जानेवारी २०२६ प्रमाणे जुलै २०२६ ला आमच्या #सुरपाखरु कुटुंबाचा लेखन #उपक्रम काल पूर्ण झाला. यावर्षी च्या पहिल्या उपक्रमात मी फेसबुकवर सुद्धा लेख पोस्ट केलेले होते. मात्र जुलै मधे असे करायचे नाही हे ठरवले. त्याकरता काही विशेष कारण होते असे नाही. सुरपाखरू फोरम, संकेतस्थळ (वेबसाईट) आणि आमच्या उपक्रमाच्या व्हॉट्स अप समूहावर ते पोस्ट करायचे ठरवले होते.
गेल्या काही महिन्यांमधे सुरपाखरु मुळे आणि सुरपाखरु चे संयोजक तुषार जोशी दादा यांच्यामुळे लिखाणाची पुन्हा सवय लागली.
ती सवय कुठेतरी तुटत चालली होती किंवा अधून मधून कधी लिहिले तरी त्यात फार काही समाधान वगैरे वाटत नव्हते.
असेच अधून मधुन लिहिणारा, त्यात मोठा खंड असणारा मी पुन्हा सलग महिनाभर विविध विषयांवर लिहू शकलो याचा आनंद आणि समाधान आहे. सोबत लिहिणारे ५० पेक्षा जास्त जण असल्याने हे समाधान तर आणखी जास्त आहे.
लिखाणाचे हे कार्य करत असताना तुला यातून किती अर्थप्राप्ती होते हे प्रश्न विचारणारे वेगळेच होते. खरं सांगायचे तर याचे उत्तर देणे मला टाळायला आवडते. कारण गेल्या काही वर्षांत लिखाण, ब्लॉग या विषयांवर ज्या ज्या लोकांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्यातील ९९ टक्के लोकांनी याबाबतीत माझ्याशी समर्थनीय असे काही बोलले नाही. जे १ टक्का आहेत ते खरे प्रेरणादायी ठरले. तरी कुठेतरी लिखाणात निरंतरता न ठेवणे, त्यात मोठा खंड पडणे अथवा अधून मधूनच लिहिणे हे चालूच राहिले.
या उपक्रमामधील बऱ्याच लेखकांची विशेषतः म्हणजे, इथे सर्व लेखक काही हाडाचे लेखक असतात असे नाही. कधी काळी लिखाण करत असलेले पण ते आता सुरू नसलेले सुद्धा इथे आहेत तर पहिल्यांदा लिखाण करणारे सुद्धा आहेत. सर्वजण साहित्यिक भाषेतच लिहिणारे आहेत असेही नाही आणि सर्वजण वैचारिक आहेत असेही नाही. फक्त २५० शब्दांत एखादा विषय घेऊन लेख लिहायचा एवढेच.