Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

देवपूजा

चंचल काळे ऑगस्ट 4, 2025 1 minute read
0
देवपूजा

सकाळी उठून सगळं आवरता आवरता मनात कामांची यादी सुरू होते त्यातलंच एक काम म्हणजे देवपूजेसाठी फुलं !जवळच्‍या कोपर्‍यावरच्या फुलवाल्याकडून आणायची किंवा आधी आणून फ्रीजमध्ये ठेवलेली बाहेर काढून ठेवायची.


लहानपणी आमच्या अंगणातच फुलझाडं होती, त्यामुळे ताजी ताजी फुलं मिळायची. पण तेव्हा फक्त झाडावरची फुलं आणायचं काम होतं. पूजा बाबा करायचे. तेव्हा ती पूजा पाहायला मला खूप आवडायचं. बाबा छान देव्हारा साफ करायचे, देव ताम्हणात काढून स्वच्छ करायचे, त्यांना आंघोळ घालायचे आणि छान मऊ मलमलच्या कपड्याने पुसून घ्यायचे. देवांच्या मूर्तीची ती अंघोळ बघायला मला खूप आवडायचं. मग स्वच्छ पुसलेल्या सगळ्या मूर्ती तसबिरी जाग्यावर ठेवून गंधाक्षता लावून बाबा त्यांना ती फुलं वहायचे. त्या फुलं वाहिलेल्या मूर्ती, तो सुगंध, मंद तेवणारं निरांजन, देवासमोरची दुधाची वाटी! तो सगळा माहोलच मला प्रचंड आवडायचा. बाबांना जेव्हा कुठे बाहेरगावी जायचं असेल तेव्हा ही पूजा आपण होऊन हौसेनं मी करत असे. त्यामुळे अजूनही पूजा हेच माझं आवडतं काम! मी श्रद्धावान आहेच, त्यामुळे अजूनही तेवढ्याच हौसेनं माझी रोजची पूजा होते.


पण आता अंतर्मनात मात्र खूप काही बदललंय. बदललंय म्हणजे चांगल्या अर्थाने! परमेश्वराची पूजा, त्याचा नैवेद्य, फुलं या गोष्टी मी अगदी काटेकोरपणे पाळत असे. पाळाव्या असं माझं मत होतं. एखाद्या दिवशी आजारपणामुळे वगैरे पूजा नाही जमली तर रुखरुख लागून राहायची. बाहेर पडताना देवाला नमस्कार नाही केला तर काहीतरी विसरलं, राहून गेलं हे सतत जाणवत राहायचं. त्यामुळे हे सर्व न चुकता आठवणीने करण्याकडेच माझा कल आणि तेही गेली अनेक वर्ष !आता मुलं मोठी झाली, आमचीही पन्नाशी उलटली तरी जास्तीत जास्त ओढीनं पूजा चालू राहिली. आज वयाच्या या टप्प्यावर या साऱ्याचा एक वेगळाच परिणाम अंतर्मनात जाणवतो आहे. आता एखाद्या दिवशी फुलं नसली तर मी अस्वस्थ होत नाही. अगदी नाईलाजानेच पूजा राहिली तर मला चुकल्या चुकल्या सारखं वाटत नाही. बाहेर पडताना नमस्कार राहिला तर मी बेचैन होत नाही. असं का बरं होत असेल ?


का माहिती आहे?, कारण आता असं वाटतं की ही फुलं तोच तर देतो त्याला वाहून मी काहीतरी मोठं करते असं मला का वाटत होतं! वेळेवर पूजा नैवेद्य करून जणू मीच देवावर उपकार करते असा तर भाव नव्हता ना! आणि हे सगळं आता या वयाच्या टप्प्यावर जाणवत आहे, कळतं आहे. खरंतर परमेश्वराला या कशाचीच गरज नाही. त्याला हवी आहे तुम्ही मनापासून केलेली त्याची आठवण! त्याला अंतरंगापासून आर्ततेने मारलेली हाक! आणि मनापासून हात जोडून केलेला नमस्कार!


पण हे मात्र खरं की, परमेश्वराबद्दलच्या भावनेच्या या बदलासाठी कारणीभूत ठरली ती मात्र इतके वर्ष मनापासून केलेली पूजा किंवा अध्यात्मिक कर्म! त्यामुळेच आज जेव्हा मला एखाद्या दिवशी पूजा जमत नाही तेव्हा मी मनानेच त्याचं स्मरण करते आणि तो मला दाद सुद्धा देतो. फुलं नाहीच मिळाली तर मी म्हणते, ‘अरे आज तुलाच फुलं नको होती वाटतं म्हणूनच मला मिळाली नाहीत’ मग तोही हसतो. बाहेर जाताना नमस्कार नाही केला गेला किंवा विसरला तर मला वाटतं, अरे तो तर बरोबरच आहे माझ्या, अस्वस्थ कशाला व्हायचं! तो काही घरातच राहिलेला नाही. आणि मग मन भरून येतं. त्याच्या अस्तित्वाच्या खुणा सापडत जातात.


