Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

पुत्री व्हावी ऐसी जिची कीर्ती दाही देशी…

वंदना लोखंडे मार्च 8, 2026 1 minute read
0
1001257687.jpg

दुसऱ्यांदाही मुलगी झाली हे ऐकून बऱ्याच जणांनी नाराजी व्यक्त केली होती. वंशाच्या दिव्याची अपेक्षा करणारे जीव हळहळले. 'मुलगीच तर झाली, तिला काय बघायला जायचे', अशाही प्रतिक्रिया ऐकायला मिळत होत्या. मी मात्र आनंदात होते कारण माझ्या कुशीत एक सजीव खेळत होता.
आठव्या महिन्यातच माझा रक्तदाब वाढला. पहिल्या मुलीच्या वेळी तेच झाले होते. दुसऱ्यांदाही तसेच. मी पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल झाले होते. आजूबाजूला दोघी जणींची तीच अवस्था होती. बघता बघता अचानक त्या दोघींची बाळं आठव्या महिन्यात पोटात असतानाच गेली. मला प्रचंड धक्का बसला. मी डॉक्टरांना विनवण्या करत होते, मुलगा असो की मुलगी, मला माझं बाळ जिवंत पाहिजे. नऊ महिन्याचा भार सहन करून रिकाम्या हाताने घरी परतणाऱ्या आईच्या मनाची काय अवस्था असेल याची कल्पनाच न केलेली बरी.
सुदैवाने डॉक्टरांच्या अचूक प्रयत्नाने म्हणा किंवा बाळाच्या नशिबाची दोरी बळकट होती म्हणून भगवंताच्या कृपेने माझ्या कुशीत एक चिमुकला जीव खेळत होता. तो दिवस गुरूनानक जयंतीचा होता.
२१०० ग्रॅम वजनाच्या या बाळाला दोन दिवस इनॅक्युबेटरमध्ये (काचेची पेटी) ठेवून डॉक्टरांनी माझ्या सुपूर्द केले. देखभालीसाठी नवऱ्यासोबत आई व मोठा भाऊ होता. दवाखान्याचा खर्च बराच झाला. परंतु ११ हजारात बाळ घरी घेऊन चाललो याचा आनंद छातीशी घट्ट धरलेल्या बाळाच्या वडिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. या बाळाचे नामकरण झाले. 'श्वेता' हे नाव बहाल केले. स्फटिकासारखी निर्मळ मनाची व जग उजळून टाकणारी श्वेता.
हळूहळू बाळ मोठं होऊ लागलं. 'पहिली बेटी धनाची पेटी' हा अनुभव होताच. पण 'दुसरी बेटी सुखाची पेटी' याचा प्रत्यय आला. ती पाच महिन्यांची असतानाच आम्ही नूतन वास्तूत प्रवेश केला.
अडीच -तीन वर्षांची असताना श्वेताला कर्वे रोडच्या 'अभिनव इंग्लिश मिडीयम स्कूल'मध्ये प्रवेश मिळाला. मोठ्या बहिणीच्या संगतीत वाढत असताना श्वेताला 'अभ्यास कर' हे सांगण्याची कधी गरज पडलीच नाही. लहानपणापासूनच स्वयं अध्ययनाची सवय लागली. शाळेच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त (CBSE, Self-study) ती इतर पुस्तकांचे वाचन करायची. त्यातून टिपण काढून स्वतःच प्रश्न तयार करायची.
के.जी. त असताना ताईबरोबर 'आदर्श संगीत विद्यालया'त जायची. विद्यालयाच्या पाटणकर काकू म्हणायच्या, 'मी इतक्या लहान मुलांना शिकवत नाही'. परंतु क्लास सुरू असताना तिला कॉटवर बसण्याची परवानगी होती. आकलनशक्ती उत्तम असल्यामुळे संगीताचे बाळकडू तिने तिथेच घेतले. मग पहिलीत असताना 'पं. राजन कुलकर्णी' यांच्या 'सारंग संगीत विद्यालया'त गायनाचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. एक वर्ष भरतनाट्यम् नृत्याचे व त्यानंतर दोन वर्ष कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतले. तिसऱ्या-चवथ्या इयत्तेत असताना जेव्हा तिने संवादिनी (पेटी) वर चित्रपट गीताची धून  वाजवली तेव्हा आम्ही अवाक् झालो. हे कधी, कसे शिकली ते आम्हाला व तिलाही कळले नाही. केवळ स्वरज्ञान पक्के असल्यामुळे हे साध्य झाले. आजतागायत गुरुकडून कोणतेही शिक्षण घेतले नाही. परंतु सहजगत्या तिची बोटे संवादिनीवर कुशलतेने फिरत असतात.
