संध्याकाळची वेळ होती. आईचा एकेक अवयव निकामी होत होता. दिव्यातली वात शांत होत जावी तशी आई विझत होती. घर मुला-सुनांनी भरले होते. संसाराचा रथ तिने अगोदरच लेकी-सुनांच्या हाती सोपवला होता. तिची सगळी जवळची माणसं त्यादिवशी तिच्या आसपास होती. तिला देहाचे आणि नात्यांचे जेव्हडे सोपस्कार पार पाडायचे होते ते सारे कर्तव्य आणि प्रारब्ध भोगून आणि उपभोगून आमची आई निजधामास निघाली होती. घराचे कर्तेपण पार पाडीत एकेक पाश आवरीत ती गेली. त्यावेळी रामरक्षा कवच पूर्ण करून आम्ही मनाचे श्लोक म्हणत होतो. आज हे सारे आठवले ना, की मनात एकप्रकारची शांतता वाटते. आपले आई-वडील कुठल्याही आजारात खितपत न पडता असे अलगद चिरनिद्रेत रमले, हे खूपच भाग्यशाली असल्याचे लक्षण आज जाणवते.
आईचे पलंगावरील आजारपण उणे-पुरे सव्वीस तासांचे आणि दादांचे (वडिलांचे) तर अवघे बारा-चौदा तासांचे! त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्याही पूर्ण झालेल्या. जीव अडकवून अपुरेपण रहावे असे काही शिल्लक नव्हते. खरे तर त्यांचे वय फार असे नव्हते. तरी देखील आयुष्याचा पूर्णविराम त्यांनी शांत मनाने स्वीकारला असावा, म्हणून तर कुठलीही घालमेल न होता, त्यांना देहातीत होता आले. हे पटून मनात शहाणपण आले, त्यावेळी आजूबाजूचे अनेक जण मृत्यूच्या दाढेत होते. आयुष्याच्या पिंजऱ्यात तडफडत होते. त्यावेळी आईदादांच्या सुखावह मृत्युला धन्यवाद द्यावेसे वाटू लागले.
नकोसे होई पर्यंत जगू नये, हे जेव्हा एक खंगलेल्या आजी सांगत होत्या ना, त्यावेळी आईदादांच्या मृत्युला स्वीकारून त्यासाठी धन्यवादाची भावना पहिल्यांदाच प्रकर्षाने मला जाणविली.
मृत्यू बद्दल माझ्या मनात खूप भावना आहे आणि औत्सुक्यही आहे. खरे तर शरीर बंद होण्याची ही तांत्रिक प्रक्रिया आहे. पण प्रत्येकाची किती वेगळी असते ना? कुणाचा शेवट कुठे-कधी-कसा आणि केव्हा असेल हे गुपित असतं. त्या मृत्यू घटिकेसाठी तुम्ही मनाने तयार असाल का? तुमच्या मागचा भौतिक पसारा आवरला असेल का?
माझे माझे म्हणत म्हणत एकेक साठवलेल्या गोष्टी, वस्तू, भावना जेव्हा जिथल्या तिथे टाकून, कुणाच्या हाती न सोपवता ज्यांना निघावे लागले असेल अशांच्या मनात नक्की काय सुरू असेल?
कविवर्य सुरेश भटांची एक कविता आहे. त्याचे गाणेही झालेय. ही कविता श्रीहरी म्हणजे कृष्णा साठी राधेने व्यक्त केलेली भावना आहे असे सांगितले जाते. परन्तु मला तर मृत्यूरूपाने प्राणसखा आल्यावर एका संसारी पसाऱ्यात रमलेल्या जीवाला काय वाटेल, हेच ही कविता सांगतेय असे वाटते. यात सजण म्हणजे मृत्यू अशी भावना घेवून ही कविता वाचून बघा…
सजण दारी उभा, काय आता करू?
घर कधी आवरू? मज कधी सावरू?
