संत तुकाराम आपल्या एका अभंगात लिहितात,”असाध्य तें साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ll “
“शक्य की अशक्य” या दोन्ही बाजुवर लिहिण्याचा आज माझा प्रयत्न.. तिस दिवस सातत्याने लिहीण कठीण असूनही सर्वांनी ते सहज यशस्वी केले आहे.
पाचवीत असताना “प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे!! ही म्हण वाचल्यावर, हे अजिबात शक्य नाही असा वाद आम्ही सरांशी शाळेत घातला असल्याचे आठवते.
तेव्हा सरांनी, ” तुम्ही या म्हणीचा शब्दश: अर्थ घेऊ नको प्रयत्न केल्यावर काही अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरू शकता असा या म्हणीचा गर्भीतार्थ तुम्ही समजून घ्या.. जसे जसे तुम्ही मोठे व्हाल तस तुम्हाला अशा अनेक गोष्टी आजूबाजूला किंबहुना तुमच्या स्वतःच्या जीवनात असे अनेकदा घडून येताना दिसतील.”
*” Nothing is impossible, the word itself says ‘I’m possible'”*
या शतकापूर्वी कुणी तुम्हाला हजारो किमी अंतरावरून तुम्ही प्रत्यक्ष क्रिकेट सामना घरी पलंगावर आरामात बसून प्रत्यक्ष बघू शकाल असं कोणी सांगितलं असत विश्वास बसला नसता पण ते आता शक्य झालेले आपण बघितलं आहे. हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रॉमगनेटीक लहरीमार्फत हे प्रक्षेपण शक्य झाले आहे. महाभारतातही संजयला दिव्यदृष्टी होती दूरचे तो पाहू शकत होता. असा उल्लेख आहे. ती नेमकी कोणती आणि कशी ?
पुष्पक विमानाचा उल्लेख रामायणात आहे.पुष्पक विमान हे रामायणातील एक पौराणिक उडणारे वाहन होते, जे मय दैत्याने कुबेरासाठी बनवले होते, पण रावणाने ते हिसकावून घेतले. मनाच्या वेगाने धावणारे हे विमान रावणाने सीतेच्या अपहरणासाठी वापरले होते आणि नंतर राम-रावण युद्धात रावणाचा पराभव झाल्यावर, श्रीराम-सीता अयोध्येला परतण्यासाठी याच विमानाचा वापर केला. पुष्पक विमान हे प्राचीन भारतीय संस्कृतीत हवाई वाहतुकीचे प्रगत ज्ञान दर्शवणारे एक मोठे उदाहरण मानले जाते.
पुष्पक विमान या कित्येक शतक आधीपासून अस्तित्वात असलेल्या पौराणिक कल्पनेचे आधुनिक शास्त्राच्या साहय्याने राईट बंधूनी विमानाचा शोध लावुन प्रत्यक्षात आणली आहे.
पूर्वी देव अंतर्धान पावले आणि क्षणात दुसरीकडे प्रगट झाले असे अनेक पौराणिक कथात आपण वाचले आहे. तस म्हणलं तर या घटनाही पुष्पक विमानासारख्या पौराणिक कल्पना वाटतात.. पण जर पदार्थाचे(Matter)चे प्रकाशाच्या वेगाने वेगवान वहन करण्याचा शोध जर लागला तर हे देखील शक्य होईल.
भारतात १८५३ मध्ये जेव्हा पहीली आगगाडी चालली तेव्हा लोक डोळ्यावर विश्वास ठेवू शकत नव्हते..
“साहेबाचा पोराची अक्कल भारी
बैलाविना गाडी हाकली ”
असे कौतुकाचे उदगार त्यावेळी ओठी आपोआप यायचेत.
