अनेक दिवसांनी रविवारी मी इतका झोपलो होतो.
खरं तर सकाळी सहा वाजता उठणारा प्राणी मी. पण त्या दिवशी नऊ-साडेनऊ वाजले तरी उठायची माझी अजिबात तयारी नव्हती.
शेवटी बायकोने जबरदस्तीने उठवलं.
“अरे, कमीत कमी चहा तरी पी!”
चहापूर्वी ब्रश करायचा, ही तिची खोड मला चांगलीच माहीत होती. रविवारी सकाळी-सकाळी वादाला सुरुवात नको म्हणून मी ब्रश करायला बाथरूममध्ये घुसलो.
नुकतीच पेस्ट लावली होती, तेवढ्यात फोन वाजला.
माझा फोन मी नेहमी सायलेंटवरच ठेवतो. फोनची रिंग मला फारशी आवडत नाही. पण काल चुकून कदाचित तो सायलेंटवर गेला नसावा.
रविवारी सकाळी फोन वाजला की माझं डोकंच सरकतं.
म्हणून मी फोनकडे दुर्लक्ष केलं आणि ब्रश करायला सुरुवात केली.
तेवढ्यात बायकोचा आवाज आला—
“अरे, गुड्डूचा कॉल आहे!”
एखाद्याला हार्ट अटॅक यावा तसा मला एकदम झटका बसला.
गुड्डूचा फोन? एवढ्या सकाळी? आणि मी बाथरूममध्ये!
मी कसंबसं तिला सांगितलं—
“गुड्डूचा फोन उचलू नकोस! मी कॉलबॅक करतो.”
घाईघाईत ब्रश केला आणि बाहेर आलो.
गुड्डूचे फोन म्हणजे काही साधेसुधे फोन नव्हते. तो कोणत्या वेळेस काय बोलेल, काही भरवसा नव्हता. शिवाय त्याचे फोन बहुतेक संध्याकाळी उशिरा किंवा रात्रीचे असायचे. त्याचा फोन घरात स्पीकरवर ऐकणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणं.
म्हणून मी त्याला कॉलबॅक केला.
बायको चहा घेऊन समोर बसली होती.
मी फोनचा आवाज कमी केला आणि विचारलं—
“हा बोल रे, काय झालं?”
गुड्डू कधी नव्हे तो ऑब्जेक्टिव्ह प्रश्नासारखा एका वाक्यात बोलला—
“रविवारी नागपूरला नऊ वाजता गेट-टुगेदर.”
मी मनातच विचार केला—याला कसं टाळायचं?
गेट-टुगेदर म्हटलं की पुढे पार्टी आली. त्यांच्यासोबत बसणं आलं. मी घेत नसल्यामुळे सगळ्यांना घरी सोडण्याची जबाबदारी आली. दोन तासाचा ड्राइव्ह करून चार जणांना त्यांच्या घरी सोडून मग स्वतः घरी यायचं.
मी म्हणणारच होतो—
“अरे, माझं जमणार नाही…”
तेवढ्यात तो म्हणाला—
“यावेळी स्मिता काळे येत आहे….”
पुढे एक मोठ्ठा पॉज.
स्मिता काळे म्हणल्यानंतर माझी बोलतीच बंद झाली.
यात काही नवल नव्हतं.
शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना स्मिताशी मोजून चार शब्द बोललेला व्यक्ती म्हणजे मी.
ती आमच्या वर्गातली सगळ्यात उठून दिसणारी मुलगी होती. सुंदर, हुशार, कायम हसतमुख अगदी नावासारखी आणि आडनाव काळे जरी असलं तरी गोरीपान. उत्तम गायिका, उत्तम नर्तिका, वादविवादात नेहमी पुढे आणि अभ्यासातही पहिल्या नंबरमध्ये.
आमच्यासारख्या डांबराला लाजवेल अश्या रंगाच्या लोकांना बॅकग्राऊंडमध्ये ठेवून फोटो काढावा, अशी!
तिच्याशी बोलायची माझी काही हिंमतच व्हायची नाही.
त्या काळात मुलं-मुली मोकळेपणाने बोलणं हीच मोठी गोष्ट होती. त्यात स्मिताशी बोलणं म्हणजे माझ्यासाठी जवळजवळ अशक्यच.
ती मोकळेपणाने बोलायची. पण आमच्या तोंडून शब्द फुटायचे नाहीत.
तिच्या वडिलांना सगळे “कर्नल” म्हणायचे. ते खरंच मिलिटरीतले कर्नल होते की नाही, माहीत नाही. पण त्यांच्यासमोर उभं राहिल्यावर कोणाच्याही अंगातलं पाणी पळायचं.
स्मिता मात्र अगदी उलट.
नेहमी हसणारी. सगळ्यांशी मोकळेपणाने बोलणारी.
गुड्डू तर तिच्या घरीही जायचा. त्याचे आणि स्मिताचे संबंध अगदी तिसरी-चौथीत असल्यापासूनचे.