मी न केली सखे अजून वेणीफणी,
मी न पुरते मला निरखिले दर्पणी,
अन् सडाही न मी टाकिला अंगणी;
राहिले नाहणे ! कुठुन काजळ भरू?
मी न दुबळी कुडी अजून शृंगारिली,
मी न सगळीच ही आसवे माळिली,
प्राणपूजा न मी अजूनही बांधिली;
काय दारातुनी परत मागे फिरू?
बघ पुन्हा वाजली थाप दारावरी :
हीच मी ऐकिली जन्मजन्मांतरी;
तीच मी राधिका ! तोच हा श्रीहरी !
हृदय माझे कसे मीच हृदयी धरू?
घर कधी आवरू? मज कधी सावरू?
सजण दारी उभा…!
यातील खालील कडवे वाचताना तर मला अनेक जण डोळ्यापुढे येतात जे सारे अर्धवट सोडून गेले आहेत. त्यांना मृत्यू क्षणाला काय नेमके वाटले असेल? त्यांचेही मन म्हणंत असेल का..
मी न दुबळी कुडी अजून शृंगारिली,
मी न सगळीच ही आसवे माळिली,
प्राणपूजा न मी अजूनही बांधिली;
काय दारातुनी परत मागे फिरू?
काल नागपुरातील एका प्रख्यात न्यूरोसर्जनचा अचानक मृत्यू झाला. आज आमच्या सहकाऱ्याच्या नात्यातील एक जण लग्नघरी निर्वतला. असेल का त्यांची तयारी असे कायमचे जगातून निघून जाण्याची.. असे खूप विचार मनात भरकटत असतात.
मागील आठवड्यात विवेकानंद केंद्र या आमच्या विस्तारीत परिवारातील व्यवसायाने डॉक्टर असलेल्या व्यक्ती बरोबर प्रवास करीत असतानाच त्यांना मृत्यू बद्दल अनेक प्रश्न विचारले. अस्तंगत होताना शरीर काही अलार्म देतो का? मन काही बोलते का अशी ही चर्चा यवतमाळ ते नागपूर अशा प्रवासभर सुरू होती. ते समजावत होते, पण माझे समाधान होईना. माहिती घेत होते. अशी अनेकदा कुठून कुठून घेतलेली वाचलेली माहिती मनात साठवत माझ्या परिचित असलेल्या आणि अचानक संपून गेलेल्या हृदयस्थाशी पडताळून बघते. अकाल मृत्यूचा संदर्भ त्यांच्याबाबत लावत असते. कल को किसने देखा म्हणत, जीवनाचे गाठोडे जरा आवरूनच बसायला हवे, हे यामुळे कळत आहे. तरी देखील मनातले पसारे-पाश मात्र डोंगरासारखे समोर ठाकतात. सोडवत नाही.
माझ्या आई-दादांचे हे डोंगर सरले होते का? गाठोडे आवरून झाले होते का, हा प्रश्न मनात येताच डोळे डबडबतात पण मनात उत्तर ‘होय’ येते! समाधान दाटते. ‘विरते पाश… सरते नाते…’ एकदा सोडता आले तरच सगळे सोपे होईल! हे कळाल्याने आधी आई-वडिलांच्या मृत्यू पश्चात हवालदिल झालेली मी आता सावरली आहे. त्यांचा सुदैवी मृत्यू सोहळ्यातील गवसलेले समाधान मलाही एका पाशातून मुक्त करून किनाऱ्याकडे जाण्यास मोकळे करीत आहे.
कालच्या लेखात सांगितले तसे – भावनांच्या हिंदोळ्यावर झुलत ‘हमामा रे पोरा हमामा ‘ म्हणत कधीतरी संपणारे आयुष्य आज मात्र सुरू आहे, आणि आपल्याला वाटते ‘सारे आलबेल आहे!’ हीच तर आयुष्याची खरी गंमत आहे…
#हमामारेपोराहमामा!
१. १.२०२६
गौरी शास्त्री-देशपांडे