हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे महाराष्ट्रचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे कवितेत वर्णन करताना रामदास स्वामी यांनी त्याच्यातील दृढनिश्चयाचे वर्णन करताना तें लिहितात,
निश्चयाचा महामेरू ।
बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू ।
श्रीमंत योगी l
आज “दृढनिश्चय!” या गुणदर्शक शब्दावर लिहीतो आहे.
एखादी गोष्ट करण्यासाठी विचार करणे म्हणजे निश्चय असे सर्वसाधारण समजले जाते… तो दृढ करणे म्हणजे कितीदाही अपयश आले तर मी माझा हा हट्ट हा सोडणार नाही. अशी वृत्ती.
विक्रमादित्याने हट्ट सोडला नाही त्याने वेताळाला पाठीवर घेऊन पुन्हा मार्गक्रमण सुरु केले या वाक्याने सुरु होणाऱ्या चांदोबातील विक्रम वेताळच्या गोष्टीतील राजा विक्रमादित्याच्या हट्टासारखा!!
नववर्षदीनी काहीजण मनाशी निश्चय करतात..नविन काहितरी करण्याचे. पण किती जण असे आहेत? हाही एक प्रश्न आहे.. हल्ली, “मज्जा करा एन्जॉय युअर लाईफ.. जस्ट चिल!” अशी वृत्ती असली की ध्येय बाजूला राहतात.
तुम्हांला कर्तृत्व गाजवायचे असेल निश्चय मनाशी पक्का करणे गरजेचं आहे. वेळोवेळी त्याची मनाशी आठवण करून देणे आणि कधीही न विसरण्यां इतका तो दृढ झाला तर ध्येय अगदी सहज प्राप्त होते.
“स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!”
या टिळकांच्या दृढनिश्चयातील शेवटचा, ‘च” बरेच काही सांगून जातो, आणि जेव्हा हे टिळकांचे स्वप्न जनतेचेंही सामुदायिक स्वप्न झाले तेव्हा तो सोनेरी दिवस १५ ऑगस्ट १९४७ ला उगवला.
एक कॉलेजातील गोष्ट आठवते,..
१९७९ चें साल होते तें. राजेश खूप हुशार नसला तरी अभ्यासू होता… दहावीला ऐन परीक्षेत कविळीने आजारी पडला होता तो . अंगात ताप असताना परीक्षा दिली आणि फर्स्ट क्लास मिळाला होता त्याला. अकरावी सायन्सला कॉलेजला प्रवेश घेतला..
त्यावेळी मेडिकलला जाण्याची इच्छा इतर मुलांसारखी राजेशची पण होती.
कॉलेजने हुशार विदयार्थ्यासाठी विशेष वर्ग कॉलेजला सुरु केला होता त्यात प्रवेश मिळण्यासाठी पंच्यात्तर टक्के दहावीस आवश्यक होते. राजेश त्यामुळे अपात्र होता तरी त्याने प्राचार्य जोशीना भेटून दहावीच्या परीक्षेच्या वेळी आजारी पडल्याने तो कसा कठीण परिस्थितीत होता हे सांगून विशेष वर्गात दाखल करून घ्या ही विनंतीही त्याने केली.. पण उपयोग झाला नाही.
“अरे, दहावीत तुला जेमतेम फर्स्ट क्लास मिळाला आहे, तुला मेडिकल प्रवेश कठीण आहे.”
असे जोशीसरांनी सांगून विशेष वर्गाला प्रवेश तर दिला नाही पण नकळत त्याचा इगो मात्र दुखावला होता.
राजेश हट्टाला पेटला. तो दिवस रात्र अभ्यास करत होता.. बारावीचे पेपरही छान गेले होते.
निकालाचा दिवस उजाडला तर राजेश कॉलेजला तिसरा आला होता. बीजे मेडिकलच्या प्रवेशाच्या यादीत तो विसावा होता.एम बी बी एसला प्रवेश मिळाल्याचे पत्र येताच, राजेश पेढे घेऊन जोशी सरांना द्यायला निघाला होता.
जोशी सर केबिन मध्ये होते कदाचित सामान्य विद्यार्थी म्हणून तें त्याला विसरलेही असतील म्हणून राजेशने हसून,
“सर, मी राजेश पाटिल”
अशी स्वतःच परत त्यांना ओळख करून दिली.
” सर,मी कॉलेजला तिसरा आणि बी जे च्या गुणवत्ता यादीत विसावा आलो आहे. बरं झालं सर तुम्ही तेव्हा मला विशेष वर्गात प्रवेश दिला नाही. नाही तर कदाचित मी एवढ्या जिद्दीने अभ्यास करू शकलो नसतो. माझ्या या यशात तुमचा सिंहाचा वाटा आहे… तुमच्यासाठी खास पेढे घेऊन आलो आहे. मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. “
जोशीसरानी राजेशचे अभिनंदन केले खरे पण मनातून मात्र तें खजिल झाले होते. राजेश नकळत कसे वागू नये याचा धडा देऊन गेला होता.
असे या जमान्यातील एकलव्य बघितले की “दृढनिश्चय” म्हणजे काय ती कल्पना येते.
प्रयत्नात सातत्य राखणे हे यशासाठी आवश्यक असतें आणि दृढनिश्चय असला की तें सहज रहाते. आय टी असो वा कॅन्स्ट्रॅक्शन प्रोजेकट प्रोग्रॅमिन्गचें अर्थात नियोजनाचे फार महत्व असतें. लेखनालाही तसेच असते सुरवात.. कन्टेन्ट.. आणि एफ्फेक्टिव्ह शेवट. नेमका आशय वाचणाऱ्याला कळला पाहिजे. ती कला आत्मसात करण्यासाठी गायनातील रियाझाप्रमाणे सातत्य नक्की हवे.. सातत्याचे महत्वा जाणुन आयटीत अग्रणी असलेलेल्या एका कंपनीचे नावच “Persistent” दिले आहे आणि सातत्याने ती उत्कृष्ठ कामगिरी करते आहे.
असाच काहीसा निश्चय करून आपण तीस दिवस सातत्याने लिहितो आहे व पुढेही लिहीण्यात सातत्य ठेवणार आहोत.
” रियाझ गायनाचा रोज
करतो गायक जरी श्रेष्ठ
कला प्रसन्न त्यावऱी
साधनेत ठेवता सातत्य!!
निश्चय असता दृढ हो
कार्यसिद्धी सहज शक्य
नसता गुरु कधी तुम्हाला
व्हा तुम्ही हो एकलव्य!!
लिहू सातत्याने सर्व हो
तीस दिवसात लेख तीस
सुरपाखरूरूप विहरू
घेऊ लेखांचा आस्वाद!
सारस्वतांना वाचुनी हो
लिहिवयास शिकलो रे
आयुष्यभराचे विदयार्जन
जीवन पूर्णहीं पडते अपुरे.!
हेमंत नाईक
१७. ०१. २०२६