पहिलीत असताना सोसायटीच्या आवारात सर्व लहान मुले विटांचे स्टंप लावून क्रिकेट खेळत होती. श्वेताने बॅटिंग करण्यासाठी विटांजवळची बॅट उचलली आणि त्या धक्क्याने विटा बोटांवर आदळल्या. रक्ताची धार लागली. एका बोटाला चीर पडली तर दुसऱ्याचे नख निघाले. धावत पळत जवळच्या दवाखान्यात नेले. एका बोटाला टाके घातले. दुसऱ्या बोटाचे नख पुन्हा येणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले अन् आमची पाचावर धारण बसली. परंतु नेहमीच्या बालरोगतज्ज्ञाने दिलासा दिला. त्या काळात श्वेताने शाळेतल्या वह्या डाव्या हाताने लिहून  पूर्ण केल्या. तेव्हा तिच्या धीराचे व चिकाटीचे शिक्षिकांना भलतेच कौतुक वाटले.
चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत २९२/३०० गुण मिळवून राज्यस्तरीय प्राविण्य मिळवले. तेव्हा त्याकाळचे मंत्री 'अजितदादा पवार' यांच्याकडून सन्मान झाल्याचे आठवते. सहावीत असताना 'डॉ. होमी भाभा सायन्स' या परिक्षेतही उत्तीर्ण झाली. याशिवाय गणित, विज्ञान, हिंदी अशा विविध विषयांच्या ऑलिम्पियाड स्पर्धापरिक्षेतही ती भाग घ्यायची. सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेतही गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला.
संध्याकाळी शाळेच्या ग्राऊंडवर खेळायला थांबत असे. शालेय पातळीवरच्या Running race व रिले शर्यतीत तिचा सहभाग असे. तिने मिळवलेल्या अनेक पदके व ट्रॉफीज यांनी दिवाणखान्यातील कपाटं गच्च भरली होती. इयत्ता सहावी व सातवीत शाळेच्या स्नेहसंमेलनात संपूर्ण कार्यक्रमाला तिने संवादिनीवर साथसंगत केली. त्यानिमित्ताने तिच्या पेटी-वादनाला चालना मिळाली. शाळेच्या संगीत शिक्षिका प्रभा टिचरांकडून तिचे भरपूर कौतुक होत असे. शाळेत पेरेंट्स- टीचर मिटिंगला जात असू तेव्हा सर्व शिक्षिका भरभरून कौतुक करत. या कौतुकाने खरंच ऊर भरून येत असे.
सोसायटीच्या गणेशोत्सवात तिने सर्व लहान मुलांकडून, आम्हा महिलांकडून पेटीवर गाणी बसवून घेतली होती. तिथे तिच्यातले शिकवण्याचे कौशल्य दृष्टीस पडले.
२री- ३री त असतानाच तिने शाळेची Prefect होण्याचे ध्येय ठेवले. Prefect म्हणजे छात्रप्रमुख. विद्यार्थ्यांनी निवडलेला विद्यार्थी नेता. शाळेत शिस्त राखण्याची जबाबदारी असलेला वरिष्ठ विद्यार्थी.  उमेदवाराची निवड करण्याचा अधिकार शाळेचा. जो prefect ची जबाबदारी पार पाडून अभ्यासही व्यवस्थित करू शकेल असा हुशार विद्यार्थी हा उमेदवार निवडीचा प्रमुख निकष असे. मग रितसर निवडणूक लढवली जायची. यासाठी मतपत्रिका असायची. विद्यार्थी प्रचार करीत. वर्गा-वर्गात जाऊन भाषण करत. सगळे विद्यार्थी मतदान करून आपला नेता निवडत. मतदान मोजणी झाल्यावर अधिकृत घोषणा करून शपथविधी सोहळा पार पडे. जबरदस्त आत्मविश्वासाने इयत्ता सहावीत vice prefect होण्याचे ध्येय तिने पूर्ण केले. ६ वी नंतरच्या सुटीच्या काळात दोन्ही पायांच्या बोटांवर छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागली. परंतु prefect होण्याच्या ध्येयापासून ढळली नाही. या अडचणींवर मात करत पुन्हा prefect साठी निवडणूक लढवली. मागील वर्षीच्या उत्तम कामगिरीमुळे यश गवसले. Red House ची विद्यार्थिनी असल्यामुळे गळ्यात लाल स्कार्फ व छातीवर Red batch लावायचा मान मिळाला. ११-१२ वर्षाचे आपले मूल विद्यार्थी नेत्याची जबाबदारी घेते व उत्कृष्टपणे पार पाडते याचे पालक म्हणून निश्चितच आम्हाला कौतुक तर होतेच शिवाय अभिमान  वाटायचा.
इयत्ता आठवीपासून 'एम प्रकाश अकादमी'त आयआयटी प्रवेश प्रशिक्षणाला सुरुवात केली. ८ वीत इलिमेंटरी  व ९ वीत इंटरमिजिएट या चित्रकलेच्या परिक्षेतही तिने 'B grade' मिळवली. अभ्यासाइतकेच राहणीमानही नीटनेटके होते. ड्रेसला मॅचिंग ब्रेसलेट, कानात इअरिंग्ज, हेअरपीन आवर्जून वापरायची. क्लासला जाण्याची तयारी आदल्या रात्री करून ठेवत असे.
