर्षे उशीरा जन्म घेतला असता तर
तू मला पंखाखाली घेऊन
माझ्या जावळावरुन मऊशार हात फिरवला असतास
अन मला
सुखाची नेमकी गोडी चाखता आली असती…”

या कवितांमधून स्त्री पुरुष यांमधील नाते एका वेगळ्या उत्तुंग टोकावर आपल्याला घेऊन जाते. अशाप्रकारे या पुस्तकाच्या पहिल्या टप्प्यात आपल्याला स्त्री पुरुष यांच्यातील नातेसंबंधांचे असंख्य पदर अत्यंत खुबीने उलगडून दाखविलेले दिसून येतात.

पुस्तकाच्या दुस-या टप्प्यात त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेल्या कविता आपल्याला वाचायला मिळतात.
‘पाच तुकडे : प्रार्थनेचे’ या कवितेत ते म्हणतात-
” माणसं देवाला अंघोळ घालतात
कपड़े घालतात
खाऊ पिऊ घालतात
भूत मात्र पोरकंच राहातं…”

तर
‘माझ्या मुलीच्या समजूतीखातर’ या कवितेत
” पुरुषांची सौंदर्य , बुद्धी , देहाची प्रशंसक दृष्टी
हळूहळू बनत जाते हिंसक.
यासाठी बायकांना पावलोपावली
सादर करावे लागते प्रमाणपत्र
आपल्या प्रतिभा , कार्यकुशलता , तत्परतेचे…”

अशा अनेक विषयांच्या आशायच्या कविता आपल्याला दुस-या टप्प्यात वाचायला मिळतात.

सुख , दुःख , माणूसपण , नातेसंबंध , समाज अशा अनेक गोष्टींवर ते आपल्या कवितेतून दिलखुलास व्यक्त होतात त्यामुळे त्यांच्या कवितेत साचेबद्दपणा जाणवत नाही. जे जगत आलो ते लिहित गेलो अशी त्यांची ‘मुक्तछंदी’ कविता आपल्यालाही आयुष्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहायला शिकवते.
त्याचासोबत ‘मुंबईचे दोन चेहरे’ , ‘श्याना कौवा’ , ‘ असं का होतं ?’ , ‘ सुखकर्ता दुखहर्ता’ असं म्हणत म्हणत त्यांची कविता थेट ‘ माझाही बाप’ , ‘ आई गेल्यानंतर ‘ किंवा ‘ मुलगी मोठी होते तेव्हा’ अशा कवितांमधून पुढे सरकते. यातील कवितांना वेळ, काळ, स्थळ, व्यक्ती असं बंधन उरत नाही .


पृथ्वीवरील सर्व माणसांसाठी या कविता आहेत याची जाणीव आपल्याला प्रत्येक कवितेच्या ओळीतून जाणवत राहाते.
त्यामुळे “सांगायलाच हवंय असं नाही” पण वाचायला मात्र नक्की हवाच असा हा कवितासंग्रह साहित्याच्या प्रांगणात एका अढ़ळ स्थानावर विराजमान होईल याची खात्री आहे…!

– यामिनी दळवी

लेखक

  • यामिनी दळवी
    यामिनी दळवी

Continue Reading

Previous: देवपूजा
Next: कच्चा लिंबू
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

WhatsApp-Image-2026-02-28-at-17.59.33.jpeg
  • ललित

“पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”

वर्षा पतके थोटे मार्च 2, 2026
Gemini_Generated_Image_hgaprihgaprihgap
  • ललित

धांदरटपणा की कामाचा ताण 

वंदना लोखंडे फेब्रुवारी 27, 2026
1000544594.jpg
  • ललित

पसारा

अपर्णा शेंबेकर फेब्रुवारी 25, 2026

ताजे लेख

  • “पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”
  • धांदरटपणा की कामाचा ताण 
  • पसारा
  • *प्रस्थान*
  • लाईक्सच्या युगात आत्ममूल्य कुठे हरवतंय?

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

WhatsApp-Image-2026-02-28-at-17.59.33.jpeg
  • ललित

“पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”

वर्षा पतके थोटे मार्च 2, 2026
Gemini_Generated_Image_hgaprihgaprihgap
  • ललित

धांदरटपणा की कामाचा ताण 

वंदना लोखंडे फेब्रुवारी 27, 2026
1000544594.jpg
  • ललित

पसारा

अपर्णा शेंबेकर फेब्रुवारी 25, 2026
54E7974C-2C73-4DFF-A984-DD6DA199BD13.jpeg
  • ललित

*प्रस्थान*

सुषमा ठाकूर फेब्रुवारी 24, 2026
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.