जामोद हे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले बुलढाणा जिल्ह्यातील एक छोटेसे गाव, मी तेथे विश्व हिंदू परिषदेच्या , वनवासी सेवा प्रकल्पाचे १९८४ ते १९८९ च्या दरम्यान , काम करीत होतो. गावोगावी छोटेखानी प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रे होती, त्यातले एक जामोद सेवा केंद्र. तेव्हा त्या परिसरात ,तेथून जवळपास पन्नास किलोमीटरपर्यंत , मी सोडून अन्य कोठेही एमबीबीएस डॉक्टर नव्हता . जामोदलाच वनवासी मुलांकरता एक निवासी आश्रमशाळा होती, तेथे माझा मुक्काम असायचा. त्या निरागस मुलांसोबत रहायचे, संस्कारवर्ग चालवायचे, शाळेच्या शेतीत राबायचे, भाजी भाकर करायची , कसे मंतरलेले दिवस होते ते . त्यासोबतच मला वेगवेगळ्या गावांना कार्यकर्त्यांना भेटायला सुद्धा जावे लागत होते.
एकदा अश्याच एका कार्यकर्त्याचे शेजारी , एका रुग्णाला हगवण आणि त्यानंतर डिहायड्रेशनचा त्रास झाला होता . त्यांनी केलेल्या प्राथमिक उपचारांनंतरही , त्याची प्रकृती खालवली होती, म्हणून मला उपचार करण्यासाठी त्याचे गावी घेऊन जाण्यासाठी तो आला होता. त्याचे सांगण्यावरून मी अंदाज घेतला आणि उपचारासाठी सर्व वैद्यकीय औषधी घेऊन , त्याच्याच मोटर सायकलने आम्ही त्या रुग्णाच्या घरी पोहचलो .त्याच्या तब्येतीचे प्राथमिक आकलन करून , मी त्याला सलाईन लावायचे ठरविले . आता सलाईनची पिशवी वर करून बांधायला मला एक दोरीसारखे काहीतरी पाहिजे होते, म्हणून मी त्याला सुतळची मागणी केली.
तोपर्यंत माझे लक्ष अन्य कोठेही नव्हते, पण त्याच खोलीत त्याची आंधळी आजी बसली होती .तीने अचानक टाहो फोडला आणि अरे,हा कोण भडवा डॉक्टर आणला, आल्या आल्या माया नातवासाठी सुतली मागतो आहे ? . मी नारळीच्या झाडावरून सरळ खाली पडावे, असा हादरलो. मी काय चूक केले, हे समजायचे आधी, नाही ओ आजे, तो डॉक्टर सलाईन लावतू म्हणते, म्हणून सुतळी मांगत हाय, तो कार्यकर्ता आजीला समजावत होता.
माझ्या तेथील उपचारानंतर मी जेव्हा वापस जायला निघालो, तेव्हा मी त्या कोपऱ्यातील आजीच्या पाया पडलो, तिने मला रुग्णसेवा करीत असता , करावयाच्या संवाद कौशल्यांचा धडा दिला होता. खेडोपाडी सुतळी ही फक्त तिरडी बांधण्यासाठी वापरतात , हे मला त्या कार्यकर्त्याने हळूच सांगितले होते. वैद्यक व्यवसाय करीत असताना संवाद साधतांना शब्दांची निवड किती जाणीव पूर्वक करायची असते, हे मी त्यादिवशी शिकलो. पुढे वैद्यकीय महाविद्यालयात स्वास्थ्य शिक्षणाचे धडे मी मुलांना शिकवले पण माझा पहिला धडा मला आजीने दिला होता.