माझे वडील बऱ्याच वेळा वर्तमानाच्या गप्पा करता करता भूतकाळात जात अन मग त्यातच रमत! आम्ही भावंड गंमतीने म्हणत असू, “आपल्या बापुकडे एकच काळ आहे – भूतकाळ!”
पण हल्ली सारंच इतक झपाट्याने बदलत आहे की, मी सुद्धा वैद्यकीय व्यवसायात गेल्या तीन दशकात झालेल्या व होऊ घातलेल्या बदलाची तुलना करते.
तालुक्याच्या ठिकाणी हॅास्पिटल, मूळ गाव १० किलोमीटर, त्यातही जनरल व सर्जिकल-मॅटर्निटी असा हॅास्पिटलचा सेट अप. आमच्याकडे येणारे सर्जन, गायनॅकॅालाजीस्ट, अॅनेस्थेटीस्ट, आमचा स्टाफ आणि आमचे पेशंट हे आमचे विस्तारित कुटुंब! एकूणच डॅाक्टर माणूस सतत सुटी घेऊ शकत नाही, परिणामी याच विस्तारित कुटुंबात दिवस उगवतो व मावळतो. व्याधी निदान व इलाज याव्यतिरिक्त मी अनेकांच्या सुखदुःखात व्यक्त होण्याची हक्काची व्यक्ती आहे. खूप सलगीने व विश्वासाने कौटुंबिक घडामोडीतही नकळत सामील असते.
छोटे गाव, मूळ गाव जवळ व जनरल प्रॅक्टिस यामुळे काय झाले, अनेक कुटुंब मला घरच्यासारखी वाटतात व अनेकांना मी. ज्या मुलामुलींचा माझ्या हॅास्पिटलला जन्म झाला, आता त्यांच्या मुलांचाही जन्म याच हॅास्पिटलला! अशी मी अनेकांची आजी झाली. नेहमीचे सारे पेशंट हॅास्पिटलला आल्यावर आपले आजारपण सांगण्याअगोदर आवर्जून माझ्या मुलांची चौकशी करतात.
बिल कमी करणे, नंतर देणे, कधी कधी फक्त सल्ला विचारायला येणे, फोनवरच छोट्या-मोठ्या समस्यासाठी औषध सुचवा असे सांगणे, दिलेला वेळ संपल्यावर येणे, रात्री-बेरात्री येणे हे परिचयामुळे ओघाने आलेच!
शिक्षण, मोबाईल, सोशल मीडिया, उपलब्ध अनेक संभाव्य पर्याय, वैद्यकीय व्यवसायात शिरलेल्या दुर्प्रवृत्ती यामुळे वैद्यकीय व्यवसायात अनेक बदल झालेत. बदललेली जीवनशैली, ढासळत चाललेली नैतिक मूल्ये यामुळे पूर्वी नसलेल्या अनेक शारीरिक व मानसिक, तसेच भावनिक समस्यांनी समाज त्रस्त आहे. कधी कधी अचंबित व्हायला होते, तर कधी कधी यातून कसा मार्ग काढावा? मनाचे-तनाचे कोणते औषध योग्य ठरेल? असे वाटते.
रोज तेच काम असले तरीही प्रत्येक दिवस आपले वेगळेपण घेऊन येतो व नवीन काही शिकवून जातो. आणि या बदलाने एक व्यक्ती म्हणून व एक डॅाक्टर म्हणून मी अधिकाधिक समृद्ध व प्रगत होत जात आहे.
१-१-२०२६
डॅा. जयश्री मनोज निकम