Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

आमचा व्हॅलेंटाईन डे

हेमंत नाईक फेब्रुवारी 16, 2026
“आमचा व्हॅलेंटाईन डे !!
✍️हेमंत नाईक
१६.०२.२०२६
सोमवार.
हल्ली नविन पिढीत लव्ह मॅरेज सर्रास होतात पण आमच्या पिढीत हे प्रमाण फारच कमी होते.. मुलीशी साधं  बोलणंही कठीण वाटायचं त्यावेळी. शनिवारी १४ फेब्रुवारी या व्हॅलेंटाईन अर्थात प्रेम दिवसाच्या शुभेच्छा त्यावर  खूप काही वाचण्यात आल्यात आपल्या मंचावर आलेली कथाही सुंदर होती आणि रविवारी योगायोगाने महाशिवरात्र ही आली .. शिवपार्वतीचा हा विवाहाचा दिवस! मग विचार आला आपणही याच विषयावर लिहावं..
” आमचा व्हॅलेंटाईन डे ..अर्थात आमच्या लग्नाची गोष्ट!!”
लग्नाची हो रम्य गोष्ट
प्रत्येकाची वेगवेगळी..
प्रेम मात्र तेच एक ते
जरी असे ती आगळी..
प्रेम विवाहात भाग्यवंत
स्वतःच भाग्य शोधले ..
इतरांना आप्त मित्र
देवाने मध्यस्थ धाडले..
दोन अनोळखी जीव ते
ओळखभेट ती होतसे..
एका भेटीतच ते कसे
सूर नकळत त्यांचे जुळे..
आप्त जमे या भेटीला
स्वागता असे कांदापोहे
आता मात्र भेटीसाठी
हॉटेलात फक्त्त दोघे असे ..
वागदत्त वधू ती देखणी
स्वर्गातली जणू अप्सरा.
जगी सुंदर नाही कुणी
त्यास हीच एक मेनका..
कविता त्याची ती असे,
प्रतिभेस पंख फुटे नवे ..
गृहलक्ष्मी ती सौभाग्याची,_
कुंकूमाची उमटली पाऊले ..
अबोल बावरलेली जरी
नविन घरात ती असे.._
_त्याच्या साथीने मात्र
_नव्या विश्वात सुख दिसें ..
_पात्र वेगवेगळे जरी
लग्नाच्या या गोष्टीतले..
प्रेम वाटता सुख मिळे
सार त्याचा एक असे..
चुकले कुणी एक जरी
दुसरा चूक सुधारण्या..
कमी कुठे तो एक पडे
दुसरा समर्थ तेथे उभा..
चाहूल तिसऱ्याची गोड ती
सुंदर कधी या जीवनी..
सार्थक जीवनास मिळे
आई वडील ते होऊनी..
प्रेमदिनी गोष्ट आठवली,
लिहिली शब्दात मी कथा..
इच्छिले सर्वं ईश्वराने दिले,
नशीबवान हो , नाही व्यथा..
आज मी नकळत ३६ वर्षे मागे गेलो आहे आणि तो विशेष दिवस मला परत आठवला.आमच्या लग्नाला ३६ वर्षे पूर्ण झाली  असली तरी आमच्यात ३६ चा आकडा हा कधीच नव्हता, प्रसंगी वाद झाले नाही असे नाही पण संवाद  नेहमी प्रेमळच राहिला .अबोला काही क्षणाचाही जीवघेणा असतो हे माहित असल्याने तो कधीच झाला नाही.भांडलो असू पण अबोला कधीच नव्हता..
प्रत्येकासाठी आपले लग्न अविस्मरणीय आणि सुखाचा वर्षाव करणारे असतें. मी पण त्यास अपवाद नाही,  अशीच एक लग्नाचीच गोष्ट घेऊन येत आहे. या गोष्टीतला नायक चक्क मी आणि सोबत सौंभाग्यवती नायिका आहे.
पत्नीला सौभाग्यवती म्हणतात आपण तिचे सौभाग्य असे ती समजत असले तरी तिच्या येण्याने संपूर्ण घराचे भाग्य उजळते म्हणूनच ती आपल्यासाठी गृहलक्ष्मी..भाग्यलक्ष्मी ठरते आणि असतें.
