कधी काही वाटतं जे मनात, कागदावर किंवा आजकाल नोटपॅडवर नोंदलं जातं, कुणासाठी म्हणून नसतं ते, असलं तर ते स्वांत सुखाय…
दोन लेख, चार कविता वाचल्या व्हाट्स एपवर, फेसबुकवर. मनाला भावलं ते त्या रचनाकारांना शब्दरूपात कळवल; बरं वाटतं, जगाशी असं जोडून राहण्यात…
… का कुणास ठाऊक, अगोदर कधी काही नोंदवलेलं मनात उगाच वर आलं आणि मग 'सुरपाखरू'तील साथीदारांबरोबर ते सामायिक करावसं वाटलं.
पहा, आवडतं का आपल्याला, समूह-स्वकीयांनो!
_______________
डोंबा-याचा खेळ”
जेव्हा जेव्हा मी लिहायचा प्रयत्न करीत असतो तेव्हा तेव्हा जाणवत की, डोंबा-याचा खेळ करतोय लेखनाच्या दोरीवर मी.
एक दोन शब्द लिहितो आणि भाषा शुद्धतेची जाण होते, दोन शब्द मागे जातो.
तसं, एकदा पुढे टाकलेलं पाऊल मागे न घेण्याचा स्व-मान बाळगणा-या मला, हे माझा अभिमान ठेचाळल्या सारखं होतं. मग आठवत ते शाळेतले व्याकरण आणि शुध्दलेखन आणि मास्तरांनी पाठीत घातलेले धपाटे आणि माझा स्व-मान गळून पडतो वाटतो.
आता मी चार शब्द पुढे जातो आणि अर्थ शोधतो लिहलंय त्यात, परत दोन शब्द मागे. पुढच्या चार शब्दांनंतर उद्भवतो संभ्रम, शोधतो कार्य-कारण-भाव लिखाणाचा; परत दोन शब्द मागे. परत गवसतो विचारझोत पुढच्या चार शब्दासाठी.
मध्येच लक्ष जातं भोवती, बघणा-यांना खेळ माझा आवडतो की नाही? वाजवतील ते चार टाळ्या की, नाही?
मी आपला तोल सावरत, असं पुढं मागे करत, एक एक ओळ पूर्ण करीत असतो! छान हा डोंब-यांचा खेळ! वेगळाच आनंद!
असाच खेळ कदाचित जीवनाच्या दोरीवर खेळत असतो, की दोन पावलं पुढे, दोन पावलं मागे आणि तोल सांभाळत पोहचत असतो, एका टप्प्यापासून दुस-या टप्प्यापर्यंत. कधी टाळ्या, कधी शिव्या छाप, कदाचित!
_________________
आत्मचरित्र
आत्मचरित्र कादंबरीच्या रूपात लिहावं, असा विचार मनात बरेच दिवस घोळत होता. एवढं वाचायला कुणाला वेळ आहे, अशी शंका मनात डोकावली. कादंबरीपेक्षा एखादी कथा किंवा लघुकथा लिहिलेली बरी. त्या पेक्षा महाकाव्य किंवा वीस ओळींची कविता? अशा संभ्रमात एक अक्षरही पुढे सरकत नव्हतं. आयुष्य मात्र रोजच एक एक पावलानं पुढे जात होतंच.
एक भन्नाट कल्पना डोकावली. विरामचिन्हांचा बोलका उपयोग करून छान आत्मचरित्र होईल की तयार!
आणि “त्यानं” लगेच एक सर्वनाम “मी” लिहून त्यापुढं टाकलं प्रश्नचिन्ह, आणि झालं तयार आत्मचरित्र!
“मी ?
________________
नोंद कधी जाणून बुजून करीत असतो आपण, कधी आपोआप होत असते.
मनाला रुचलेलं, कधी न रुचलेलं मनात साचत जातं. चिमणीनं आणलेल्या काडी सारखं, या काड्या आपल्या न कळत आपण एकत्र असतो, घरटं बनत त्यातून, घर मोठ होत जातं, मजल्यावर मजले चढत जातात.
…त्याची कधीतरी मग आपल्याला जाणीव होते. नंतर कदाचित आपण कुणाला आमंत्रण देतो, “या आमच्या घरी”
नोंदींचं हे असंच होत असतं.
_____________________
२४ जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#प्रयोग२०२६
#जुलै२०२६