मुलाच्या घराजवळ असलेल्या ऑकलंड येथील डोळ्याचे पारण फेडणाऱ्या तमाकी नदीकाठी क्षितिजावर एकटा मावळणारा हळूहळू निस्तेज होत जाणारा सूर्य पाहतो आहे…आणि मी पण आज एकटाच नदीकाठी हिरवळीत असलेल्या बाकावर बसलो आहे थोड्या अंतरावर एक चायनीज बॅगपायपर या वाद्याने सुंदर धून वाजवत असताना माझे मन मात्र मागे भूतकाळात रेंगाळते आहे.जीवनाच्या वळणदार, उंच सखल वाटेवर खूप चालून आलो असलो तरी सर्व काही अगदी कालच घडल्यासारखं वाटतय सार!!
ते रम्य बालपण..
मामाच्या गावी झुकझुक गाडीतून जातांना येणारी मज्जा..
शाळेचा तो पाहिला दिवस..
शाळेतील निरोप समारंभ..
कॉलेजातील सच्ची मैत्री..
व्यवसाय नोकरीत यशस्वी
होण्याची धडपड..
आणि
मग आमच्या दोघांचा गृहस्थाश्रमात एकत्र प्रवेश..
वडील म्हणून मुलाना बिनधास्त उडण शिकवण..
त्यांची सातासमुद्रापार उंच भरारी पाहून मनातल्या मनात खुश होणारा मी ,आता आजोबा या गोड नव्या नात्यात केव्हा पोहोचलो, हेच कळले नाही.
आयुष्यात आता हे झालं की संपलं..असं प्रत्येक वेळी वाटत खरं..पण प्रत्येक वळणावर नविन क्षितिज समोर दिसते आणि त्यात गुंतण सुरूच असत. अगदी शेवटापर्यत!
निवृत्तीनंतर ऑफिसमध्ये गेलो तर तुमची जागा कुणी दुसऱ्याने घेतली असते धंदयातही नकळत तुम्ही रिप्लेस होत असतात. ‘Change is the life!” हे जाणूनहीअगदी सहस्त्रचंद्र दर्शन झालं तरी जीवनाचा मोह सहजासहजी सुटत नाही.
बहुतेक सर्वजण जीवनाला गृहीत धरत असतात इथं पुढच्या क्षणाची गॅरंटी नसते आणि अमरपट्टा घेऊन आल्यासारखे सर्व वागत असतो. भांडण करायला तर क्षुल्लक कारणही पुरते.
ऑफिसमध्ये गरज असते म्हणून विचित्र स्वभावाच्या खडूस बॉसशी जुळवून, “हा..हा..हि..ही..हू..हू..” करत खिदळणारे, घरी मात्र सख्ख्या नात्याशी, जन्मदात्यांशी जुळवून घेऊ शकत नाही. हे जीवनाच कटूसत्य अनेक वेळा दिसते. कदाचित जीवन किती छोटे आहे… याची जाणीव नसते त्यावेळी. ज्यावर त्यांना अभिमान वाटतो ते तारुण्य कधी न कधी ओसरणार याची जाणीव असली पाहिजे. उगवणारा सूर्य मध्यान्हाला काही काळच असतो मग मावळतीचा प्रवास नक्की सुरु होतो.
अगदी उच्च पदावर विराजमान असले तरी त्या पदाची त्याची साथ सदाकरिता नसते.. अगदी जीवनाचे तसच असत!! जीवन आणि मरण यात अगदी एका श्वासाच अंतर असताना माणूस बऱ्याच वेळा स्वार्थाने अंध होऊन वागत असतो.
कुणाला आपल्या संपत्तीचा तर कुणाला बुद्धीचा, आपल्या प्रसिद्धीचा, लोकप्रियतेचा, किंवा रूपाचाही गर्व असतो आणि त्यामुळे नकळत अहंकार बाळगून असतो पण शेवटी हे सर्व इथेच राहून जाते याची जाणीव फक्त्त शेवटास होते. जमिनीवर येतांना खाली मूठ बंद करून आलेला, आयुष्यभर कमवण्यासाठी धावधाव धावतो आणि जाताना ती मूठ देखील खुली ठेवून जावं लागणार आहे हे मर्त्य जीवनाच सत्य आहे. गेलेल्याच्या परिवाराच्या शोकास आवर घालण्यासाठी, आणि जीवनाची नश्वरता सांगण्यासाठी “राम नाम सत्य हैं..बाकी सब गत्य हैं l ” हा मंत्रही अंतिम यात्रेत म्हणतात.