खरंतर मी माझ्या या गृहलक्ष्मी सौं. स्वातीला  तिच्या अगदी लहानपणापासून नव्हे तर तिच्या जन्माच्या दिवसापासून ओळखतो. याचे कारणही तसेच आहे आमच्या घरीच मोठी झालेली माझी आतेबहीण बेबीताई ही तिची मोठी काकू असं जवळच नातं आणि तिचं आजोळही भुसावळच. तिच्या जन्माच्या वेळा मी सहा वर्षाचा होतो मी ताई बरोबर लोखंडी पुलाजवळच्या डॉ. फाटक यांच्या दवाखान्यात ( आता कॉसमॉस बॅंक आहे तेथे.) अगदी स्वातीच्या जन्माच्या दिवशी भेटण्यास गेलो होतो आणि  तिच्या जन्माची बर्फी खाल्ल्याचे चांगलेच स्मरते.असा योग फारच दुर्मिळ!
आतेबहिणीची मुलं माझ्या वयाची, ते दिवाळीत उन्हाळ्यात भुसावळ येथे यायचीत मी पण त्यांच्या कडे जायचो तेव्हा स्वाती कधीकधी तिच्या काकांकडे सुटीत रहायला आली असायची. सहावी सातवीत असेल तेव्हा मी, स्वाती पहिलीत असताना तिला चांदोबाच्या गोष्टी सांगितलेल्या आठवतात.  पुढे हीच शुक्राची चांदणी माझे आयुष्य उजळून काढेल असे कधी वाटले नव्हते.
पुढे मोठे झाल्यावर कार्यप्रसंगी भेट व्हायची.पण ती सहा वर्ष लहान असल्याने बोलणं तस काहीच नसायचं. मी २२ व्या वर्षी बी. ई. होऊन लागलीच बिझिनेस सुरु केला तेव्हा ती दहावीत होती.
हळू हळू मी स्थिराऊ लागलो सुरवातीला जळगाव येथे बहिणीच्या रिंग रोड वरील बंगल्यात ऑफिस सुरु केले होते. काम नव्हती तरी रोज बॅग घेऊन जळगांव येथे रेल्वेने अप डाऊन करत असल्याने माझे काम सुरु असल्याचा समज भुसावळकरांना व्हायचा. मी पूर्णपणे रिकामा पण, रेल्वेने जाण्या येण्यात मात्र खूप बिझी असायचो.  एक वर्ष उमेदवारी केल्यावर कामाची लाईन लागली होती अगदी एक प्लॉट मोजून देणे, एखाद्याची टॅंक बांधून देणे अशा छोट्या कामातून सुरुवात झाली असली तरी वर्षाने हॉस्पिटल्स, शॉपिंग, कार्यालय असे मोठया प्रकल्पाचे प्लांनिंग आणि एक्सिक्यूशनचे काम करायला लागलो. थिएरी कॉलेजला शिकलो असलो तरी प्रॅक्टिकल डोळे उघडे ठेवून आपल्याच प्रकल्पावर करत होतो. चार पाच वर्षात चांगलाच स्थिरावलो..
या दरम्यान स्वातीने तिचा सिव्हील डिप्लोमा पूर्ण केला होता. एक दिवस स्वातीचे आईचे वडील भुसावळचे आजोबा आमच्या घरी वडिलांना आमच्या लग्नासाठी प्रस्ताव घेऊन भेटण्यास आले. घरी माझ्या लग्नासाठी चर्चा सुरु झाली. मी तिला आधी बघितले असल्याने आणि माझ्याच क्षेत्रातील असल्याने माझेकडून तसा होकारच होता पण स्वाती डिंप्लोमा फायनलला, जेमतेम विस वर्षाची होती, तिच्यासाठी मात्र लग्न करण्याचा हा ध्यानीमनी काही नसताना पडलेला एक मोठा बॉम्ब होता. चांगलं स्थळ निसटून जाऊ नये म्हणून स्वातीच्या घरच्यानी भेटीसाठी लागलीच आमच्या घरी येण्याचे निश्चित केले.बघण्याचा कार्यक्रम ठरला, माझ्यासाठी मात्र केवळ ती औपचारिकता होती.
