मी हडस शाळेचा पाचवी ते दहावी पर्यंतचा विद्यार्थी. आमच्या शाळेत लाडकर सर , व्यवसाय कसे करायचे , ह्याचे विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी सहकारी दुकान विद्यार्थ्यांमार्फत चालवायचे . मी तेथे दुपारच्या सुट्टीत काम करीत असे, त्याबाबत मला कधी बोरकुटाची पुडी तर कधी श्रीखंडाच्या गोळ्याचे पाकीट मेहताना म्हणुन मिळत असे. तेथुन आम्ही शालेय शिक्षणासाठी आवश्यक असलेली पुस्तके, वह्या, कंपास, पेन, पेन्सील असे सामान विद्यार्थ्यांना विकत देत असु .ह्या सहकारी दुकानात काम करण्याचे दुसरे आकर्षण म्हणजे येथील पुस्तकपेढी . जो विद्यार्थी येथे काम करीत असे , त्याला त्या वर्षाची सर्व पुस्तके वापरायला मिळत असत. आपले काम झाले की आम्ही ती सर्व पुस्तके सुस्थितीत वापस करत असु . त्यामुळे पुस्तकांचा वापर कसा करावा, त्याचे वर्षभर जतन कसे करावे, हा संस्कार आम्हाला आपोआप मिळत असे. आजसुद्धा मी पुस्तकावर पेन घेऊन काही लिहिले आहे,असे होत नाही. काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखांकित करायचे असतील तर, अपआजही मी पेन्सिल वापरतो. दुसऱ्याचे पुस्तक वापस देतांना खोडरबरने सर्व साफ करून देत असतो. आपल्या पुस्तकाचा आपणच आदर करायचा असतो, ह्याचे बाळकडू आम्हाला शाळेतच मिळाले होते.
पुढे ही पुस्तकपेढीची सोय बंद झाली,तेंव्हा माझी दुसरी सोय झाली होती. माझे पितळे काका महाराष्ट्र शिक्षण मंडळात नोकरीला होते, त्यांना राजु आणि दत्ता अशी दोन मुले होती, राजू माझ्यापेक्षा एक वर्षाने मोठा तर दत्ता एक वर्षाने लहान . माझ्या काकांना दरवर्षी राजुसाठी एक नवीन कोरा पाठ्य पुस्तकांचा संच मिळत असे, तो त्याने वापरला की, नंतर, मी तो वापरीत असे, आणि नंतर मग तो दत्ता वापरीत असे. त्यामुळे त्या पुस्तकांचा पूर्ण संच वर्षभर जपण्याचा संस्कार आपोआप होत होता.
पुढे मी जेव्हा नागपूरच्या शासकीय महाविद्यालयात गेलो , तेव्हा आम्हाला नवीन आणि महागडी पुस्तके कॉलेजच्या ग्रंथालयातून पंधरा दिवस वापरायला मिळत असे . रोज लागणारी काही पुस्तके आम्ही मित्र ठरवून विकत घेत असू , तर काही आमचे सीनियर मित्र आम्हाला वापरायला देत असत. त्यामुळे वेगवेगळी पुस्तके संदर्भाला मिळत असायची. पुढे जेव्हा मी थोडेफार पैसे कमवायला लागलो तेव्हा मग मी माझीच पुस्तकपेढी तयार करायला लागलो. त्यामुळे आजही माझ्याकडे अगदी सुरवातीला घेतलेली पुस्तके सुद्धा उपलब्ध आहेत. आमच्या वैद्यकीय क्षेत्रात काही कालांतराने तेच पुस्तक नवनवीन बदल होऊन येतात, असे प्रत्येक एडिशन मी घेत असतो. पुढे बरीच वर्षे मी प्राध्यापक म्हणून कार्यरत होतो , तेथे विभागीय लायब्ररीचे काम माझ्याकडेच होते. मी जेव्हा मागच्या वर्षी सेवानिवृत्ती घेतली तेव्हा , माझ्या विभागाच्या ग्रंथालयासाठी अश्या नवीन पुस्तकांचा एक संच विकत घेऊन ग्रंथालयाला भेट दिला आहे .
आजपर्यंतच्या माझ्या जीवनप्रवासात मी शहरी, ग्रामीण, वनवासी अश्या अनेक ठिकाणी कामनिमित्त भटकलो, पण प्रत्येक ठिकाणी माझा हा ग्रंथ संग्रह सदोदित सोबत असायचा. रुग्णसेवा करताना कित्येक वेळा काही कठीण प्रसंग आला , तर हेच ग्रंथ माझे गुरु म्हणून मला तारून घ्यायचे. जीवनात अनेक चढउतार आले तरीही , माझे हे पुस्तकपेढीचे प्रेम आणि आकर्षण आजही कायम आहे. पुस्तकांच्या रूपातील सरस्वतीचे हे देणे सांभाळत असता नकळत लक्ष्मीचा वरदहस्त केव्हा लाभला , हे कळलेच नाही .