Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

उतार

मेघा देशपांडे जुलै 8, 2026 1 minute read
0
gumohor-water
उतार

मंडळी आपापल्या गावाला जायला निघाली. प्रवासाचे डबे भरून झाले. जेवणाच्या पंगती झाल्या. तहान लाडू भूक लाडू, जमेल तेवढा आनंद, अनावधानाने सापडलेल्या आठवणींचा कडू गोड पणा भरून बॅगा सज्ज झाल्या. ठेवणीतले कपडे आणि हसू, काही नीट घड्या करून तर काही चुरगळत कोंबून, सगळे बऱ्यापैकी रोजच्या, वास्तवाच्या पेहरावात आले. गणेशाला आणि मला सगळ्यांचीच आणि सगळ्याची गंमत वाटत होती.

कार्यालयात हास्याचे फवारे उडवत एकमेकांना टाळ्या देणारे, गळ्यात गळे घालुन लहानपणीच्या कॉमन आठवणी काढून मशगूल झालेले भाऊकाका, अण्णाकाका, सीमावहिनी, मोहिनी आत्या, लताकाकू खऱ्या कि जाताजाता अचानक गप्प झालेली, आपापल्या वाट्याचा हिशेब करणारी , काहीशी आतुन दुर्मुखलेली बहीण भावंडं खरी.. नवल वाटत होतं.

एकदा वाटलं अप्पांना सुद्धा त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी विल वाचून दाखवायची काय गरज होती काय माहीत. रात्री जेव्हा गाण्यांचा कार्यक्रम सुरु झाला तेव्हा पर्यंत सगळी मंडळी अगदी मजेत होती. दीपा काकू ने सुखदा वहिनीला तिची पावलं दुखत होती म्हणून गरम पाणी आणुन दिलं. स्वतःकडचं मूव्ह काढून दिलं. जयंत अण्णाकाकाच्या अल्मोस्ट मांडीवरच बसायचा बाकी होता. तसंही जयंताच्या इव्हेंट मॅनेजमेंट फिल्ड च्या निवडीचं कौतुक फक्त अण्णाकाकाने केलं होतं. राजेश भाऊकाकाच्या डोक्याला तेलमालीश देत बसला होता. लताकाकू सीमावहिनी आणि मोहिनी आत्या कॉफी करायला स्वैपाकघरात गेलेल्या. आणि अचानक अप्पांनी घोषणा केली. ” कॉफीचा गॅस बंद करा. तो चिवडा चकली शेव आपण नंतर कॉफी बरोबर खाऊ. आत्ता आधी सगळे हॉल मध्ये या.” ' आता हे काय नवीन..' म्हणत प्रत्येक जण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त ठोकताळे बांधू लागला.' ' आज काही चुकलं का .. कुणाला बोलावायचं तर राहुन गेलं नाही ना ..एक ना दोन .. ' राजेश गणेशनी ही जरा आठवुन पाहिलं.

आणि अप्पांनी सांगायला सुरुवात केली. ” तुम्ही सगळे चांगले रहालच. पण काही गोष्टी वेळेच्या आधी केलेल्या जास्त बरं. .. ” अशी प्रस्तावना करत अप्पांनी त्यांचं विल वाचुन दाखवलं. मोहिनी आत्या, बाबा, भाऊ काका,अण्णा काकांसाठी गावातली शेती. आणि पुढच्या पिढीतल्या राजेश, गणेश, सौरभ, रेवा, सई, अंजनी, जयंत, मी आणि कमाल म्हणजे सुखदा आणि राधिका वहिनीसाठी त्यांच्या एफडी आणि बाबांना हे रहातं घर ज्यात अप्पा आणि आजी आणि आम्ही गेले कित्येक वर्ष रहातोय ते घर अशी सुटसुटीत विभागणी अप्पांनी केली होती. सोबत “आजी तिच्या दागिन्यांचं जे काही ठरवायचं ते ठरवेल.” हे ही अप्पांनी सांगितलं.

आम्ही मुलं तर अप्पांचे आणखीन फॅन झालो. 'इतके प्रॅक्टिकल आपले आई बाबा का नसावेत.' मला तर वाटुन गेलंच.