गुड्डू आमच्या ग्रुपमधला सगळ्यात बोलका आणि खोडकर. वर्गातल्या मुलींच्या घरी जाणं, चहा-पाणी करणं, गप्पा मारणं त्याच्यासाठी अगदी सहज होतं. तो कधी कोणाची फिरकी घेईल याचा भरवसा नव्हता.
आम्हाला आश्चर्य वाटायचं—
“हा कसा काय असं करू शकतो?”
पण तो त्याचा स्वभाव होता.
आमच्या ग्रुपमधला हर्षित मात्र वेगळाच.
हर्षित सोनाराचा मुलगा. त्याला स्मिता भयंकर आवडायची.
आम्ही त्याला चिडवायचो—
“हर्षा, तू मंगळसूत्र बनवूनच ठेव. कुणाच्या गळ्यात घालायचं हा नंतरचा प्रश्न!”
स्मिताबद्दलच्या आमच्या सगळ्या जुन्या आठवणी डोळ्यासमोरून झरझर गेल्या.
शाळेच्या स्नेहसंमेलनानंतरचा फोटो आठवला. आम्ही नेहमी शेवटच्या रांगेत आणि स्मिता पहिल्या रांगेत.
रात्रीचा फोटो असेल तर तिचा चेहरा लख्ख दिसायचा आणि आमच्या मागच्या रांगेतल्या लोकांचे फक्त दात!
कॉलेज संपल्यानंतर स्मिता कुठे गेली, काय करते, तिचं लग्न कुणाशी झालं—याची माहिती आम्हाला फारशी नव्हती.
ती आता कुठेतरी मोठ्या कंपनीत काम करते, काही सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होते, असं गुड्डू अधूनमधून सांगायचा.
तिचा फोन नंबरही त्याने आम्हाला कधी दिला नव्हता.
“तिला प्रायव्हसी आवडते,” तो म्हणायचा.
आम्हीही फार विचार केला नाही.
तशी ती आमच्या आयुष्यात येणारच नव्हती.
पण आता स्वतः गेट-टुगेदरला येणार होती.
मी बायकोकडे पाहिलं.
माझ्या चेहऱ्यावर काही भाव बदलले असावेत. तिने ते लगेच टिपले.
“काय झालं? गुड्डू काय म्हणतोय?”
“गेट-टुगेदर आहे.”
“पुन्हा?”
ती थोडी थांबली.
“जा. पण रात्री उशिरा गाडी चालवत येऊ नका.”
तिला माझ्या रात्रीच्या ड्रायव्हिंगची काळजी वाटायची.
मी गुड्डूला पुन्हा फोन केला.
“खरंच सगळे येणार आहेत?”
“बिलकुल. सगळे येणार. वहिनीशी बोलू का मी? टाक स्पीकरवर.”
मला स्पीकरवर फोन टाकायचा नव्हता. तो स्मिताबद्दल बोलेल याची मला उगाच भीती वाटत होती.
“ठीक आहे. मी येतो.”
बायकोला काही कळलं नाही, याचा मला थोडा आनंद झाला.
मी मार्केटिंग मध्ये जरी असलो तरी कपड्यांची निवड ही बायकोच करायची यावेळी तर तिने खास ठेवणीतले कपडे काढले की काय असं मला वाटलं.
मी आणि हर्षित माझ्या गाडीने निघालो. वाटेत अजून दोघांना घेतलं आणि नागपूरला पोहोचलो.
कार्यक्रम १० वाजता होता.
आम्ही ८ लाच पोहोचलो होतो!
दोन तास टाइमपास कसा करायचा हा प्रश्न होता.
नेहमी कारमध्ये आमच्या गप्पा रंगायच्या. पण यावेळेस मात्र जवळजवळ सगळेच शांत होते.
कारण एकच—
स्मिता.
सगळ्यांच्या डोक्यात जुन्या आठवणी होत्या.
आम्ही आमच्या नेहमीच्या ठिकाणी जाऊन पोहे-चहा घेतला. हळूहळू गप्पा सुरू झाल्या आणि वेळ कसा गेला, कळलंच नाही.
९ वाजता आम्ही गेट-टुगेदरच्या हॉटेलमध्ये पोहोचलो.
गुड्डू ने फक्त लोकेशन शेअर केले होते. आम्ही पोहोचलो तेव्हा तो आमच्या स्वागतासाठी तयारच होता.
हॉटेलचं नाव होतं—“सेकंड वाइफ.”
“स्मिता दहा वाजता येईल. तिची भेट घेऊ. मग कार्यक्रम सुरू करू.”
आम्ही तिची वाट पाहत बसलो.
दहा वाजले.
आणि बरोबर स्मिता आणि तिचा नवरा कारमधून उतरले.
जणू आम्ही तिच्या स्वागतासाठीच बाहेर उभे होतो.
तिने माझ्याकडे पाहिलं.