ऊर्जेचा खरा स्रोत म्हणजे सूर्य. त्याची मुबलक असणारी सोलर एनर्जीं खूप प्रमाणात जर पेन ड्राईव्ह सारख्या छोट्या डेव्हाईस मध्ये खूप काळासाठी स्टोअर करण्याचा शोध लागला तर पेनड्राइव्ह गाडीला लावून हजारो किमी जाऊ शकू.मग पेट्रोलची गरजच लागणार नाही.
गरज ही शोधाची जननी आहे त्यामुळे जगात अशक्य असे काही नाही.
_”तुम्ही आज जे करतात त्यात तुमचे भविष्य दडले असते. म्हणून नेहमी काहितरी चांगले करत रहाणे महत्वाचे!!”_
हल्ली चर्चेत आर्टिफिशीअल इंटिलिजन्स म्हणजे तर एक आश्चर्य आहे.. भविष्यात कामाचे स्वरूप कसे असेल.. तुम्हांला कोणते स्किल हवे.. असे अनेक प्रश्न नविन पिढीपुढे आहेत.
अगदी परावाच वर्डकप सेमियनल सहज जिकू असं वाटत असताना इंग्लंडच्या बेथेलंच्या फटकेबाजीने क्रिकेटवेड्या भारतीयांना देव पाण्यात ठेवायला लावले होते. आपण जिंकलो खरं पण बेथल हरूनही जिंकला होता.
क्रिकेट वरून आठवलं, वेस्ट इंडिज मध्ये तेथे चाललेल्या लीगच्या एका T20 सामन्यात एका चेंडूत विजयासाठी २१ धावा हव्या होत्या त्यावेळी फलंदाजी करणारे सर्व जण हार स्वीकारून निराश बसले होते.शेवटचा चेंडू टाकला तर तो वाईड ठरला.. एक धाव मिळाली तरी विस धावा बाकी होत्या… परत चेंडू टाकला गेला फलंदाजाने षटकार लागवला तो नोबॉल ठरवला गेला.. आता एका चेंडूत १३ धावा बाकी होत्या.. नुसता वैध चेंडू टाकला तरी गोलंदाजी करणारी टीम जिंकणार होती.. पण पुन्हा टाकलेला चेंडूही नो बॉल आणि त्यावरही फटकावलेला षटकाराने एक बॉल आणि सहा धावा असं विजयाचे शक्य समीकरण दाखवू लागले.. आणि मग बॅट्समन अंतिम टाकलेल्या चेंडूवर षटकार मारून विजयश्री खेचून आणली.. शेवटच्या चेंडूवर चक्क एकवीस धावा काढल्या होत्या.अविश्वासनीय वाटते पण ही प्रत्यक्षात घडलेली घटना आहे.
असे अशक्य वाटणारे अनेक वेगवेवेगळे किस्से आपण जीवन जगताना प्रत्यक्ष अनुभवतो या जगात शून्यातून विश्व निर्माण करणारे विश्वनाथही खूप आहेत. फक्त सातत्याने प्रयत्नांची गरज आहे.
*”शक्याशक्य”*
शक्य अशक्यतेचे
मनी पारडे वरखाली..
अशक्य शक्य होते
करता प्रयास भारी..
शक्य काही होता,
भरारी अशक्यासाठी..
नाही ते मिळता,
ओढ सदैव त्याची..
वाळूचे कण रगडीता,
प्रत्यक्ष नाही तेल..
विसरू नका त्याला,
जे नाही होत शक्य..
शक्यच सहज साध्य,
अशक्य दूरचे ते स्वप्न..
कधी अजाणते तेही,
अभ्यासाने ते साध्य..
प्राप्त अशक्य जरी होते
कधी नव्हते ते हो शक्य..
शक्यशक्यातेच्या व्याख्या
बदलतात काळास्वरूप..
आजच्या करण्यातच
उज्वल भविष्य उद्याचे
करत रहा नित्य चांगले
हेच या ओळीतूनी सांगणे..
🙏🙏🙏
हेमंत नाईक
सोमवार, ९. ०३. २०२६