Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

Pune Ladies Birders: स्त्री शक्तीचे प्रतीक

वंदना लोखंडे मार्च 15, 2026 1 minute read
0
1001269485.jpg

काही वर्षांपूर्वी फेसबुकवर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. ओळखीचे कॉमन फ्रेंड्स दिसल्यामुळे स्वीकारली. रोजच तिच्या वॉलवर मला रंगीबेरंगी पक्ष्यांच्या छब्या दिसू लागल्या. पक्षी तर माझ्या आवडीचे. पक्षीवेडी असल्यामुळे तिच्या फोटोंच्या प्रेमात पडले. तिच्या फोटोंचे जतन करू लागले. तिच्या फोटोंइतकीच तिच्यावर प्रीत जडली. तिचे नावही प्रीत करण्यास साजेसे. 'प्रीती सोनजे'. 
तेव्हा माझ्या 'प प पक्षी' या पुस्तकाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू होती. पुस्तकात चारोळींबरोबर मुलीने व मी काढलेल्या पक्ष्यांच्या फोटोंचा समावेश होता. परंतु बरेचसे फोटो उपलब्ध नव्हते. त्यावेळी मला 'प्रीती' आठवली. मी तिच्याशी फोनवर संपर्क साधला अन् तिच्याशी असलेला माझा नातेसंबंध लक्षात आला. खरं तर आम्ही पहिल्यांदाच बोलत होतो परंतु मोकळेपणाने संवाद झाला. 'माझ्या पुस्तकासाठी फोटो देशील का?', अशी विचारणा करताच तिने त्वरित होकार दर्शवला आणि तात्काळ सहकार्य केले. या दरम्यान एकदाच तिच्या भेटीचा योग आला. तिचे उत्साही, बोलके, मनमिळावू व्यक्तिमत्व मनाला चटकन भावले. 
२-३ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर '२३ जानेवारी २०१९' ला किरण पुरंदरेंच्या हस्ते 'प प पक्षी' प्रकाशित झाले. यांत प्रीतीचे योगदान माझ्यासाठी फार महत्त्वपूर्ण होते.
साधारण दीड-दोन महिन्याचा काळ गेला असेल. एक दिवस तिने फोनवर सांगितले, “वंदनाताई, मी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार करत आहे त्यात तुम्हाला दाखल करते. तो ग्रुप होता 'Pune Ladies Birders'. या ग्रुपमध्ये 10 वर्षापासून ते 75 वर्ष वयाच्या महिलांचा समावेश आहे.
एकमेकींच्या साथीने पक्षी निरीक्षणासाठी महिलांना जाता येईल ही तिची ग्रुप स्थापन करण्यामागची कल्पना. आपल्या हेतूविषयी ती बरीच गंभीर आहे हे थोड्या दिवसातच लक्षात आले. तिच्यासारख्याच तिच्या सख्याही उत्साही. उच्चशिक्षित, करिअरिस्ट त्यामुळे इंग्रजी भाषेत सहज वार्तालाप करणाऱ्या. मी मात्र मराठी भाषा प्रेमी. साहजिकच संवाद साधण्यात मागेच राहायची.
थोड्याच दिवसात प्रीतीने सख्यांच्या मदतीने ग्रुपचा लोगो तयार केला. संस्थेचे रितसर रजिस्ट्रेशनही झाले. 
याच दरम्यान मी सहा महिन्यांसाठी अमेरिकेत गेले. ग्रुपवर शेअर होणाऱ्या पक्ष्यांच्या छवी बघून अवाक् होत होते. एक दिवस अचानक पक्ष्यांच्या फोटोंच्या प्रदर्शनाची बातमी झळकली. महिला दिनानिमित्त प्रदर्शन आयोजित करण्याचे ठरवले. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध कॅमेरा कंपन्यांचे पाठबळही मिळाले. घोले रोडच्या 'जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवना'तील 'राजा रविवर्मा आर्ट गॅलरी'त हे प्रदर्शन भरवायचे ठरले. एकंदरीत त्यांची तयारी बघता मी विस्मित होत होते. 
