Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

शापित गंधर्व!!

हेमंत नाईक जानेवारी 21, 2026
1768955267492.jpg
शापित गंधर्व!!!
२१ जानेवारी २०२६
…हेमंत नाईक
काही वर्षांपूर्वीची गोष्ट असेल मी मुलीला भेटण्यासाठी कात्रज येथील डेंटल कॉलेज ला जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनं वर रिक्षा थांबवली…
पांढरा शुभ्र कुर्ता पांढरा पायजमा,घारे डोळे पांढरीशुभ्र दाढी  आणि नियमितपणे पाच वेळा नमाज अदा केल्यावर कपाळावर ठळकपणे उठून दिसणारा काळसर गर्द ठिपका  आणि डोक्यावर नमाजाच्या वेळी घालतात तशी टोपी..वय साधारण पासष्ट ते सत्तर च्या आसपास..अशा रिक्षा चालकाने बाहेर मान काढली आणि शुद्ध मराठीत विचारले,”साहेब कुठं जाणार? ओलाच्या भानगडीत पडू नका, मी मिटर प्रमाणे नेईल ओलापेक्षा रिक्षा भाडे कमी लागेल.चलताय  न ?”
लागलीच माझी ब्रिफकेस ठेवून मी आत बसलो त्याने लागलीच रिक्षा सुरु केली आणि आम्ही मार्गस्थ झालो.
“काय साहेब कुठून आलात? तुमच्या बरोबर गप्पा मारल्यात तर चालेल ना? काय आहे बघा, मला सतत बोलायची सवय असल्याने गुपचूप बसवत नाही.”
मी मनात म्हणल,अर्धा पाऊण तास लागेल पोहचायला, तेवढाच टाइम पास आणि श्रोता होण्याची चांगलीच सवय असल्याने सांगितलं तुम्ही बोला बिनधास्त, ऐकतोय मी!!
“साहेब, मी मुसलमान माझ्या तोंडून शुद्ध पुणेरी मराठी ऐकून आश्चर्य वाटत असेल ना.. पण या पुण्याच्या पाण्याचीच जादू आहे, इथे मराठीवर प्रेम करणारी, मराठी नाटक, संगीत ऐकणारी आम्हीही मंडळी आहोत. मी  वसंतराव, भीमसेनजी, बाबूजी अशा अनेक नामवंत गायकांना साक्षात समोर बसून ऐकलंय. काय सूर लावायचेत मी त्या सुरात स्वतः च हरवून जात होतो..अजूनही ते प्रसंग डोळ्यापुढे आहे साहेब.”
“अरे व्वा! नशीबवान आहात तुम्ही.”
“साहेब तुम्हाला गाणं आवडत का?”
“गाता येई नाही..पण ऐकायला आवडत. तानसेन नसलो तरी कानसेन नक्की आहे.”
“मी गाणे म्हणल तर चालेल का?”
“चालेल काय.. पळेल सुद्धा!!”मी उगीचच पी. जे. मारला.
तो स्व.वसंतराव देशपांडे, कुमार गधर्व,भीमसेन जोशी या सर्वं शास्त्रीय गायकांचा चाहता होता.
“साहेब  स्व. वसंतरावांचे कट्यार दहा वेळा बालगंधर्वला प्रत्यक्ष बघितलं आहे “
वसंत रावांच्या कट्यार मधील अप्रतिम गीत, *लागी कलेजवा कटार* हे गीत अत्यंत सुरात गायला सुरुवात केली  गाड्याचे वाजणारे कर्कश्य हॉर्न त्यांच्या संगतीला असले तरी त्याच्या गाण्यात कोणताही व्यत्यय येत नव्हता.. अगदी एकदोन ठिकाणी स्टॉप वर थांबल्यावर सुध्दा तो विचलित होत नव्हता… बाजूने चालणाऱ्या पादचाऱ्याच्या कानावर ही तान पडल्यावर, ते ही आश्चर्यचकीत होऊन दाद देत होते.
मी ही त्याच्या गायकीवर खुश होतो नकळत गाणे संपल्यावर टाळ्या वाजवल्या गेल्या. “बहोत खूब..” असे माझे शब्द कानावर पडल्यावर त्याने मागे वळून पहिले हसत म्हणाला,
“साहेब ही दाद आम्हासाठी लाखमोलाची असतें.साहेब, पुण्यात नेते कुणी लक्ष देत नाही वाटेत खूप खड्डे असल्याने हळू चालवतो आहे…. साहेब, वाटेवरून वसंतरावांचे जीवनाचे मर्म सांगणारे गीत आठवले म्हणू का? “
मी इर्शाद म्हणालो. तो मुस्लीम असून असखलीत मराठीत बोलत होता आणि नकळत त्याच्या उर्दूचे शब्द माझ्या ओठी येत होते.
आणि त्यांने, “वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटते जसा फुलांफुलात चाललो ” हे गीत सुरु केले जणू तो त्याचीच जीवनकथा सांगतो असे मला वाटतं होते.
*”कला खूप ठिकाणी अधिवास करत असतें पण तिला योग्य सन्मान मिळेलच अस होत नाही… हेच खरे!”*
गाण्याची सुंदर कला अवगत असून ही सत्तरीला आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी उदरभरणासाठी रिक्षा चालवतो आहे. खरंच विदारक चित्र होते ते..
अजून दोन गीत आणि किस्से त्याने सांगितले आणि हो त्यातले एक गीत चक्क गीत रामायणातले होते.
” दैवजात दुःखें भरतां
दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा!!”
आणि हे गीत गातांना त्याच्या गीतात स्व.बाबूजी गायचे तसे स्वच्छ उच्चार आणि गायन कलेवरची भक्ती ओतप्रोत भरली होती.
*कलाकारांना कोणताही धर्म नसतो..कला चा हाच धर्म मानून ते साधना करत असतात.*
बघता बघता स्वारगेट, लक्ष्मीनारायण चित्रपटगृह आले, मला वेळा कसा गेला ते कळलंच नाही, तो म्हणाला, “साहेब तुम्ही पण दर्दी दिसताय आता शेवटचं गाणं म्हणतो भैरवी आहे.”
भैरवी, हा शब्द कानावर पडल्यावर मला धक्काचं बसला… एकंदरीत त्याने खूप गाण्याच्या मेहफिल ऐकल्या असाव्यात… *कुणीही गुरु नसलेला एकलव्य समोर बसून गात होतो..* व्यावसायिक गायक जरी तो झाला नव्हता तरी अशा चालू रिक्षातील संगीत मेहफिली असंख्य त्याने रंगावल्या होत्या.. आणि मग शेवटी त्याने “सजल नयन नीत धार बरसती ” ही पंडित अजित कडकडे यांनी आमच्या गल्लीतील लोकमान्य गणेशोत्सवात कार्यक्रमाची सांगता करताना गायलेली  भैरवी धीर गंभीर होऊन गायला सुरुवात केली. सोबत संगीताचा साज नव्हता तरी शुद्ध स्वरांची बरसात होत होती, साक्षात सरस्वती जिव्हेवर होती.शेवटची तान घेतली तेव्हा आम्ही भारतीय विद्यापीठच्या कमानीतून आत प्रवेश करत होतो.
हॉस्टेल वर पोहचताच त्याने ब्रेक दाबला. मी त्याचे रिक्षा भाडे दिले.
गाणे कसे वाटले साहेब?
छान गायलास तू.
मी नकळत पाकिटातून दोनशे रुपये दिले. तो पैसे घेत नव्हता, मी म्हणालो, “ही तुझ्या गायकीची बिदगी समजून घे… खूप उत्तम गायलास  तू.”
*”चीज होणे, म्हणजे काय असते.. हे त्याच्या गायन कलेला माहितीच नव्हते….तरी आनंद म्हणजे काय? आणि कसा मिळावायचा? हे ज्ञात असलेला तो आसामी नकळत सर्वांसाठी निरपेक्षतेने आनंद उधळत होता. “*
_”चीज ” सुंदर गाणारा जरी तो_
_चीज नाही झाले त्याच्या कलेचे.._
_आयुष्याची संध्याकाळ आली_
_उदरभरणा चक्र चाले रिक्षाचे.._
_कलोपासक अनामिक कैक_
_सरस्वतीचे  वरदान  लाभलेले.._
_लक्ष्मी तयावरी सदा रुसलेली_
_सख्य दोघींचे क्वचित दिसें ते!!.._
_असे का घडते? भाग्य का रुसते_
_कधी या प्रश्नावर उत्तर नसते.._
_आनंद उधळत होता तो दुःखातहीं_
_होते ते शापित गंधर्वाचें जिणे!!_
…हेमंत नाईक

