२०२५ सालात आमच्या ऑफिसमध्ये जेव्हा ‘LGBTQ acceptance’ (समलैंगिक आणि इतर लैंगिक प्रवाहांना स्वीकृती), ‘Neurodivergence Allies’ आणि ‘ADHD Awareness’ सारख्या विषयांवर कार्यशाळा आयोजित होतात, तेव्हा मला अतिशय समाधान वाटते. आज ऑफिसमध्ये असे गट स्थापन झाले आहेत आणि लोक त्यात उघडपणे सहभागी होत आहेत. हे चित्र बघताना मला अचानक २००६ सालातील आमच्या कंपनीची एक आठवण झाली आणि जाणवले की, भारतीय कॉर्पोरेट जग किती प्रगल्भ झाले आहे!
प्रसंग असा होता की, २००६ मध्ये कंपनीने व्यवस्थापनासाठी एका 'ऑफसाईट'चे (Offsite) आयोजन केले होते. त्यात वरिष्ठ अधिकारी, मिडल मॅनेजमेंट आणि माझ्यासारखे काही आर्किटेक्ट्स आमंत्रित होते. वातावरण खेळीमेळीचे होते. एका सत्रात कार्यशाळा चालकांनी प्रत्येकाला आपल्या आवडत्या सिनेमांबद्दल बोलायला सांगितले.
माझी वेळ आली तेव्हा मी सांगितले, “मला ‘ग्लेडिएटर’ हा सिनेमा प्रचंड आवडतो.” मी हे वाक्य उच्चारताच तिथे उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकारी वर्गात एकच हशा पिकला. सुरुवातीला मला कळेना की यात हसण्यासारखे काय आहे? पण त्यांच्या हावभावांवरून आणि कुजबुजीवरून लक्षात आले की, 'ग्लेडिएटर'मधील 'मॅक्झिमस' (रसेल क्रो) याचे पात्र आवडणे, याचा संबंध ते माझ्या लैंगिकतेशी जोडत होते. एका पुरुषाला दुसरा पुरुष नट आवडतो, याचा अर्थ तो 'तसा' (समलैंगिक) असावा, अशी त्यांची ती थट्टा होती.
त्यावेळी वातावरण हलकेफुलके ठेवायचे म्हणून मी त्याकडे हसून दुर्लक्ष केले. मला माहीत होते की मी विवाहित आहे आणि माझे वैयक्तिक आयुष्य वेगळे आहे. पण, आज मागे वळून पाहताना त्या घटनेचे गांभीर्य लक्षात येते. त्या वेळी 'समलैंगिक असणे' हा एक थट्टेचा विषय होता. एखाद्याची टिंगल करण्यासाठी त्याला 'गे' ठरवणे, हे अगदी सहज चालून जायचे. मी समलैंगिक नसतानाही केवळ एका सिनेमाच्या आवडीवरून मला त्या साच्यात बसवून हसले गेले, यातच त्या काळातील मानसिकता दिसून येते.
आज परिस्थिती बदलली आहे. २०२५ मध्ये त्याच कॉर्पोरेट जगात कोणाच्या लैंगिक निवडीवर हसण्याऐवजी, त्यांना सामावून घेण्यावर भर दिला जात आहे. २००६ मधील त्या हास्यापासून ते २०२५ मधील या 'Inclusion Workshop' पर्यंतचा हा प्रवास भारतीय समाजाच्या आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या प्रगल्भतेची साक्ष देतो.
तुषार जोशी
नागपूर, गुरूवार, १ जानेवारी २०२६
