तारांगण १
आपल्या प्रतेकाच्या आयुष्यात तारकांनी भरलेले अवकाश असते. त्या तारंगणात असंख्य तारका असतात. मात्र आपली प्रत्यक्ष भेट त्यातील काही मोजक्याच तारकांशी होते. आपल्याला वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ह्या तारका आपलाला भेटतात. फार पूर्वीपासून ओळख असली कि हे सहज, बेमालूम पण घडतं असा माझा अनुभव आहे. माझ्या आयुष्यातील या तारांगणातील तारकांची आठवण करत नव्या वर्षांचा शुभारंभ करावा असा विचार व्यायला व याच निमित्त “सुरपाखरू” व्हायला जस ठरलं होतं!
या सुरपाखरूची माहीती मला देणारा माझा भाऊ, तारांगणातील माझा पहिला तारा, Anup Karade – Director साब !
आम्ही एकाच अपार्टमेन्ट मधील रहायचो. मी पहिला मजला व अनूप चौथ्या मजल्यावर रहायचा. एका बिंडीग मधे राहत असल्याने आमची ओळख झाली. त्याला पुस्तके वाचायचा छंद. बहुतेक साहित्यिक वगैरे माहिती त्याच्याकडून झाली असावी. आमच्या बिल्डींग मधे सार्वजनिक गणेशोत्सव खूप धुमधडाक्यात साजरा व्हायचा. खेळ, गीत स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम छान व्हायचे. अनूप स्वतः इंग्रजीत कविता लिहायचा. त्याची एक कविता The Hitavada मधिल पुरवणीत झापून आली होती. त्याने ते छापून आलेलं दाखवल्यावर मला खूप आनंद झाला होता. शाळेच्या पुस्तकात कविता वाचताना खूप छान वाटायचं. अनूपने लिहीलेली कविता वाचून आपल्या सारखे सामान्य लोक कविता लिहू शकतात हे फार नवलाईच होतं मला.
“दुग्धा का बलिदान ” हे हिंदी पुस्तकातील नाटक आम्ही गणेशोत्सवासाठी बसवलं होतं. अनूप ने ते दिग्दर्शित केलं होतं. शाळा संपल्यानंतर संध्याकाळी ते रात्री उशीरापर्यंत या नाटकाची तालीम व्हायची. मंतरलेले दिवस होते ते. राखी, दसरा, दिवाळी, वाढदिवस बिल्डींग मधले सर्व एकत्र साजरे करायचो.
कॉलेज मधे असताना, विवेकानंद केंद्र नागपूर च्या अनेक शिबीरांत आमचा सहभाग असायचा. त्यावेळेस पथनाट्य आम्ही सादर करीत असू. त्याचा सराव करताना कोणाचं जर नीट जमत नसेल तर एक भारी आवाजात ओरडा ऐकू यायचा ” पेट से आवाज आनी चाहिए “. पथनाट्यात आपला आवाज माईक शिवाय दूर पर्यंत पोहचायला हवा त्यासाठी अनूपची सतत सूचना असायची. ” मेरा भारत महान ” हे राहूल हरदास ने लिहीलेलं पथनाट्य अनूप ने फार उत्तम बसवून घेतले होते. अनेक प्रयोग केलेत या पथनाट्याचे.
आमचा 5-6 जणांचा एक छान ग्रूप होता. तासंतास आम्ही गझल ऐकत बसायचो. मोबाईल तेव्हा नव्हता हे आमचं भाग्यच. संध्याकाळी खेळणे असायचे. गप्पाष्टक रंगायचे. आपल्याकडे मित्र मंडळ जमलं की निघताना, घराच्या दारात, मग लिफ्ट मधे, मग गाडी जवळ न थांबणाऱ्या गप्पा व्हायचा. समोरासमोर गप्पा! फालतु p j वर भयंकर हसणे असायचे. संक्रांतीच्या दोन दिवस आधी काचांचा चूरा व मांजा बनवून तयार करायचो. एकत्रीत सगळे बच्चा कंपनी गच्चीवर पतंग उडवायचो.
एकदा आम्ही होळीला थंडाई बनवली होती. आमच्या बिल्डींग मधे अंगणात एक मोठ आंब्याचं झाड आहे. त्याला एक मोठा गोल ओट्यावर कट्टा आहे. त्याला आम्ही बोधी वृक्ष म्हणतो. त्याच झाडाखाली बसून ती थंडाई एकजीव घटली होती. कित्ती भटकायचो होळी खेळत. ओळखू न येईस्तोवर रंगलेलो असायचो. आता मात्र फक्त गुलालने असते होळी.
