ll लग्नगाठ ll
✍️ हेमंत नाईक
२३. ०२. २०२६
पुलंच व्यक्ती आणि वल्ली बऱ्याच वेळा वाचल असलं तरी समाधान होत नाही अधून मधून वाचत असतो आमचा भिका पुलंनी बघितला असता तर त्या पुस्तकात एक व्यक्तीरेखा त्यात नक्की ऍड झाली असती.
१९६० ६१ चा काळ घर मोठे एकत्र कुटुंब , माणसं ही दहा बारा येणारी नातेवाईक मंडळी ही भरपूर असा त्या वेळचा काळ असल्याने घरगडी एक आवश्यक अशी गोष्ट होती.
फैजपूर येथे वडिलांविना म्हाताऱ्या आई सोबत राहणारा साधारण २५ एक वर्षाचा भिका नामक युवक आमच्या नातेवाईकांच्या शिफारसीने घरी घरगडी म्हणून राहण्यास आला.त्यावेळी माझा जन्म देखील झाला नव्हता.
अगदी १९६० पासून तर २०१२ पर्यत भिका म्हणजे आम्हांला देवाने दिलेले वरदान होते.
भिका सांगकाम्या असला तरी अत्यंत प्रामाणिक होता. भिका पाणी दे पासून तर रात्री खालचा दरवाजा लावून ये पर्यतची घरातील सर्वांची सर्वं कामे कुरकुर न करता करायचा.नाही म्हणायला मधील दहा वर्ष त्याने फैजपूर ला जाऊन लग्न करून संसार केला असला तरी त्याचे उर्वरित आयुष्य आमच्या घरीच घरातील एक माणूस म्हणूनच गेले.
घरातील एक चमचा कमी दिसला तर त्याला तो सापडे पर्यंत त्याला चैन पडायची नाही आणि इतरांनाही तो पडू द्यायचा नाही. थोडा भोळा आणि वेंधळाही होता तो भाजी घेऊन यायचा पण हिशोब त्याला कधीच करता यायचा नाही दुकानदारही आमच्या घरचा माणूस म्हणून कागदावर लिहून दयायचे.
भिका आता या जगात नाही..पण पांढऱ्या पायजमावर पांढरा शर्ट, कॉलर मागे ठेवलेला पांढरा रुमाल, गळ्यात तुळशीमाळा कपाळावर अधून मधून गंध व बुक्का, मार्गशीर्ष महिन्यात भल्या पहाटे देवापुढे बसून काकड आरतीने सर्वांनाच उठवणारा .. माझ्यासकट, माझ्या मुलांनाही लहानपणी अंगाखाद्यावर खेळवणारा प्रेमळ भिका असे सुंदर त्याचे चित्र अजूनही डोळ्यापुढे समोर उभे आहे . शीळ वाजवून त्यावर भजन वा चित्रपट गीत म्हणायची कला अवगत होती त्यास गल्लीत काही जण कन्हय्या असेही म्हणायचे. चला हवा येवू दे मधील, प्रभाकर मोरे प्रत्येक स्किट मध्ये करीत असलेले “शालू झोका दे ग मैना” या गीतावरचा पाच पावली स्टाईल डान्स,भिकाला चांगलाच अवगत होता. आमच्या गल्लीतील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत पक्का ठरलेला असायचा.
_”बऱयाच वेळा रक्ताचं नातं नसल तरी एखादी व्यक्ती देखील त्याच्या सहवासाने, कार्याने, त्याने लावलेल्या जिव्हाळ्याने त्याच आपल्या आयुष्यातील महत्व अधोरेखित करते आणि कायमस्वरूपी आठवण ठेवून जाते. हे मात्र नक्की खरं आहे.”_
एकदा रात्रीच्या वेळी लाईट गेले होते वर असलेल्या अडगळीच्या खोलीतून काही समान आणायचे होते, भिका कंदील घेऊन जा आणि ते वर असलेले सामान घेऊन खाली ये. अशी आजोबानी आज्ञा दिल्यावर त्याने ते सामान त्वरित आणून दिले त्याच्या एका हातात बंद कंदील आणि दुसऱ्या हातात सामान असे त्याचे रुप पाहून आजोबा हसायला लागलेत.
अरे भिकूशेठ, (आजोबा कधी त्यास प्रेमाने भिकूशेठ म्हणायचेत.) कंदील पेटवला का नाही अंधाराचा? ..
तुम्हीच तर सांगितलं होत कंदील घेऊन जा आणि सामान आण म्हणून. बघा कंदील घेऊन गेलो की मी. माझी काही चूक नाही तुम्ही सांगितलं तस काम करतोय.”
असे त्याचे हुशारीचे अनेक भन्नाट किस्से आहेत.
घरातली सर्वं गोष्ट कुठे आहे ते त्याला माहिती होते , त्यामुळे त्याच्या नावाचा जप घरात रोज सर्वंजण करायचे.
