सूर्याचा रंग त्याच्या किरणांपेक्षा जरी वेगळा दिसत असला, तरी त्यातून सप्तरंगांची उधळण होत असते. सप्तरंगांचं एकत्रीकरण म्हणजे सूर्यबिंब. तसंच माणसाच्या जीवनाचं आहे. जन्म झाल्याबरोबर बाळाला नजर नसते. पण त्याच्या जीवनात रंग उधळणारे मात्र त्याला नजर येण्यापूर्वीच प्रेम करत असतात. हळूहळू बाळाला पाळण्यात लावलेल्या चांदव्यातील चंद्र, चांदण्या, रंगीत पक्षांची ओळख होते, नजर येते आणि मग त्या नजरेत दिसू लागतात आयुष्याच्या नात्याच्या बंधांचे विविध रंगीत नाते.
.
रंगांची उधळण म्हटल्यावर मन कसं मोर होऊन थुई थुई नाचू लागतं. रंगांची आवड बालमनातच निर्माण झालेली असते. घरातल्या भिंतीवर रंगकाड्यां घेऊन हात फिरवताना त्या दोन अडीच वर्षाच्या बाळाला होणारा आनंद अद्वितीयच. त्याचं भावविश्व तो साकारत असतो.इथूनच रंगाच्या रंगात तो रममाण होतो. निसर्ग वेळोवेळी त्याचे रंग आपल्यावर उधळीतच असतो. तशीच ही पखरण नात्यातूनही होत असते. त्या चिमुकल्याला कळू लागतं,
.
“नाती जपण्यात मजा आहे
बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे
जुळलेले सूर गाण्यात मजा आहे
येतांना एकटे असलो तरी
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे”
बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे
जुळलेले सूर गाण्यात मजा आहे
येतांना एकटे असलो तरी
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे”
.
कवी मंगेश पाडगावकर यांच्या कवितेतील या काव्यओळीच जणू त्याला अनुभवायच्या आहेत. त्यासाठी विविध रंगांची नाती जपण्यासाठी आयुष्यभर तो धडपडत असतो. नात्यातील रंगांचे विविध रंगी पदर जाणून घेत असतो.
.
आपल्यावर माया करणारी, वात्सल्य मूर्ती आई तिच्या प्रेमाला कोणत्या बर रंगाची उपमा द्यावी. प्रेम करणारं हे काळीज कोणत्या रंगाचं असेल. मनामध्ये कुठलाही द्वेष न ठेवता मुलावर निस्सीम प्रेम करणारा शांत, हळुवार, वेळप्रसंगी कठोर पण प्रेमाची फुंकर घालणारा असा पांढरा रंग असावा. प्रेमाच्या कुठल्याही नात्यात ती सहज सर्वांना सामावून घेते. आणि स्वतःच त्या रंगाची होऊन जाते. पांढऱ्या रंगासारखं स्वतःचं अस्तित्व निथळ ठेवून स्वत्व विसरणारी आपली आई. कायमच मुलांच्या कल्याणासाठी राबतांना दिसते. श्वेतवस्त्रधारणी माता सरस्वतीला आपल्या मनात रुजविणारी, काळ्या पाटीवर पांढरी शुभ्र अक्षरे गिरवून घेणारी पहिली गुरु तीआहे.
.
आकाशागत आपल्यावर कायमस्वरूपी छत्रधरणारा आपला बाप. निळ्या आकाशासारखा कायम आपली साथ देणारा. विशाल विचारांची उधळण आपल्या जीवनात करणारा, आपला पिता. निळ्या आकाशासारखं विशाल मन करून आपल्या चुका पोटात घेऊन आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारा आपला तात. मार्गस्थ गुरु. त्याच्या निळ्या आकाशामुळे आपल्या लुकलुकुण्यालाही अर्थ प्राप्त होतो. संकट समयी खंबीर बापच आधी डोळ्यासमोर येतो.
.