आणि हो, त्यावेळेस पहाटे उठून कोराडी च्या मंदिरात जाण्याची मजाच असायची. सगळ्याच्या सोईचा दिवस ठरायचा. चार पाच गाड्या, अर्थात दुचाकी गाड्या. शेअर केलेला पेट्रोल खर्च. लवकरात लवकर पहाटे निघून पिकनिक सारखं जायचं. लांब गाडी पार्क करून, न संपणाऱ्या लआंब रांगेत उभ असायचो. तेव्हा तेवढा वेळ असायचा, तो एक वेध पण असायचा. जुनं साधं मंदिर. गर्भगृहात पोचायला बांबूचे बांधून तयार केलेले कठडे. मंदिराच्या आवारात गहु अंकुरित झालेले कलश व दिवे त्या पहाटेला अधिक प्रसन्न करायचे. नारळ फोडून वाटलेला प्रसाद. नकळत त्या सगळ्याच अनुभवाचा मनात खोलवर उमटलेले ठसा आता अनेक वर्षांनंतर अधिक जाणवतो.
शिक्षण संपल्यावर, आपापल्या संसारात आम्ही सगळेच गुंतलो. शहरांच्या अंतराने लांब झालो पण मनातून एकमेकांशी संवाद करतो हे वेगळ सांगायला नकोच. अनेक वर्षानंतर अचानक एक दिवस काशीद ला पुन्हा भेटलो. “तेरा मुझसे है पहले का नाता कोई ” style! या category मधल्या अनेक तारका आपल्या आयुष्यात आहेत ह्याचं मनास खूप समाधान आहे. लोहाचुबका सारखे, कॉलेज काळातील एकत्रित केलेल्या वेगवेगळ्या या भेटीतून, साथीतून एक अबाधीत असे स्नेहांकित स्नेहबंध आपल्या सगळ्यांच्याच मनात रुजले गेलेत.
अनूप, तुझ्या पूर्वीच्या लेखनामुळे मला पहिल्यांदाच ते पुस्तकांतील कवी सोडून इतर आपण सामान्य माणसं कविता लिहू शकतो हे कळलं असावं बहुदा. मी लिहायला सुरु केले तेव्हा तू कविता लिहिली होती ते आठवल व कायम तो क्षण तसाच आठवत रहातो. तू लेखन पुन्हा सुरु कर. नव्या कोनातून विचार व शब्द वाचणं तुला छान येतं. You are gifted! नवीन वर्षांत जुनच नव्याने लिही. मी वाट बघतेय. शक्य तेव्हा भेटत राहूच. नवे वर्ष नव्या उर्जेवर जरी चालत असलं तरी त्याला दिशा आपलं तारांगण देत असतं!
आपल्या एकमेकांशी गाठीभेटी ठरल्या असतात. त्यांचा कालावधी पण ठरलेला असतो. अचानक पणे भेटणं, मधेच लुप्त होण हे तारांगणातील खोखो सारखं खेळत आपण जगत असतो. आपल्यात एकदा निर्माणझालेले घट्ट धागे तुटणारे, झिजणारे नसतातच. “मिलना – बिछडना” सारं ठरल्या प्रमाणे सारं घडत असतं हे मात्र नक्कीच!
२०२१ मधे मी एक कविता लिहीली होती, ती आज पुन्हा आठवली.
प्रकाश सावरतो सारे!
हाती आहे त्याचे, जमा मांडतो सारे,
ताऱ्यां परी भासते, प्रकाश सावरतो सारे.
शहर रोज रात्री, निजते पांघरून तारे,
प्रकाश झोत मोजत, लोचनी स्वप्न तारे.
दुःख आज उदास दिसले, पाहून सारे,
दुःख व्यक्त कराया जीवा उसंत कुठे रे,
सभोवतीचे पाहता अघटित सारे.
दिवस उगवण्या पुर्वी, दुःख आवरतो सारे,
उमेद डोळ्यात, हास्य ओठी ठेवून,
उमेद राखून मनात वावरतो सारे.
हाती आहे त्याचे, जमा मांडतो सारे,
ताऱ्यां परी भासते, प्रकाश सावरतो सारे.
We are scattered carrying same light within us! बस आज इतकंच.
अपर्णा चांदोरकर, नागपूर
१.१.२०२६
#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२६