अमेरिकेतून भारतात परत आले अन् थोड्याच दिवसात महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या 'इलाक्षी 2020' प्रदर्शनाला जाण्याचा योग आला. प्रदर्शनाच्या उद्घाटक म्हणून प्रसिद्ध wildlife photographer 'जैनी मारिया' आलेल्या. खूप नियोजनबद्ध पद्धतीने हा भव्य-दिव्य सोहळा पार पडला. पक्ष्यांच्या छवी बघून त्यामागच्या कॅमेऱ्यांचा उच्चस्तर लक्षात येत होता, त्याच बरोबर स्त्री फोटोग्राफरची कलात्मक दृष्टी नजरेत भरत होती. प्रत्येक फोटोखाली दिलेले कॅप्शन फारच बोलके व समर्पक होते. आभासी दुनियेतील लोकांना पहिल्यांदा प्रत्यक्षात भेटत होते. 'वैजूताई, जयाताई, मेधाताई' यांच्याशी आवर्जून ओळख करून घेतली. ग्रुपचा backbone वैजूताईचे प्रसन्न व्यक्तिमत्व फार लोभस वाटले. अन् सर्वांच्या लाडक्या प्रीतीची कार्यक्रमातील भिरभिर अगदी फुलपाखरासारखी मोहक भासत होती. या फुलावरून त्या फुलावर. या तीन दिवसात अनेक माहितीपूर्ण कार्यक्रम तिथे पार पडले. एक समृद्ध अनुभव गाठीशी घेऊन मी बाहेर पडले.
प्रदर्शनानंतर ग्रुप जास्तच क्रियाशील झाला. मिळून साऱ्याजणी पक्षी निरीक्षणासाठी जाऊ लागल्या. पक्षी निरीक्षणाचा आनंद स्वतः पुरता सीमित न ठेवता इतरांनाही द्यावा ही निर्मळ भावना उल्लेखनीय आहे. 
मी ३४ वर्षांपासून पुण्यात असूनही ARAI टेकडी, तिथलं पक्षी वैभव पाहिले ते या ग्रुप सोबत. Global Backyard Bird Count च्या निमित्ताने ३७ वर्षांनंतर महात्मा टेकडी पहिल्यांदाच पाहिली. जवळच्या युनिव्हर्सिटीतील न पाहिलेले बोटॅनिकल गार्डनही बघितले व कधी न पाहिलेले पक्षी तिथे बघायला मिळाले.
सिंहगड व्हॅली तर सगळ्यांचे आवडते ठिकाण. आश्चर्य म्हणजे दुचाकीवर भल्या पहाटे सिंहगड व्हॅली, कवडीपाट, बोपदेव घाटातून सासवड पर्यंत ह्या महिला जातात हे बघून विस्मित व्हायला होते.
ह्या पक्षी-निरीक्षक महिला पुण्याच्या सीमा ओलांडून ताम्हिणी, पनवेल, दांडेली, कर्नाळा- अभयारण्य येथे वारंवार जातात. 
पक्ष्यांच्या सहवासात राहून त्यांचा गुण घेतला नाही तर नवलच. ह्यांच्या पंखातली अगम्य ताकद त्यांना भरारी घ्यायला भाग पाडते असे म्हणणे वावगे होणार नाही. ह्या महिला देशभरातील कानाकोपऱ्यात पक्षी निरीक्षणासाठी व फोटोग्राफीसाठी जातात हे बघून अभिमानाने मान ताठ होते. अरुणाचल प्रदेशातील मिश्मी हिल्स, पश्चिम बंगालचे लॅटपंचर, ओरिसाचे मंगलाजोडी, उत्तराखंडचे सातताल, चोपटा, गुजरातचे ग्रेटर रण ऑफ कच्छ, राजस्थानचे Dessert National park, अंदमान अशी कितीतरी ठिकाणं त्यांनी पादाक्रांत केली आहेत, जी आपल्या सर्वसामान्य माणसाला अनभिज्ञ आहेत. 
यांचं पक्षीप्रेम तर बघा, आपल्या देशातल्या पक्ष्यांची माहिती घेतल्यानंतर यांची तहान विस्तृत झाली.  त्यांना जगभरातल्या पक्ष्यांचे दर्शन घेण्याची ओढ लागली. अश्विनी, श्वेता, अक्षता या आपल्या नवऱ्यासोबत अमेरिका, जर्मनी, नॉर्वे इथे स्थलांतरित झाल्या. तिथेही त्यांनी आपले पक्षीप्रेम कायम ठेवले. वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करून छान छान फोटो काढतात व आम्हाला भारतात बसून ते पक्षी बघण्याचा अलभ्य लाभ होतो. 
मी सुद्धा अमेरिकेत लेकीकडे सहा महिन्यांसाठी गेले तेव्हा तिथल्या पक्ष्यांची भेट घ्यायला विसरले नाही. भावाकडे कॅनडात जाण्याचा योग आला, तिथेही मी पक्षी बघण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात होते.
काही जणी खास पक्षी निरीक्षणासाठी कोस्टा रिका, श्रीलंका, मलेशिया, Papua New Guinea, आइसलँड, अंटार्क्टिका, मादागास्कर, केनिया अशा विविध ठिकाणी, जगाच्या कानाकोपऱ्यात भ्रमंती करत आहेत.
बरं या सहली नेहमीच्या सहलींसारख्या रंजक व आरामदायी नसतात. प्रचंड दगदग, धावपळ व गरजेच्या सोयी-सुविधांचाही अभाव असतो. ३-४ किलो वजनाचे कॅमेरे, ट्रायपॉड खांद्यावर घेऊन, जंगलच्या वाटा तुडवत जाणाऱ्या या महिला मला वीरांगना भासतात. मनासारखी पक्ष्यांची छबी मिळवण्यासाठी प्रसंगी स्वतःला जमिनीवर झोकून देतात. तासनतास मौन पाळून पक्ष्यांची वाट बघणे हे महिलांसाठी केवढे संयमाचे काम आहे, नाही का! 