दहावीच्या परीक्षेत कुठलाही क्लास न लावता फक्त 'टीचर्स अकादमी टेस्ट सिरीज' च्या प्रश्नपत्रिका सोडवत होती. दहावीच्या परीक्षेत ९२.३% मिळवले. सोशल सायन्स या विषयात १०० पैकी ९९ गुण मिळवून  बोर्डात प्रथम येण्याचा मान मिळवला. पुणे महानगरपालिकेची 'मौलाना अबुल कलाम आझाद' ही ₹१५०००/- ची शिष्यवृत्ती मिळाली.
यशाची एकेक पायरी वर चढत असताना पाय मात्र जमिनीवर होते. गुरुजनांविषयी आदर, वडिलधाऱ्यांविषयी ममता व शेजार-पाजारच्यांशी असलेले स्नेह संबंध उल्लेखनीय होते.
दहावीत मिळालेल्या उच्च श्रेणीमुळे पुण्यातील नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश मिळाला. फार दिवसांपासून मुलींसाठी मी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले. १२वीत ८५.३३% गुण मिळाले. पुणे महानगरपालिकेची 'अण्णाभाऊ साठे' ही ₹२५०००/- शिष्यवृत्ती मिळाली. त्यातून तिने सिंथेसायझर घेतला. आपली वादनाची आवड पूर्ण करण्यासाठीचे वाद्य स्वतःच मिळवले.
बारावीची परीक्षा व सीईटी यामध्ये मिळालेल्या गुणांनुसार पुण्याच्या 'COEP कॉलेज'मध्ये प्रवेश मिळावा ही इच्छा होती. परंतु तिला स्थापत्य शाखेत प्रवेश न मिळाल्यामुळे पुण्याच्या प्रतिष्ठित 'एमआयटी कॉलेज'मध्ये प्रवेश घेतला. तिथल्या गुणवत्ता यादीत तिचा पहिला नंबर होता. विशेष म्हणजे गुणवत्तेनुसार सर्व शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश मिळत होता. कुठेही मॅनेजमेंट कोटा, डोनेशनचा अवलंब करावा लागला नाही. कॉलेजमध्ये असताना अभ्यासाव्यतिरिक्त  फिरोदिया करंडक स्पर्धेत भाग घ्यायचे ठरविले. तिथली शिस्त खूप कडक होती. वेळेत गेले नाही तर शिक्षा म्हणून ग्राउंडला फेऱ्या मारायला लावत, तर कधी बेडूक उड्या मारायला लावत. मला हा प्रकार चुकीचा, अपमानास्पद वाटायचा, परंतु विनातक्रार ती ही शिक्षाही पूर्ण करायची. या स्पर्धेतील संगीत संयोजनात तिचा सहभाग असायचा. त्यांच्या 'गुलाबी सीर' या एकांकिकेला पहिल्या नवात स्थान मिळाले होते. उत्कृष्ट संगीतासाठीचे पारितोषिक त्यांनाच मिळाले. कॉलेजच्या स्नेहसंमेलनात शास्त्रीय गायन स्पर्धेत तिला ₹७०००/- चे पारितोषिक मिळाल्याचे आठवते. या काळात गांधर्व महाविद्यालयाच्या गाण्याच्या व पेटीवादनाच्या परीक्षा ती देत होती आणि विशेष प्राविण्यही मिळवत होती.
शेवटच्या वर्षी Topper विद्यार्थ्यांना कॉलेजच्या विद्यार्थी कमिटीच्या निवडणुकीत उमेदवारी मिळे. विद्यार्थी-नेता होण्याची उर्मी स्वस्थ बसू देईना. Magazine Secretary पदासाठी निवडणूक लढवली व त्या पदाची माळ गळ्यात पडली. प्रत्येक इव्हेंटच्या आयोजनात महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असे. तेव्हा क्रिकेटपटू 'इरफान पठाण'ची मुलाखत घेण्याचा योग आला होता. हा सर्व व्याप सांभाळून अभ्यासात Topper च राहिली.
आता पदव्युत्तर शिक्षण घेण्याची आस लागली. भारतातल्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या आयआयटी संस्थेतून एम. टेक. करायचं ठरवलं. ते ही जुन्या सात संस्थांतूनच. कानपूरच्या आयआयटी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. शालेयजीवनात पर्यावरणाविषयी जाणीव झाली होती. त्यामुळे भरपूर कमाई करून देणारे Computer science किंवा IT यांसारख्या शाखा न निवडता तिने Environmental science and engineering ही शाखा निवडली. 'आई, IT किंवा CS सारख्या क्षेत्रात मिळणारा  पैसा मला मिळणार नाही' अशी स्पष्ट कल्पना तिने मला आधीच दिली होती. कानपूरमध्ये शिक्षण घेत असतानाच MPSC परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळाले. पूर्ण महाराष्ट्रात तिचा ५१ वा नंबर आला. मुलींमध्ये ५ वा नंबर होता. जळगावच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात  'क्लास टू ऑफिसर' म्हणून पोस्टिंग झालं. परंतु सरकारी खात्यात नोकरी न करता तिने M.Tech पूर्ण करण्याचे ठरवले.