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा :+1::rose::ok_hand::grinning_face_with_smiling_eyes: असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Tags: सुरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२६

Continue Reading

Previous: मेथड इन मॅडनेस
Next: शापित गंधर्व
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

WhatsApp-Image-2026-02-28-at-17.59.33.jpeg
  • ललित

“पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”

वर्षा पतके थोटे मार्च 2, 2026
Gemini_Generated_Image_hgaprihgaprihgap
  • ललित

धांदरटपणा की कामाचा ताण 

वंदना लोखंडे फेब्रुवारी 27, 2026
1000544594.jpg
  • ललित

पसारा

अपर्णा शेंबेकर फेब्रुवारी 25, 2026

ताजे लेख

  • “पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”
  • धांदरटपणा की कामाचा ताण 
  • पसारा
  • *प्रस्थान*
  • लाईक्सच्या युगात आत्ममूल्य कुठे हरवतंय?

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

WhatsApp-Image-2026-02-28-at-17.59.33.jpeg
  • ललित

“पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”

वर्षा पतके थोटे मार्च 2, 2026
Gemini_Generated_Image_hgaprihgaprihgap
  • ललित

धांदरटपणा की कामाचा ताण 

वंदना लोखंडे फेब्रुवारी 27, 2026
1000544594.jpg
  • ललित

पसारा

अपर्णा शेंबेकर फेब्रुवारी 25, 2026
54E7974C-2C73-4DFF-A984-DD6DA199BD13.jpeg
  • ललित

*प्रस्थान*

सुषमा ठाकूर फेब्रुवारी 24, 2026
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.