आपला छंद जोपासत असताना आपल्या गृहिणीच्या भूमिकेत अजिबात तडजोड करत नाही. ती भूमिकाही तेवढ्याच कर्तव्यदक्षतेने पार पाडताना दिसतात. बऱ्याचशा महिला आपल्या कमाईतूनच या छंदासाठीचा पैसा उभा करताना दिसतात, हे बघून खरोखर कौतुक वाटते. 
आजपर्यंत मी कुटुंबाबरोबर छोट्या मोठ्या सहली केल्या होत्या. तेव्हा रस्त्यात पक्षी दिसला की गाडी थांबवून फोटो काढत असू. परंतु birding साठी trip म्हणजे काय असतं हे वेगळेपण या ग्रुपसोबत गेल्यावर कळले. 
डिसेंबर २०२२ शेफाली, मंजिरीताई यांच्या सोबत 'ग्रेटर रण ऑफ कच्छ' ला जाण्याचा योग आला. 'भुज'च्या 'भरत कापडी' यांच्या होम स्टेला मुक्काम होता. पहाटे उठून २-२।। तासाचा प्रवास करून इच्छित स्थळी पोहोचत असू. सोबत भरतभाई सारखे माहितगार गाईड (naturalist) असायचे. त्यांना अचूक माहिती असते. कोणता पक्षी, कुठे आणि केव्हा पाहायला मिळतो. त्यामुळे पक्षी-निरीक्षण योग्य ट्रॅकवर सुरू असते. सकाळ संध्याकाळ दोन सत्रात पक्षी बघायला जाण्याची धावपळ थोडी त्रासदायक असली तरी सुखदायक ठरते. गवताळ प्रदेश, पाणथळ व समुद्र किनाऱ्यावरील पक्षी बघून किती समाधान मिळाले हे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. 
आपल्या शारीरिक व्याधींचा बागुलबुवा न करता काही वयस्कर मैत्रिणी पक्षी निरीक्षणाची आवड जोपासत आहेत.
नुकताच फेब्रुवारी २०२६ मध्ये या ग्रुपच्या प्रीती व पद्मा यांच्याबरोबर मला 'अंदमान व लिटल अंदमानला' ला जाण्याचा योग आला. प्रसिद्ध 'शक्ती' गाईडची निवड, त्याचं बुकिंग, प्रवासाचं नियोजन, विमानाचं बुकिंग सगळं त्यांनी बघितलं. आठ दिवसांच्या या सहलीनिमित्त झालेल्या सहवासातून एकमेकींची मने जुळली. ओळख परिचय झाला. गृहिणीपद सांभाळून करत असलेल्या प्रत्येकीच्या नोकरी-व्यवसायाची, त्या करत असलेल्या सामाजिक कार्याविषयीची माहिती कळल्यावर त्यांच्या विषयीचा स्नेह व आदर दुणावला. 
बर्डिंग, फोटोग्राफी व्यतिरिक्त एडिटिंग व eBird, Merlin अशा वेगवेगळ्या app ची भरपूर माहिती या सगळ्या मैत्रिणींना आहे. आधुनिक तंत्रज्ञानाशी असलेले त्यांचे सख्य नक्कीच प्रशंसनीय आहे. या तंत्रज्ञानाची ओळख इतर मैत्रीणींनाही त्या करून देत आहेत.
तसं पाहिलं तर त्या सगळ्यांच्या कॅमेऱ्यापुढे माझा कॅमेरा अगदी प्राथमिक स्वरूपाचा आहे. तरी त्या माझ्या फोटोंची वाहवा करतात. माझ्या पक्ष्यांवरील कवितांना उत्स्फूर्त दाद देतात. माझे 'प प पक्षी' पुस्तक आपल्या आप्त-मित्रांना भेट देतात. यामुळे माझ्यातला आत्मविश्वास द्विगुणित झाला व मी लवकरच त्या ग्रुपमध्ये खऱ्या अर्थाने रुळले. 
पहिल्या प्रदर्शनात माझा सहभाग नव्हता. परंतु आता 2026 मधल्या 'इलाक्षी 2.0' प्रदर्शनात माझ्या चार फोटोंची निवड झाली व माझा उत्साह वाढला. या प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस आहे. काल- परवाची कलाग्राही पुणेकरांची लोटलेली अमाप गर्दी बघता हा स्त्री-शक्तीचा यथोचित सन्मानच आहे. या प्रदर्शनात 63 महिला सहभागी झाल्या आहेत. त्यात विविध पक्ष्यांच्या प्रजाती व काही दुर्मिळ प्रजातींचा समावेश आहे.
'इलाक्षी 2.0' म्हणजे केवळ पक्षी – प्राणी यांचे प्रदर्शन नसून महिलांचे निसर्गप्रेम, त्यांची कलात्मक दृष्टी, त्यांचे धाडस, त्यांचा संयम, त्यांची चिकाटी याचबरोबर पुढच्या पिढीच्या मनात निसर्गाविषयी जागरूकता रुजवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. म्हणूनच 'Pune Ladies Birders' या ग्रुपला मानाचा सलाम करणे योग्य ठरते. त्याचबरोबर हा ग्रुप तयार करणाऱ्या 'प्रीती'वरची प्रीत कायम ठेवणे ओघाने आलेच.