इथे प्रवेश घेतल्या घेतल्या Orientation च्या कार्यक्रमात बहारदार गाणे सादर करून आपल्या व्यक्तिमत्त्वाची मोहोर उमटवली. वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांशी सहज मैत्री झाली. विविध राज्यांची संगीत संस्कृती तिने आपलीशी केली. प्रत्येक भाषेमध्ये गाणं गाण्याचा एक अनोखा छंद जपला. युट्युब चॅनेलवर ही गाणी प्रसारित करू लागली. भरपूर मित्र परिवार मिळाला. शिक्षकांमध्ये लोकप्रिय झाली. तिथल्या महाराष्ट्र मंडळात राहून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करायची.
तिथे असतानाच तिने पुढचं ध्येय निश्चित केलं. आय आय टी संस्थेतून Ph.D. करण्याचं. त्यासाठी दिल्ली व मुंबईच्या आयआयटी कॉलेजमध्ये प्रवेश परीक्षा दिल्या. पुन्हा तोच निकष, देशातल्या जुन्या सात आयआयटी संस्थांमध्ये प्रवेश मिळाला तरच पुढचं शिक्षण करायचं. पहिल्या प्रयत्नात तिला अपयश आलं. तेव्हा IIT Bombay मध्ये जेआरएफ (Junior research fellow) म्हणून ती रुजू झाली. नंतरच्या वर्षी पुन्हा प्रवेश परीक्षा दिली. यात तिची निवड झाली आणि पी.एचडी अभ्यासक्रमाला सुरूवात झाली. पहिल्या वर्षीच्या कोर्सेसमध्ये  9.67/10 असा तिचा CPI (स्कोर) होता. त्याच दरम्यान कोरोनाची लाट आली. सगळं जग आपापल्या घरात स्थानबद्ध झाले. त्यामुळे घरी राहूनच ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करत होती. कोरोना संपल्यावर पुन्हा ती महाविद्यालयातील होस्टेलमध्ये राहू लागली आणि तिच्या प्रगतीला पंख फुटले. तिच्या आजवरच्या गुणवत्तेवर देशभरातील निवडक विद्यार्थ्यांना मिळणारी Prime minister research fellowship तिला मिळाली. तिच्या डिपार्टमेंटची पहिली विद्यार्थी म्हणून HOD कडून वाहवा मिळवली.
अनेक कटु- आंबट प्रसंगांवर मात करून नेटाने लढत होती. एव्हाना तिच्या संशोधनाने चांगलाच वेग घेतला होता. भारतातील (आशिया खंड) डहाणू (महाराष्ट्र), चित्तुर (केरळ) येथे field work साठी जात असे. ती करत असलेले संशोधन सादर करण्यासाठी तिला रवांडा (ईस्ट आफ्रिका), टोरंटो (कॅनडा), कोपनहेगन (युरोप) अशा वेगवेगळ्या खंडात जाण्याचा योग आला. युरोप खंडातील डेन्मार्क येथे Guest researcher म्हणून दोन महिने कार्यरत होती.
तिचे गाईड प्रा. प्रदीप काळबार तिच्यावर खूप खुश होते व आहेत. भरभरून कौतुक करतात. आमच्यासाठी ही एक समाधानाची, अभिमानाची बाब आहे. एवढेच नाही तर वेगवेगळ्या देशातील मान्यवरही तिच्या कामाची प्रशंसा करतात. LinkedIn वर कनेक्टेड असतात. तिची भेट घ्यायला उत्सुक असतात तेव्हा ऊर भरून येतो. लेकीविषयी प्रेम दाटून येते.
०३ ऑक्टोबर २०२५ ला तिचा डिफेन्स झाला. आम्ही प्रत्यक्ष तिथे उपस्थित नसलो तरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आम्हाला ते बघता आले. ज्या पद्धतीने तिने आपले काम डिफेंड केले तेही कौतुकास्पद होते. तिथे आलेल्या रूर्कीच्या व सर्वच परीक्षकांनी तिचं भरभरून कौतुक केलं. 'एका पी. एचडीचं नाही तर दोन -तीन पी.एचडी होतील एवढं संशोधन केलं', असा शेरा त्यांनी दिला. तिचा Thesis म्हणजे नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी benchmark ठरला. आजपर्यंत तिने केलेल्या कष्टांचं सार्थक झाले. कुमारी श्वेता लोखंडे पुढे डॉक्टरेटची उपाधी लागली. डॉ. श्वेता लोखंडेची आई असल्याचा अभिमान आहे.