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई यांच्यातील अपूर्व नात्याचा रंग हिरवा असावा. स्वतः कष्ट सोसून इतरांना हिरवाईत रमवणारा. एकमेकांप्रती प्रेम भावना जागृत ठेवणारा. आपल्या भावा-बहिणींचे प्रेम, समोर न दाखवता फक्त मनामध्ये साठवून योग्य क्षणाची वाट पाहणारा हिरवा रंग.प्रत्येक शब्दाचा ( भांडतांनाच्या) आनंद घेऊन चिडवणारा. पण मनामध्ये कुठलाही आकस न ठेवता, चिडवणे हा उद्देश असणारा आनंददायी हिरवा रंग.
.
सर्व नात्यांमध्ये प्रेमाची उधळण करणारा, वेळप्रसंगी बहिणीसाठी, भावासाठी पुढच्याशी वाद घालणारा आणि आपल्या भावा-बहिणींचे रक्षण करणारा हाच तो हिरवा रंग. निसर्गातील सौंदर्याप्रमाणे तिच्यासमोर आपण आपले मन आरामात मोकळे करून, सकारात्मकतेचा संदेश देणारा, निसर्ग सौंदर्याप्रमाणे भावा बहिणीचे नाते खुलवणारा हाच तो हिरवा रंग.
.
.
तारुण्यामध्ये पदार्पण केल्यानंतर मनमोराचा पिसारा फुलविणारा, दृष्टादृष्ट होताच गालावर रंग चढणारा गुलाबी रंग.
.
“तो चटोर चित्त चोर वाट रोखतो
हात ओढून खुशाल रंग टाकतो
रंगवून रंगूनी गुलाल फासतो”
हात ओढून खुशाल रंग टाकतो
रंगवून रंगूनी गुलाल फासतो”
हरीला सुद्धा आपल्या राधेला गुलाबी रंगात रंगून टाकावेसे वाटते.सर्वच जीवांच्या आयुष्यात नंदनवन फुलविणारा आहे . गुलाबी कमळफुलांनी फुललेले हे हृदयस्पर्शी सरोवर. आपलेपणा सांभाळून प्रेमाचं प्रतीक ठरलेला हा गुलाबी रंग आहे. प्रेमाला अलवार फुलवून प्रतीक रूपाने समोर येतो, आणि सार आयुष्य गुलाला प्रमाणे गुलाबी करतो.
.
असं म्हणतात दुधापेक्षा दुधाच्या साईवरच आपला जास्त जीव असतो. नातवांवर दुधाची साय समजून निरपेक्ष मनाने प्रेम लुटणारा, आनंद देणारा, आपल्या आजी आजोबांचा प्रेमळ असा पिवळा रंग. नातवांच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीत त्यांना होकार देऊन, त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आजी-आजोबांना करावी लागणारी कसरत खूप वेगळ्या प्रकारची आहे. या नातवांसाठी पिवळी झालर विणून त्यांचे जीवन अधोरेखित करणारा पिवळा रंग. प्रत्येक हट्ट पूर्ण करणारा, नात्यातील ओलावा जपणारा पिवळा रंग. आजी आजोबांच्या संगतीने बोलीतील पावित्र्य जपणारा सुखकारक पिवळा रंग.
.
पती-पत्नीच्या सहजीवनाचा पाया असलेला प्रेम आणि उत्साहाचा लाल रंग. आईच्या, ताईच्या, आजीच्या मावशीच्या, आत्याच्या, काकीच्या कपाळावर उठून दिसणारा सौभाग्याचं प्रतीक असलेला लाल रंग. पती-पत्नीच्या भांडणांमध्ये विजयी मुद्रा उमटविणारा आनंददायी लाल रंग. प्रेमाची कबुली देणारा लाल रंग. आणि त्या रंगात रंगून गेलेली ती.
.