नंतर आणलेली कॉफी पिताना पाहिजे तशी मजा आली नाही. गाणी तर बंदच झाली. चिवडा चकली ही कोणी खायला तयार होईनात. दुपारी उशिरा जेवणं झाली ना, आता उशीर झाला, उद्या खाऊ म्हणत सगळे जण अकरा साडेअकरालाच झोपायला पळाले.

मग काय काही वेळ आम्ही सगळे बसलो बदाम सत्ती खेळत, नंतर डम शराज खेळत आणि आमच्या आरडाओरड्याचा या काका लोकांना त्रास झाल्यावर मग आपापल्या मोबाईलमध्ये आणि उशिरा कधीतरी झोपलो स्वैपाकघरात.

आज आता निघायची वेळ झालीय आणि सगळे एकदम वेगळेच दिसायला लागलेत. ' गॉड हे लोकं तेच आहेत का !' वाटावं इतके. इतक्यात राधा वहिनीने आंब्याच्या झाडाकडे बघत म्हंटलं “अरे मिहीर उमा अरे किती कैऱ्या लागल्यात बघा, जरा काढून द्या रे.. घरी घेऊन जाईन.”

झालं. कैऱ्यांचं नाव घेताच. सगळ्या काकूज आणि आत्याज आणि वहिन्या बाहेर आल्या. आकड्याने भरपूर कैऱ्या उतरवल्या गेल्या. प्रत्येकीला वर्तमानपत्रात गुंडाळुन दहा पंधरा कैऱ्या बाबांनी बांधुन दिल्या. राधा वहिनीने तिचा हुकमी लाडिकपणा करून दोन पुड्या बांधुन घेतल्या. त्याच वेळी प्रतिभामामी मंडळींना बाय करायला घरी आल्या. त्यांना कोणीतरी विचारलं, ” काय मामी तुम्ही नेताय का कैऱ्या ?” ' वा वा .. नेकी और पूछ पूछ ..' म्हणत प्रतिभा मामींनीही हात पुढे केला. कदाचित काहीशा नाईलाजानं आण्णाकाकांनी त्यांनाही कैऱ्या दिल्या. प्रतिभामामी कैऱ्यांची वर्तमानपत्राची पुडी झोपाळ्यावर ठेवुन, आतुन स्वैपाकघरातुन पिशवी आणायला गेल्या. तेवढ्यात लताकाकू ने राधावहिनीला खुणेनेच काहीतरी सांगितलं आणि राधा वाहिनीने चंटपणे ती तिसरी पुडीही आपल्या खाऊच्या बॅगेत टाकली. प्रभामामी हातात पिशवी घेत ' अगं इथेच तर ठेवल्या होत्या.' म्हणत कैऱ्या शोधू लागल्या. आणि अगदी सहज त्यांनी जवळ असलेल्या बॅग मध्ये वरची पुडी पाहिली. राधा वहिनी लगबगीने आणि त्याच लाडिकपणाने, ” अय्या ही तुमची पुडी होती होय' म्हणत मामींना कैऱ्यांची पुडी दिली. वाहिनी आणि काकूने एकमेकांकडे बघत डोळे मिचकावले. मामीही कसंनुसं हसल्या. म्हणाल्या, ' घेऊन जा तुम्ही. हल्ली लोणचं काही जास्त खपत नाही.' कधीकधी जवळचे लांबचे असण्याचा अर्थ पटकन लागून जातो आणि कायमचा.

आता बॅगा, माणसं, सोबतच्या कैऱ्यांसकट उबरची वाट बघू लागले. टॅक्स्या आल्या, मंडळी बसून स्टेशन बस स्टॉप वर रवाना झाली.

सिंधूमावशी भांडी घासायला आल्या. मामींनी सिंधू मावशीला कैऱ्यांची पुडी दिली. ' वयनी आज उतार केला वाटतं.' सिंधूमावशीने आईला विचारलं. आई मामी हसल्या फक्त.

कैऱ्या उतरल्या होत्या. थोडी माणसंही.

– मेघा देशपांडे

लेखक

  • मेघा देशपांडे

Post navigation

Previous:    ||प्रायव्हसी||
Next: विदुर मैत्रेय संवाद् (भाग पहिला)
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.