माझ्या माहेरच्या परिवारात  कॅनडास्थित अण्णाकाका म्हणजे  Honour of Canada या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित झालेले डॉ. जगन्नाथ वाणी. ज्यांनी कॅनडात राहून भारतातील लोकांसाठी खूप योगदान दिले. त्यांच्यानंतर तिसऱ्या पिढीत पहिल्यांदाच कोणीतरी डॉक्टरेट झाल्याचा आनंद जास्त होता.
त्याप्रसंगी स्व.अण्णाकाकांची आठवण झाली. 2016 मध्येच मला त्यांनी सांगितलं होतं, 'वंदना, तू तिच्या career ची अजिबात काळजी करू नको. आपल्याला पुढे काय करायचे याबद्दल तिचे कन्सेप्ट क्लिअर आहेत. ती नक्कीच यश संपादन करेल.' त्यांचे भाकीत खरे होत असल्याचा प्रत्यय येत आहे.
अण्णाकाकांच्या वाढदिवसाच्या दिवशी तिचा प्रबंध स्विकारल्याचे इ-मेल मिळाल्यावर तिने अण्णाकाकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, अशी भावना व्यक्त केली.
दि. २८ फेब्रुवारी २०२६ च्या '६४ व्या वसंतकालीन सत्र दीक्षांत समारोहा'त तिला आय आय टी बॉम्बे च्या डायरेक्टरांच्या हस्ते सर्वोच्च पदवी 'Doctor of Philosophy' (विद्या वाचस्पती) ही पदवी प्रदान करण्यात आली, तो क्षण आमच्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण होता.
'मुलगी नको, मुलगाच हवा' असे म्हणणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा क्षण होता. मुलगा ही पूर्ण करू शकणार नाही अशी आई-वडिलांच्या प्रती असलेली कर्तव्यं तिने पार केली. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी घरदार गहाण ठेवून, कर्ज काढून उच्च शिक्षणासाठी तजवीज करणारे पालक पाहण्यात आहेत. ते बघता आपल्या stipend मधून आपला शिक्षणाचा खर्च व स्वतःचा खर्च स्वतःच पेलणारी ही मुलगी नक्कीच वरचढ ठरली.
कानपूर येथे असताना आई-वडिलांना प्रयाग, काशी विश्वेश्वराचं दर्शन घडवणारी मुलगी माझ्यासाठी रामायणातील श्रावणबाळच ठरली. श्रावणबाळाने आई-वडिलांना कावडीत बसवून तिर्थयात्रा घडवली होती. तर माझी लेक वाराणसीच्या रस्त्यावर माझा हात आपल्या हातात धरून  गंगामाईच्या आरतीसाठी लगबगीने घेऊन जात होती. काय पाहिजे अजून! या यात्रेचं नियोजन, खर्च तिने स्वतः केला होता हे विशेष.
पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून करिअरच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या या लेकीने जून -२०१९ मध्ये माझ्या वयाचा सुवर्णमहोत्सव वैशिष्ट्यपूर्ण रितीने साजरा केला होता. आई-वडिलांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा करणारी मुले आपण पाहतो. गाठीशी पैसा जमवून ती आपल्या जीवनात स्थिर-स्थावर झालेली असतात. परंतु आपल्या पंचविशीच्या काळातच आपली तुटपुंजी पुंजी खर्च करून आई-वडिलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही उच्चतम भावना विस्मयकारक होती.  माझ्या गीतांना संगीतबद्ध करून 'गुंजारव' च्या कार्यक्रमात तिने ध्वनिमुद्रिका प्रकाशित केली होती. तिच्या संगीत परिस स्पर्शाने वंदना लोखंडेच्या गाण्यांचे सोने झाले. त्याप्रसंगी वाद्यवृंदासहित त्यातली गाणी सादर केली. ह्या संपूर्ण कार्यक्रमात तिने आपल्या आप्त-मित्रांना सहभागी करून घेतले होते हे विशेष.
सर्वांना अभिप्रेत असणाऱ्यांना परंपरागत कुलदीपकापेक्षा माझी ही 'कुलदीपिका' नक्कीच माझ्या इतकीच सर्वांना प्रेरणादायी आहे, हे निश्चित.
आता एकच इच्छा आहे, या तेजाळणाऱ्या हिरकणीला साजेसे कोंदण मिळावे जेणेकरून तिची कीर्ती उर्वरित खंडात दूर दूरपर्यंत अशीच पोहोचत राहील.