तिकडे स्वाती मात्र एवढ्या लवकर लग्नाच्या भानगडीत पडायला तयार नव्हती. घरात तिची आदळ आपट सुरु झाली होती. स्वातीचे वडीलांनी तिला समजावले , “हल्ली निर्व्यसनी मुलगा मिळणे कठीण आहे, हेमंत हुशार आणि निर्व्यसनी आहे आणि अशी मुल मिळणे कठीण आहे आणि त्याचे घरचेही पुढारलेल्या विचारसरणीचे आहे तू जरा नीट विचार कर. केव्हा तरी तुला लग्न करायचेच आहे आणि आता नुसते भेटायचेच तर आहे, तो तुला होकार देईलच असेही नाही. “
” मला कोणी नकार देऊच शकत नाही बाबा.”
असा आत्मविश्वास तिने त्यावेळी वडिलांना बोलून दाखवला. पण मोठ्या मुश्किलीने आणि माझ्या सौभाग्याने या भेटण्याच्या कार्यक्रमांस येण्यास माझी होणारी सौभाग्यवती तयार झाली.
प्रत्येकाच्या मनात आपापल्या जोडीदाराचे चित्र मनात रेखाटलेले असते.पॉलिशचे बूट घालून नीट नेटका शर्ट इन केलेला, हुशार,निगर्वी, सुस्वभावी असं काहीसे चित्र स्वातीच्या मनातही होते आणि माझ्या नशिबाने मी त्या दिवशी घरी चक्क बूट घालून आणि शर्ट इन करून बसलो होतो. मित्रांत बोलका गप्पीष्ट असलो तरी शाळेत मुलं मुली बोलत नसल्याने त्या वेळी मुलीबरोबर मात्र मी काहीसा अबोल होतो.
तो दिवस उजाडला. स्वाती माझ्याच फिल्ड मधील असल्याने मला व्यवसायात मदत होणार होती आणि आधीच तिला बघितलं असल्याने माझा होकार तिला माझ्या नजरेतूनच कळला होता.
 “तुम्हाला काही बोलायचं असेल गच्चीवर बोलायला जा.”
अशी घरच्यांकडून आज्ञा झाली.
दोघे   गच्चीवर गेलो खरं, पण काय बोलावे तेच सुचत नव्हते,  “प्रथम तुज पाहता..”  अशी गीतात वर्णन केलेली अशी अवस्था यावेळी सर्वांचीच होते. मग तुझा फायनल सेमिस्टरला  इलेक्टिव सबजेक्ट कोणता? तू पुढे AMIE वा बी ई करणार का? अशा फक्त्त ऍकेडेमिक चर्चा झाल्याचे स्मरते. ती फक्त हो आणि नाही असे मोजक्याचं शब्दात पण हसून बोलत होती.ती हसून बोलत असल्याने मला दिलासा वाटतं होता. कॉलेज मध्ये मुलं “हसी तो फसी” ही प्रेमाची लिटमस टेस्ट मानत असल्याने बहुतेक मी तिला योग्य वाटत असावा असा कयास मी बांधत होतो. पाच मिनिटात बोलणे आटोपले.
खरं सांगू तर, तो दिवस आमच्या अबोल  पण नजरेने व्यक्त झालेल्या प्रीतिचा पहिला “प्रेमदिवस अर्थात व्हॅलेंटाईन डे” होता. यात गुलाबाची गरज नव्हती स्वातीच्या गालावर फुलले गुलाब मला खूप काही सांगून गेले होते.
हल्ली लग्नाच्या वाढदिवशी याच गच्चीवर जाऊन आता सुखद आठवणीच्या गप्पा मारतो आम्ही. आमच्या लग्नाचा व्हिडीओ पण आवर्जून पुन्हा पाहतो.
तुम्हाला निरोप सांगतो असे माझे वडील हसत हसत स्वातीच्या बाबांना म्हणाले, त्यांनी निरोप कळवा म्हणून निरोप घेतला आणि हा भेटीचा कार्यक्रम सात जन्मासाठी आमची गाठ बांधून गेला .