घरात चोवीस तास असा अल्लाउद्दीनच्या दिव्यातील जींन मिळाल्याने आम्हीही थोडे आळशी बनलो होतो , पंचात्तर वर्षाचा भिका थकल्यावरही त्याच्या घरी जाण्यास तयार नव्हता, तुला कंटाळा आला की केव्हाही परत ये असे समजावून मोठ्या मुश्किलीने घरी जबरदस्तीने आम्ही परत पाठवले.. तेव्हा बरेच दिवस आम्हाला चुकल्या चुकल्या सारखे वाटायचे. तो नंतर ही अधून मधून भेटण्यास आवर्जून यायचा आला की सात आठ दिवस हक्काने राहायचा.
त्याच्या लग्नाचीही अशीच गमतीदार गोष्ट आहे. दीपनगर येथील त्याचे सासरे होते. माझे वडिलांना, “दादा मी मुलीला बघण्यास जातो आहे मला तुमचे घड्याळ द्या एक दिवस.” असे म्हणून ते घड्याळ हातावर बांधून भिका गेला होता.
तेथे सासरबुवानी विचारले, ” तुम्ही काय करताय? “..
“मी नाईक वकिलांकडे काम करतोय..”
“कोणते काम करतात? “
यावेळी मात्र त्याने नकळत कधी नव्हे ते हुशारीने उत्तर दिले होते.
” मी टायपिंगची काम करतो तिथे .”
सर्वं बोलणी पूर्ण झाली.
भिका घरी आला तर लग्न ठरल्याची बातमी घेऊनच.लग्नही लागलीच झाले.
एकदिवस त्याचे सासरे बुवा आमचे घरी आले.पाहता तर भिका ऑफिस झाडतांना दिसला. वडिलांनी, ” भिका सासरेबुवा साठी चहा फक्कड बनवून आण.” अशी सुचनाही दिली.
तेव्हा न राहून त्यांनी वडिलांना विचारले “काहो दादासाहेब, भिकाने तर आम्हाला टायपिंगचे काम करतो असं सांगितले… इथं चित्र वेगळंच दिसतय.
“भिका हा आमच्या कडे घरगडी म्हणून आहे. घरकाम करतोय.” असे दादांनी स्पष्ट सांगितले.
त्यावेळी भिकाला तू असं खोटं का बोलला याची विचारणा वडिलांनी केली .
भिका म्हणाला, ” अस कस म्हणता दादा, घरकामाबरोबर मी टायपिंगची काम करतो की नाही? रोज तुम्ही लिहिलेल्या नोटीसीची पान शेजारच्या गल्लीतील मुजूमदाराकडून टाईप करून आणतो की नाही.”
“भिका म्हणतो हे ही खरं आहे.” असं दादा उत्तरले.नकळत मोठा गैरसमज भिक्याच्या सासरेबुवांचा झाला होता.पण धनुष्यातून बांण निघून गेला होता लग्न झाले होते.
हिशोब करता न येणारा भिका ” नरो वा कुंजरो वा ” ही धर्मराजांची भाषा कसा शिकला याचे दादांना आश्चर्य वाटत होते.
वकीलाकडे टायपिस्ट समजून लेकीसाठी निवडलेला जावई प्रत्यक्षात घरगडी निघाल्याचा धक्का सासरेबुवाना बसला होता तरी सासरेबुवा “आलिया भोगासी असावे सादर” या भावनेने आपल्या मुलीचे नशिबात भिकाच होता असे समजून मनाशी समजूत घालत होते.
त्याची बायको सुमन व्यवहारी होती पुढे अंगणसेविका म्हणून कामास लागली त्या दोघांनी संसारही अगदी अखेर पावेतो जोडीने केला.
ही भिक्याच्या लग्नाची गोष्ट वडील गंमत म्हणून सांगायचे. पण भोळ्या भिकाकडे बघितल्यावर मला त्यांचेकडे एवढी चालाखी असेल असे वाटत नाही. त्याने दिलेले उत्तर हे खरे आणि प्रामाणिकच होते. त्यात भिकाचा कोणताही खोटेपणा वा चालुपणा नव्हता.
*साधा हिशोब न येणाऱ्या भिक्याच्या आयुष्याचा अचूक हिशोब मात्र देवानेच मांडला होता हे मात्र नक्की.*
दोन अधिक दोन
जोडता होतात चार..
देव हिशोब करताना
करतो वेगळा विचार..
जेथे काहीजर कमी
तेथे दुसऱ्याची साथ
संसाराचा गाडा चाले
खडतर जीवन वाट
घडणारे तेच ते घडते
तशी बुद्धी आम्हा होते..
चांगले वा वाईट कृत्य
नियतीच घडवून घेते..
विवाह धरेवर साजरा
गळ्यात लग्नाचा हार..
ईश्वर कर्ता करविता
स्वर्गात बांधे *लग्नगाठ!*..
🙏🙏🙏
✍️हेमंत नाईक
२३. ०२. २०२६
सुरपाखरू#अक्षरयात्री#२०२६