अंत्ययात्रेत स्मशानात गेल्यावर सर्व इथंच सोडून जायचे आहे या भावनेने सर्वांनाच क्षणिक स्मशान वैराग्यही येते पण तेथून परत घरी आल्यावर लागलीच या जीवनाच्या मोहाच्या मायाजालात माणूस परत गुंततो… तो त्याच्या स्वतःच्या अखेरपर्यंत!!
आपल्या मर्त्य जीवनावर प्रकाश पाडणारी आणि अहंकार नको हे जीवनाचे सत्य सांगणाऱ्या या ओळी लिहिल्यात.
“तेजस्वी उगवता सूर्य..
निस्तेज होऊन मावळणार!!”
_तारुण्यावर नका करू गर्व_
_अंत नक्कीच त्याचा जाण_
_तेजस्वी उगवता तो सूर्य_
_निस्तेज होऊन मावळणार.. १_
_येथे एक तू प्रवासी_
_चार दिवसाचा पाहुणा.._
_जाण यांची ठेव नित्य_
_जीवन क्षणिक जगताना..२_
_ना जमीन..ना संपत्ती_
_ना साथीला जोडीदार_
_रिकामाच आला तू रे_
_अगदी तसाच तू जाणार.. ३_
_जाणुनी हे सर्व काही_
_अजाण का तू बनतोस_
_मर्त्य खरे हे जीवन_
_अमर का तू समजतोस?.. ४_
_मिळते ते नक्की जाते_
_त्रिवार हे सत्य आहे.._
_प्रिय ते ही दुरावेल_
_मन घट्ट करुनी जाण..५_
_मिटणाऱ्या जीवनाचा_
_का तुला उगा गर्व.._
_राजा जरी इथे कोणी_
_अश्रू तो ही ढाळणार..६_
_गुंतले इथे सर्वंसारे_
_चिंतेच्या दाट गुंत्यात.._
_जीवनी शेवटपर्यंत_
_गुंत्यातच राहणार..७_
_समजण्याची ही संधी_
_नाही ती परत येणार.._
_गैरसमजात झोपलेले_
_नक्की धोका खाणार..८_
_मृत्यू कधी ना येईल_
_हा विचार आहे खोटा.._
_कुणाचीहीं नाही मात्र_
_मृत्यू पासुनी सुटका..९_
_श्वास शेवटचा जाता_
_नाते प्रिय सर्वं तुटणार.._
_आप्त मित्र मुलं पत्नी_
_सारे दूर दूर जाणार..१०_
_पुत्र मित्र आप्त फक्त्त_
_स्मशानी साथ येणार.._
_एकट्याचा प्रवास मात्र_
_इथूनच नक्की सुरु होणार..११_
_चितेवर तुला झोपवून_
_उरी जड लाकडे रचणार.._
_पुन्हा न दिसण्यासाठी_
_आप्त तुला झाकणार..१२_
_नाव तुझे ते मागे गेले_
_विसरले तुझे आप्तमित्र .._
_किती सुंदर नाव तुझे ते_
_तुला डेड बॉडी म्हणणार..१३_
_अग्निडाग देऊनी त्वरेने_
_चिता उंच उंच भडकणार.._
_स्मृति सर्वं साऱ्या तुझ्या_
_बेचिराख होऊन जाणार..१४_
_ओमशांतीचा शांतिमंत्र_
_ओठी सर्वं पुटपुटणार.._
_लगबगिनेच सर्वं परत_
_दिनकार्या ते लागणार.१५._
_मुठ बांधून जगती आला_
_खुल्या हाताने तू जाणार.._
_भौतिक संचित तू रे केले_
_दुसऱ्यांसाठी ते राहणार ..१६_
_जे पुण्यकर्म केले तू रे_
_तेच साथीला येणार .._
_जन्मी या जरी ना मिळाले_
_फळ नक्की ते मिळणार .१७_.
_सुख दुःख आहे ते एक_
_सांगे गीतेत श्री भगवंत.._
_जशी करणी तशी भरणी_
_तसा तुला मिळेल लोक..१८_
_वाग जीवनी निर्मळतेने_
_दुखावू नको तू कुणास.._
_मोक्षप्राप्त नक्की तुलारे_
_स्वर्गलोकी तू स्थिरावणार..१९_
_तारुण्यावर नका करू गर्व_
_अंत नक्कीच त्याचा जाण_
_तेजस्वी उगवता तो सूर्य_
_निस्तेज होऊन मावळणार.. २०_
टीप : मूळ कल्पना अजीज नाझा यांची गायलेली जीवनसत्य सांगणारी अर्थपूर्ण कव्वाली “चढता सुरज धीर धीरे ढलताही जायेगा ” यावर आधारीत आहे..