मनापासून ओठापर्यंत अतिशय आपल्याजवळ असलेला आपला मामा. भाच्यांवर आनंदाची उधळण करत, अंगा खांद्यावर घेऊन मनमुराद मस्ती करणारा मामा. केशरी रंगाची चमक आपल्यावर वर्षावणारा आपला मामा. केसरासारखा प्रेमाचा सुगंध आपल्या जीवनात अविरत उधाळणारा मामा. कायमच आपण शिरोधार्य मानतो. भाच्याच्या जीवनात केसराचा पाऊस पडणारा मामा. नकळत शौर्य रुजवणारा मामा. पराक्रमाची ओळख करून देणारा मामा. केशरी ध्वजाचा अभिमान बाळगणारा मामा, कायमच मनातील एक कोपरा त्याच्यासाठी राखीव ठेवलेला असतो.
काका, पुतण्यांवर आपला जीव ओवाळून टाकत असतो. कल्पकतेचा विकास करणाऱ्या जांभळ्या रंगाची उधळण काका कायमच आपल्यावर करत असतो. काका आपल्या कल्पकतेने नेहमीच पुतण्यांच्या जीवनात नवकल्पना प्रवेशित करत असतो. काका म्हणजे रहस्याचा खजाना असलेल्या जांभळ्या रंगाप्रमाणे पुतण्यांच्या जीवनाला आकार देण्यासाठी, योग्य वळण लावण्यासाठी लाड करतानाच वेळप्रसंगी एक चापटी मारण्याचे धैर्य बाळगणारा. पुतण्यांच्या इच्छापूर्तीसाठी आपल्या भावाला समजूत घालणारा काका कायमच मनात आदराचे घर करून राहतो. .
प्रत्येक नात्याचे रंग उलघडताना नाती नव्याने डोळ्यासमोर
येतात.आपलेपणाची भावना जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. ही जाणीव या रंगानेच फुलत असते. तसेच विविध रंगी रंग आपल्या जीवनात आनंदाची उधळण करीत असतात. या नात्यांच्या रंगात परत एकदा फेरफटका मारून येऊया. हे रंग जीवनाला घडवत असतात, आनंद देत असतात. कवी मंगेश पाडगावकर म्हणतात त्याप्रमाणे,
येतात.आपलेपणाची भावना जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. ही जाणीव या रंगानेच फुलत असते. तसेच विविध रंगी रंग आपल्या जीवनात आनंदाची उधळण करीत असतात. या नात्यांच्या रंगात परत एकदा फेरफटका मारून येऊया. हे रंग जीवनाला घडवत असतात, आनंद देत असतात. कवी मंगेश पाडगावकर म्हणतात त्याप्रमाणे,
.
” रंगांचा उधळूनिया पंखा
सांज कुणी ही केली
काळोखाच्या दारावरती
नक्षत्रांच्या वेली”
सांज कुणी ही केली
काळोखाच्या दारावरती
नक्षत्रांच्या वेली”
.
मनात जेव्हा केव्हा विषन्नता दाटून येते, तेव्हा या नक्षत्र वेलींचा आधार हा त्या काळोखाला संपवून मनात कुठेतरी पाठीवर हात फिरवतो ‘घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे.’ म्हणूनच जीवन हे रंगात रंगून जाते.
.
“आहात तुम्ही ‘सावरायला’ म्हणून ‘पडायला’ आवडते,
आहात तुम्ही ‘हसवायला’ म्हणून ‘रडायला’ आवडते,
आहात तुम्ही ‘समजावायला’ म्हणून ‘चुकायला’ आवडते,
माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे ‘सगळे’ म्हणून,
मला जगायला आवडते.”
आहात तुम्ही ‘हसवायला’ म्हणून ‘रडायला’ आवडते,
आहात तुम्ही ‘समजावायला’ म्हणून ‘चुकायला’ आवडते,
माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे ‘सगळे’ म्हणून,
मला जगायला आवडते.”
.
या काव्यओळी आयुष्यातील सर्व रंगात जगण्याची उमेद, विश्वास देणाऱ्या आहेत. म्हणून आपल्याला कुटुंबातील नात्यांच्या विविध रंगात रंगायला आवडते..
डॉ.अश्विनी प्रवीण देहाडराय