लेखक

  • वंदना लोखंडे

    मूळ गाव धुळे. इलेक्ट्रॉनिक्स विषयात पदवीधर. लिखाणाची आवड.

    प्रकाशित साहित्य :

    * आतापर्यंत ९ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
    * त्यापैकी 'किलबिल', 'प प पक्षी', 'ओवी कुठे चालली शॉपिंगला', 'ओवी कुठे चालली डे केअरला', हे बालकविता संग्रह
    * स्मृतिपाखरे हा ललितलेखसंग्रह
    * हिंदोळा यात लग्न, डोहाळजेवण व बारसे याप्रसंगाची स्त्री गीते
    * गीत संजीवन, मंजिरी हा भक्तिगीतसंग्रह व 'सप्तरंगी उखाणे' 'प प पक्षी' यातून अक्षरओळख व चारोळीतून छायाचित्रासहित पक्ष्यांचीओळख अशी अनोखी संकल्पना आहे.

    वंदनलिपी- या ब्लॉगवर ललितलेखन.

    काव्यसूर- या यु-ट्युब चॅनलवर लहान मुलांसाठी संगीतबद्ध गाणी चित्रफितीतून सादर केली जातात.

Post navigation

Previous: चिऊताई,चिऊताई दार उघड
Next: अनिश्चितता सांगणारा कॅसिनो!!
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

WhatsApp-Image-2026-04-13-at-20.11.49.jpeg
  • ललित

सगळ्याच गोष्टींची विपुलता

वर्षा पतके थोटे एप्रिल 13, 2026 0
IMG-20260412-WA0052.jpg
  • ललित

स्वर स्वामिनी आशा!!

हेमंत नाईक एप्रिल 13, 2026 0
WhatsApp-Image-2026-04-07-at-06.43.24.jpeg
  • ललित

नकार देणं इतकं कठीण का वाटतं?

वर्षा पतके थोटे एप्रिल 7, 2026 0

ताजे लेख

  • सगळ्याच गोष्टींची विपुलता
  • स्वर स्वामिनी आशा!!
  • नकार देणं इतकं कठीण का वाटतं?
  • “विसरणं एक दैवी वरदान!!!”
  • सुरपाखरू(मानसिकता)जून २०२६

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

WhatsApp-Image-2026-04-13-at-20.11.49.jpeg
  • ललित

सगळ्याच गोष्टींची विपुलता

वर्षा पतके थोटे एप्रिल 13, 2026 0
IMG-20260412-WA0052.jpg
  • ललित

स्वर स्वामिनी आशा!!

हेमंत नाईक एप्रिल 13, 2026 0
WhatsApp-Image-2026-04-07-at-06.43.24.jpeg
  • ललित

नकार देणं इतकं कठीण का वाटतं?

वर्षा पतके थोटे एप्रिल 7, 2026 0
Screenshot_20260406_113022_WhatsApp.jpg
  • ललित

“विसरणं एक दैवी वरदान!!!”

हेमंत नाईक एप्रिल 5, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.