अर्धा तास
रोज सकाळी दहा वाजता तिच्या कामाची वेळ सुरू व्हायची. वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर असल्यामुळे बरोबर दहाला पाच कमी असताना जिन्यावर तिची पावलं वाजायची. नीट मिनिट काट्याने बाराचा आकडा ओलांडायच्या आत मस्टरवर तिची सही झालेली असायची.
सानिका वेखंडे. साधी सरळ पण आकर्षक राहणी. शांत आणि आत्मविश्वास असलेलं व्यक्तिमत्व. बोलणं तसं कमीच. वागण्यात चपळ. सानिकाचं स्वतःचं एक विश्व होतं. ती आपल्या विश्वात सदैव रमलेली असायची.
शहरातल्या नावाजलेल्या जुन्या आणि भव्य ग्रंथालयामध्ये ती प्रमुख ग्रंथपाल होती. स्वतःला देखील वाचायची अतिशय आवड असल्यामुळे तिची नोकरी हाच तिचा छंद होता. सकाळी दहाला ग्रंथालयात आलेली सानिका संध्याकाळी सहा वाजता आपले कामकाज आटोपते घेत असे. त्यानंतर अर्धा तास ती पुस्तकांसोबत वेळ घालवीत असे. सहा वाजता सगळे इतर कर्मचारी लगबगीने ग्रंथालय सोडत. सानिका मात्र कुठल्यातरी कपाटापाशी पुस्तक चाळत असायची. तिने कर्मचाऱ्यांना सांगून ठेवले होते की सहा वाजल्यानंतर ते घरी जाऊ शकतात. शांतपणे ती आपल्या आवडीचे पुस्तक निवडायची आणि वाटलं तर घरी घेऊन जायची वाचायला. रोजचा हा तिचा शिरस्ता होता. सगळ्यांनाच तो माहीत असल्यामुळे तिच्या टेबलवर ग्रंथालयाच्या कुलपाच्या किल्ल्या ठेवून कर्मचारी घरी जात.
त्यानंतर अर्ध्या तासाने सावकाश सगळे दिवे मालवून, ग्रंथालयाला कुलूप लावून सानिका घरी जात असे.
त्यादिवशी देखील सहानंतर ग्रंथालयातील ‘संकीर्ण’या सदरातील पुस्तके बघत होती. बघता बघता एका पुस्तकावर तिची नजर पडली.
आजूबाजूला ठेवलेल्या पुस्तकांपेक्षा ते पुस्तक वेगळ्याच आकाराचे होते. तिने हातात घेतले आणि मुखपृष्ठ बघताच तिला आश्चर्य वाटले. तेवढ्यात खिडकीतून गार वारा येऊ लागला. पुस्तकाची पाने फडफडू लागली. तिला पुस्तक बंदच करावे लागले. प्रथम तिने जाऊन खिडकी बंद केली. घड्याळाकडे बघितले तर साडेसहा वाजले होते. तिला ते पुस्तक अजून नीट बघायचे होते म्हणून तिने पहिले पान उघडले.
स्वतःच्या हिमतीवर हे पुस्तक वाचा.
पुढे काही घडल्यास याला जबाबदार तुम्ही स्वतःच असाल.
पहिल्या पानावर फक्त इतकाच मजकूर होता.
हे काय भलतेच ?
कोणत्या विषयावरचे पुस्तक आहे हे ?
आजपर्यंत आपल्याला कधी दिसले कसे नाही ?
असे अनेक प्रश्न तिच्या मनात आले.
का कुणास ठाऊक…तिने ते पुस्तक काढले त्या जागेवर परत ठेवले आणि नेहमीप्रमाणे ती घरी गेली.
कधी कधी आपण एखादी कृती कोणत्या प्रेरणेने करतो ते आपल्यालाही कळत नाही.
दुसऱ्या दिवशी ती सहा वाजण्याची आतुरतेने वाट बघत होती.सगळे गेल्यानंतर ती जागेवरून सावकाश उठली.आपण इथे एकट्याच आहोत…आज तिच्या मनात आले. इतक्या मोठ्या ग्रंथालयातील त्या विशिष्ट कपाटाजवळ ती पोहोचली.कपाट उघडले.ते पुस्तक शोधले पण ते पुस्तक तिथे नव्हते.तिने पूर्ण कपाट शोधले पण ते पुस्तक काही सापडले नाही.पुस्तक क्रमांकाप्रमाणे ओळीने रचून ठेवली होती.एकूण पुस्तक संख्या बरोबर होती. असे कसे काय झाले….ती अस्वस्थ झाली….तिची एरवीची शांत मुद्रा आता पार बदलून गेली….
क्रमशः