स्वाती व तिचे आई बाबा तिच्या भुसावळच्या आजोळी धावती भेट देऊन  लागलीच बसने जळगाव येथे परतणार होते.
“काय हेमंत, काय विचार आहे?”
 हा वडिलांचा  प्रश्न येताच मी हसलो,
” तुम्ही हो म्हणतं असाल  तर माझी काहीच हरकत नाही. “
मी उत्तरलो.
शुभस्य शीघ्रम म्हणून लागलीच दादांनी दिगूकाकांना होकाराचा संदेश कळवण्यासाठी स्वातीच्या आजोबांकडे पाठवले  . तो पर्यत स्वाती आणि सर्वं कंपनी जळगावच्या बस मध्ये निघाले होते चौधरी बुक स्टोअर्स जवळच्या चौकात सिग्नल जवळ बस थांबली होती आणि स्वातीचे बाबा खिडकी जवळ बसलेले दिगूकाकांना दिसले.अगदी भररस्त्यात त्यांनी आरोळी दिली,
 “बाळासाहेब, आमच्याकडून होकार आहे बर का!! “
आणि स्वातीच्या व वडिलांच्या  चेहऱ्यावरचा आनंद उघडपणे दिगूकाकांना दिसत होता. “आम्ही ही तयार आहोत दादासाहेबाना आमचाही होकार कळवा .” स्वातीचे बाबा बसच्या खिडकीतूनच उत्तरले . चौकातल्या या सिग्नलजवळ आमच्या लग्नाचा सिग्नल हिरवा झाला होता.
बस जळगावकडे मार्गस्थ झाली होती आणि जीवन सागरात माझी जीवननौका जोडीने वल्हवंण्यासाठी  जोडीदार स्वाती त्या दिवसापासून मनोमनी माझी झाली आणि मी तिचा झालो अर्थात सुकाणुवरचा कब्जा अजूनही तिचाच आहे, आणि हीच माझ्या सुखी यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे.”
लहानपणापासूनच ओळखत असल्यामुळे बऱयाच जणांना आमचं लव्ह मॅरेज वाटतं असलं तरी खरं सांगतोय ते अरेंज मॅरेजच आहे, त्या दिवशी देवानेच सात जन्मासाठी गाठ पक्की केली होती.अरेंज असो वा लव्ह मॅरेज, एकमेकांच्या सहवासाने आपोआप प्रेम वृद्धीगत होत असतें आणि मग आयुष्यात रोज  व्हॅलेनटाईन दिवस साजरा होतो.
अगदी रोज गुलाब  देत नसलो तरीआणि एखादे दिवशी न सांगता आठवणीने आणलेला जाईचा सुंगंधी गजरा ही तिच्यासाठी अनमोल दागिना असतो.
आमच्या जीवनातील स्मृतिगंध शब्दरूपात  उधळत आहे. या कथेतील बरीच पात्र काळाच्या पडद्याआड गेली असली तरी आठवणीचे पुष्प आमच्यासाठी मात्र निरंतर सुगंधी आणि अगदी ताजे आहे.
१४ फेब्रुवारी २६ ला जगात सुंदरतेमधे प्रथम मानांकीत पिहाबीच च्या जवळ ” मर्सर बे ” या डोंगरावरील चढउताराचा नयनरम्य ट्रेक करत आम्ही आमचा छत्तीसावा व्हलेनटाईन दिवस साजरा केला. एका बाजूला सुंदर डोंगरातील हिरवागार निसर्ग तर समोर भरून आलेल्या आकाशाखाली पसारलेल्या अथांग निळा टास्मान समुद्र साक्षीला होते. मागे वळून पहताना छत्तीस वर्षे कशी सरली तेच कळले नाही , सर्वकाही अगदी कालच घडल्यासारखे वाटत होते. सोबत फोटो शेअर करतोय.
😄😄😄
🙏🙏🙏
✍️ हेमंत नाईक
१६ फेब्रुवारी २०२४
सोमवार
#सुरपाखरू#अक्षरयात्री २०२६
Yahoo Mail: Search, organise, conquer