पण हो, तरीसुद्धा हे पूजाअर्चा वेळेवर करणे नमस्कार करूनच बाहेर पडणे हे थांबवायचं नाही हे मी ठरवले आहे. कारण असं की, तो कनवाळू, दयाळू सर्व सृष्टी मध्ये भरून राहिलेला आहे,, हे खरं असलं तरी त्याचं हे अस्तित्व आपल्याला आतपर्यंत सतत कळत राहिलं पाहिजे. कारण आपल्यातलं जे ‘माणूसपण’ आहे ते बेभरवशी आहे. जर मी माझं नैमित्तिक कर्म बंद केलं आणि त्याची काही गरज नाही असं म्हटलं तर मनात जागा झालेला असतो तो अभिमान! मग हे मन लगेच त्या अभिमानाच्या घोड्यावर स्वार होऊन अहंकाराच्या पर्वतावर केव्हा पोहोचेल काही सांगता यायचं नाही. आणि मग त्या बेलगाम अश्वाचा कडेलोट ठरलेलाच.म्हणून हे नित्त्यनैमित्तिक कर्म तेवढ्याच भक्तिभावानं होणं गरजेचं! आणि फक्त हेच कर्म नव्हे तर दैनंदिन आयुष्यातलं प्रत्येक कर्म हे सद्हेतूने प्रामाणिकपणे केलं जावं हा कटाक्षही असणारच आहे. त्यामुळे या अशा मनाला, ‘माणूस’ या ‘माये’ने लपेटलेल्या आत्म्याला जाग्यावर ठेवण्यासाठी हे नित्य नैमित्तिक कर्म म्हणजे पूजा-अर्चना, वेळेवर शिस्तीत आणि मनःपूर्वक करायलाच हवे.


अनेक वर्ष जेव्हा हे असं कर्म, भक्ती मनोभावे घडते तेव्हा मनाचा वारू थोडा थोडा ताब्यात ठेवणं जमायला लागतं.


आपण देवळात सुद्धा जातो तेव्हा काही जण म्हणतात घरात देव असताना देवळात कशाला जायचं? त्याचंही कारण आहे तिथलं पावित्र्य !घरातले क्लेश कलह तिथे नसतात. त्यामुळे त्याचं अस्तित्व आपल्याला तिथे जास्त ठ्ळकपणे जाणवतं. आपल्या घरातही जर हे क्लेश कलह नसतील तर घरातही तेच पावित्र्य नक्कीच जाणवतं. मनाला हे सगळं पटण्यासाठी, हातून चांगलं घडण्यासाठी आपण त्या वातावरणात राहायला पाहिजे आणि हे ससगळं मनःपूर्वक केलेल्या पूजाअर्चनेनं, देवासोबत काढलेल्या त्या अर्ध्या-पाऊण तासाने होत असतं. मनाला शिस्त लागत असते. त्यामुळे भक्तिमार्गातलं हे थोडंसं कर्मकांड आपल्या हातून घडलं पाहिजे,हे फक्त महत्त्वाचं! त्यातही ते मनापासून कुठलीही शंका न घेता व्हायला हवं. घरातली इतर काम करतो तसं ते एक काम आहे उरकून टाका हा हेतू त्यात नसावा, तरच खूप काळाने सावकाश अंतर्मनात बदल शक्य आहे. मग हळूहळू आपोआपच त्याचं आपल्यातलं असणं आपल्याला जाणवायला लागतं. बाह्य कर्मकांडांची गरज कमी कमी होत जाते. चराचरातलं त्याचं अस्तित्व ठळकपणे लक्षात येतं आणि मग ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरुनिया’ ही अनुभूती सतत येत राहते.


मात्र ही अवस्था कायम टिकण्यासाठी अभिमान अहंकार दूर ठेवण्यासाठी रोज त्याच्यासमोर किंवा मूर्तीसमोर नतमस्तक होणं हे आपल्यासारख्या सामान्यांसाठी तितकंच महत्त्वाचं आहे.

©चंचल काळे

लेखक

  • चंचल काळे
    चंचल काळे

    कवयित्री, लेखिका

Post navigation

Previous: उमटती ज्ञानाची पाऊले….
Next: सांगायलाच हवंय असं नाही…पण वाचायला मात्र हवाच
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

gumohor-water
  • ललित

चांदणे शिंपीत जाशी

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 16, 2026 0
WhatsApp-Image-2026-04-13-at-20.11.49.jpeg
  • ललित

सगळ्याच गोष्टींची विपुलता

वर्षा पतके थोटे एप्रिल 13, 2026 0
IMG-20260412-WA0052.jpg
  • ललित

स्वर स्वामिनी आशा!!

हेमंत नाईक एप्रिल 13, 2026 0

ताजे लेख

  • चांदणे शिंपीत जाशी
  • सगळ्याच गोष्टींची विपुलता
  • स्वर स्वामिनी आशा!!
  • नकार देणं इतकं कठीण का वाटतं?
  • “विसरणं एक दैवी वरदान!!!”

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

gumohor-water
  • ललित

चांदणे शिंपीत जाशी

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 16, 2026 0
WhatsApp-Image-2026-04-13-at-20.11.49.jpeg
  • ललित

सगळ्याच गोष्टींची विपुलता

वर्षा पतके थोटे एप्रिल 13, 2026 0
IMG-20260412-WA0052.jpg
  • ललित

स्वर स्वामिनी आशा!!

हेमंत नाईक एप्रिल 13, 2026 0
WhatsApp-Image-2026-04-07-at-06.43.24.jpeg
  • ललित

नकार देणं इतकं कठीण का वाटतं?

वर्षा पतके थोटे एप्रिल 7, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.