लेखक

  • वंदना लोखंडे

    मूळ गाव धुळे. इलेक्ट्रॉनिक्स विषयात पदवीधर. लिखाणाची आवड.

    प्रकाशित साहित्य :

    * आतापर्यंत ९ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
    * त्यापैकी 'किलबिल', 'प प पक्षी', 'ओवी कुठे चालली शॉपिंगला', 'ओवी कुठे चालली डे केअरला', हे बालकविता संग्रह
    * स्मृतिपाखरे हा ललितलेखसंग्रह
    * हिंदोळा यात लग्न, डोहाळजेवण व बारसे याप्रसंगाची स्त्री गीते
    * गीत संजीवन, मंजिरी हा भक्तिगीतसंग्रह व 'सप्तरंगी उखाणे' 'प प पक्षी' यातून अक्षरओळख व चारोळीतून छायाचित्रासहित पक्ष्यांचीओळख अशी अनोखी संकल्पना आहे.

    वंदनलिपी- या ब्लॉगवर ललितलेखन.

    काव्यसूर- या यु-ट्युब चॅनलवर लहान मुलांसाठी संगीतबद्ध गाणी चित्रफितीतून सादर केली जातात.

Post navigation

Previous: अर्धा तास
Next: महिला दिवस
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

gumohor-water
  • ललित

चांदणे शिंपीत जाशी

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 16, 2026 0
WhatsApp-Image-2026-04-13-at-20.11.49.jpeg
  • ललित

सगळ्याच गोष्टींची विपुलता

वर्षा पतके थोटे एप्रिल 13, 2026 0
IMG-20260412-WA0052.jpg
  • ललित

स्वर स्वामिनी आशा!!

हेमंत नाईक एप्रिल 13, 2026 0

ताजे लेख

  • चांदणे शिंपीत जाशी
  • सगळ्याच गोष्टींची विपुलता
  • स्वर स्वामिनी आशा!!
  • नकार देणं इतकं कठीण का वाटतं?
  • “विसरणं एक दैवी वरदान!!!”

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

gumohor-water
  • ललित

चांदणे शिंपीत जाशी

ऐश्वर्या डगांवकर एप्रिल 16, 2026 0
WhatsApp-Image-2026-04-13-at-20.11.49.jpeg
  • ललित

सगळ्याच गोष्टींची विपुलता

वर्षा पतके थोटे एप्रिल 13, 2026 0
IMG-20260412-WA0052.jpg
  • ललित

स्वर स्वामिनी आशा!!

हेमंत नाईक एप्रिल 13, 2026 0
WhatsApp-Image-2026-04-07-at-06.43.24.jpeg
  • ललित

नकार देणं इतकं कठीण का वाटतं?

वर्षा पतके थोटे एप्रिल 7, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.