आपल्या आयुष्यात कितीतरी वेळा अशी परिस्थिती येते, जेव्हा मनातून स्पष्ट नाही असतं, पण ओठांवरून हो बाहेर पडतं. कुणाचं काम नकोसं वाटत असतानाही आपण ते स्वीकारतो, वेळ नसतानाही ठीक आहे म्हणतो, आणि स्वतःला त्रास होईल हे माहित असूनही दुसऱ्यांना दुखावू नये म्हणून होकार देतो. मग प्रश्न पडतो… नकार देणं इतकं कठीण का वाटतं?
यामागचं पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे लोक काय म्हणतील? ही भीती. लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की नम्र राहा, समोरच्याचं मन जपूया, कुणाला दुखवू नका. या शिकवणुकीत चांगुलपणा आहे, पण त्याच वेळी आपण स्वतःच्या भावना बाजूला ठेवायला शिकतो. नकार दिला, तर समोरचा नाराज होईल, आपल्याबद्दल वाईट विचार करेल…ही भीती इतकी खोलवर रुजते की आपण स्वतःलाच नकार देतो.
दुसरं कारण म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची गरज. अनेकांना असं वाटतं की आपण सतत मदत केली, सगळ्यांसाठी उपलब्ध राहिलो, तरच लोक आपल्याला चांगलं मानतील. त्यामुळे प्रत्येक वेळी होकार देणं म्हणजे जणू आपली किंमत वाढवणं, असा गैरसमज तयार होतो. पण या प्रक्रियेत आपण स्वतःच्या मर्यादा विसरतो.
तिसरं कारण म्हणजे नात्यांची भीती. नकार दिला, तर नातं बिघडेल का? समोरचा दूर जाईल का? हे प्रश्न मनात येतात. विशेषतः जवळच्या नात्यांमध्ये..मित्र, कुटुंब, जोडीदार.. इथे नाही म्हणणं अधिक अवघड होतं. कारण आपल्याला नातं टिकवायचं असतं. पण इथे एक गोष्ट आपण विसरतो… जिथे नाही म्हणण्याची मोकळीक नाही, ते नातं किती खरं आहे?
याशिवाय आपल्याला नकार देण्याची सवयच नसते. नाही कसं म्हणायचं, हे आपल्याला कोणी शिकवत नाही. त्यामुळे नकार देणं म्हणजे उद्धटपणा किंवा असभ्यता, असा गैरसमज तयार होतो. प्रत्यक्षात नकार देणं ही एक कौशल्य आहे…..ते नम्रपणे, स्पष्टपणे आणि आदराने व्यक्त करता येतं.
पण नकार देणं कठीण वाटण्यामागे एक आतला, खोलवरचा मुद्दा आहे….स्वतःचं आत्ममूल्य. जर आपल्याला स्वतःच्या वेळेची, ऊर्जेची आणि भावनांची किंमत वाटत नसेल, तर आपण सहजपणे इतरांसाठी ते खर्च करतो. माझं काही नाही, आधी त्याचं काम करू ही सवय आपल्याला हळूहळू थकवते. आणि मग एक दिवस लक्षात येतं….आपण सगळ्यांसाठी जगलो, पण स्वतःसाठी काहीच उरलं नाही.
नकार देणं म्हणजे दुसऱ्याला नाकारणं नाही; ते स्वतःला स्वीकारणं आहे.
आपल्या मर्यादा ओळखणं आहे.
आपल्या वेळेला आणि ऊर्जेला महत्त्व देणं आहे.
होकार देणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच नकार देणंही महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक हो मागे एक नाही लपलेलं असतं… आपण दुसऱ्याला हो म्हणताना अनेकदा स्वतःला नाही म्हणत असतो.
मग यावर उपाय काय?
सर्वप्रथम, स्वतःला हे मान्य करावं लागेल की नाही म्हणणं चुकीचं नाही. प्रत्येक गोष्ट स्वीकारणं ही आपली जबाबदारी नाही. आपल्यालाही थकवा येतो, आपल्यालाही वेळ हवा असतो…हे स्वीकारणं गरजेचं आहे.
दुसरं म्हणजे नकार देण्याची पद्धत शिकणं.
उद्धटपणे नाही, तर नम्रपणे
“मला सध्या वेळ नाही,”
“हे मी करू शकणार नाही,”
“माफ करा, पण मला हे शक्य नाही”
अशा साध्या वाक्यांतूनही नकार देता येतो.
तिसरं म्हणजे अपराधीपणा सोडणं.
नकार दिल्यानंतर अनेकदा आपल्याला वाईट वाटतं. पण लक्षात ठेवा आपण कुणाचं नुकसान करत नाही, आपण फक्त स्वतःची काळजी घेत आहोत.
आणि शेवटी, सराव.
पहिल्यांदा नकार देणं कठीण वाटेल, पण हळूहळू ते सोपं होतं. आणि एकदा का आपण आपल्या मर्यादा स्पष्ट केल्या, की लोकही त्याचा आदर करायला शिकतात.
नकार देणं कठीण वाटतं, कारण आपण चांगलं दिसणं याला स्वतःसाठी योग्य असणं यापेक्षा जास्त महत्त्व देतो.
पण खऱ्या अर्थाने चांगुलपणा म्हणजे स्वतःलाही न्याय देणं.
कधीकधी एक छोटंसं नाही आपल्याला मोठ्या थकव्यापासून वाचवतं.
आणि मग मला वाटतं अशावेळी स्वतःशी प्रामाणिक राहण्याची सुरुवातही येथूनच होते.
तुम्हाला काय वाटतं ?