लेखक

  • हेमंत नाईक

    COEP१९८४ चा विद्यार्थी, पेशाने स्थापत्य इंजिनीअर असल्याने घराची सुंदर रचना करताकरता वयाची साठी गाठल्यावर नकळत शब्दांचीही रचना करू लागलो.मित्राच्या प्रोत्साहनाने अशाच एका लिहिण्याची कलेची पर्यटनांची संस्कृती जोपासणाऱ्या मंचावर लिहिण्यास सुरुवात केली.. प्रथम वावर हा :+1::rose::ok_hand::grinning_face_with_smiling_eyes: असा सांकेतिक चिन्हातच होता. मग एखादा शब्द मग आख्खी ओळ पुढे चारोळी मग एखादी कविता पोस्ट करता करता लेखा पर्यंत पोहचलो.या दोन वर्षात निवांत वेळ मिळाल्याने बरंच काही लिहीलं गेलं…

    माझा लेखन प्रवास:

    १. “उरल्या त्या आठवणी…” ही अकरा लेखांची लेखमाला मित्रांच्या मंचावर लिहिली. त्यात आमच्या गल्लीतील बंद पडलेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहीले होते. कधी काळी जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, द.मा. मिरसदार, प्रभाकर कारेकर व. पू काळे, अशा अनेक दिग्गज कलाकाराच्या उपस्थितीने त्यांच्या गायनाने, कथाकथनाने आणि मुख्य म्हणजे दिवसभराच्या सहवासाने मला झालेला आनंदानुभव लिहिला होता.

    २. "काहीही!"ही एकवीस ललीत लेखनाची लेखमाला.

    ३. “COEP चे सहजीवन” हा माझ्या अभियात्रिकी महाविदयालयीन आयुष्यच्या सोनेरी स्मृतिचा स्मृतिगंध… मित्रांना खूप आवडला.

    ४. मित्र मैत्रिणीवर तयाच्या वाढदिवशी केलेल्या, आणि इतर प्रासंगिक कविता आणि लेख.

    ५. न्यूझीलंड डायरी हे मित्रांच्या आग्रहाने मार्च २०२४ ते मे २०२५ दरम्यान मित्राच्या मंचावर लिहिलेले न्यूझीलंडचे प्रवासवर्णन सध्या मायबोलीवर पोस्ट करत आहे.

    ६. २०२६च्या नववर्ष दिनापासून मी एक “सुरपाखरू” होऊन त्यांच्या “३० दिवसात ३० प्रयोग २०२६” या थव्यामधे दाखल हौवून लिहिण्याचा आणि वाचनाचा आनंद लुटतो आहे

Continue Reading

Previous: मुक्तचिंतन: भाग १
Next: स्वागत २०२६ .
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

WhatsApp-Image-2026-02-28-at-17.59.33.jpeg
  • ललित

“पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”

वर्षा पतके थोटे मार्च 2, 2026
Gemini_Generated_Image_hgaprihgaprihgap
  • ललित

धांदरटपणा की कामाचा ताण 

वंदना लोखंडे फेब्रुवारी 27, 2026
1000544594.jpg
  • ललित

पसारा

अपर्णा शेंबेकर फेब्रुवारी 25, 2026

ताजे लेख

  • “पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”
  • धांदरटपणा की कामाचा ताण 
  • पसारा
  • *प्रस्थान*
  • लाईक्सच्या युगात आत्ममूल्य कुठे हरवतंय?

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

WhatsApp-Image-2026-02-28-at-17.59.33.jpeg
  • ललित

“पुस्तक वाचणारा माणूस कमी का होत चाललाय?”

वर्षा पतके थोटे मार्च 2, 2026
Gemini_Generated_Image_hgaprihgaprihgap
  • ललित

धांदरटपणा की कामाचा ताण 

वंदना लोखंडे फेब्रुवारी 27, 2026
1000544594.jpg
  • ललित

पसारा

अपर्णा शेंबेकर फेब्रुवारी 25, 2026
54E7974C-2C73-4DFF-A984-DD6DA199BD13.jpeg
  • ललित

*प्रस्थान*

सुषमा ठाकूर फेब्रुवारी 24, 2026
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.