“हाय! इतक्या वर्षांनी भेटतोयस!”
मी फ्रीज!
कसंबसं तोंडातून निघालं—
“हाय.”
ती माझा हात हातात घेऊन बोलत होती. पण ती काय बोलत होती, याकडे माझं लक्षच नव्हतं.
माझ्यासमोर मात्र जुन्या आठवणी उभ्या होत्या.
लांब वेण्या. त्यात गुलाबाचं फूल.
पण आता तिचा बॉयकट होता.
जीन्स-टीशर्टमध्ये ती अगदी मॉडर्न दिसत होती. नवऱ्याचा मात्र अर्धचंद्र दिसत होता.
तिचा नवरा मोठ्या इंडस्ट्रीचा मालक. गुजरातमध्ये कंपनी. तीन मर्सिडीज.
ही सगळी माहिती अर्थातच गुड्डूची.
स्मिताही कंपनीत CEO होती आणि CSRच्या माध्यमातून सामाजिक काम करत होती.
पण एवढं सगळं असूनही आमच्याशी बोलताना तिच्यातला कॉलेजचा तोच मोकळेपणा होता.
हसणं, गप्पा, प्रत्येकाशी सहज बोलणं.
थोड्याच वेळात बाकीचे मित्र-मैत्रिणीही आले.
ओळखी झाल्या.
गप्पा सुरू झाल्या.
जेवण झालं.
आणि वेळ कसा गेला, कळलंच नाही.
स्मिता अजूनही तशीच सेंटर ऑफ अट्रॅक्शन होती.
प्रत्येकाला तिच्याशी बोलायचं होतं.
कार्यक्रम संपत आला.
तेवढ्यात तिच्या नवऱ्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला.
“जरा इकडे ये.”
मी त्याच्यासोबत बाजूला गेलो. मला कळेच ना की याला माझ्याशी काय बोलायच आहे.
तो काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला आणि म्हणाला—
“तुला एक गोष्ट सांगू?”
“ह”
“कदाचित माझ्या जागी तू असता.”
मला काहीच कळलं नाही.
“म्हणजे?”
तो हसला.
“स्मिताने मला सगळं सांगितलं.”
“काय?”
“तिला तू आवडायचास.”
त्या एका वाक्याने माझ्या डोक्यात काय झालं, हे मलाच कळलं नाही.
मनात कुठेतरी एकदम आनंदाची फुले उमलली. हृदय अगदी गीतांजलीच्या स्पीडने धावू लागलं. शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना स्मिता माझ्याशी बोलायची ते सगळं डोळ्यासमोरून सरकत चालल होत.
पण चेहऱ्यावर काही दाखवलं नाही.
तो अजून काहीतरी बोलत होता.
“तू तेव्हा प्रपोज केलं असतंस तर…”
पुढचं मला नीट ऐकूच आलं नाही.
मी फक्त त्याच्याकडे पाहत होतो.
म्हणजे… खरंच?
ज्या मुलीशी बोलायलाही माझी हिंमत होत नव्हती, तिला मी आवडत होतो?
पण लगेच माझ्या डोळ्यासमोर बायको आली.
म्हटलं—
“जाऊ दे. आपल्या नशिबात जे होतं ते झालं.”
आणि खरं सांगायचं तर, तिच्या नवऱ्याकडे पाहिल्यावर मला वाटलंही—
स्मिताला असाच माणूस शोभतो.
श्रीमंत, यशस्वी, आत्मविश्वासू.
कार्यक्रम संपला.
चारच्या सुमारास आम्ही बाहेर पडलो.
बाकीच्यांना आता संध्याकाळची पार्टी करायची होती.
मी त्यांना नेहमीच्या ठिकाणी घेऊन गेलो.
पण माझ्या डोक्यात मात्र एकच विचार होता—
“स्मिताला मी आवडत होतो…”
जुन्या आठवणी एकामागून एक येत होत्या.
ती माझ्याशी बोलायचा प्रयत्न करायची.
मी मात्र शब्द न सापडल्यासारखा उभा राहायचो.
एखादं स्वप्न बघणं आणि ते पूर्ण न होणं याचं दुःख असतंच.
पण आपण एखादं स्वप्न बघितलंच नाही आणि ते कदाचित पूर्ण होऊ शकलं असतं, याचं दुःख त्याहून मोठं असतं.
मला तेच बोचत होतं.
हॉटेलमध्ये पोहोचलो.
वेटरने नेहमीचे ग्लास आणून ठेवले. ऑर्डर साठी बराच वेळ वाट पाहिली नंतर स्वतःच त्यांचे नेहमीचे ब्रँड आणून ठेवले. कोणीच काही बोलत नव्हतं. चौघेही शांत होते.
अन् मीही.
काही वेळाने गुड्डूने एक काजू उचलला. आणि म्हणाला,
“हर्षित, मला वाटतं तू आता सांगून टाकायला काही हरकत नाही.”
हर्षित काही क्षण शांत राहिला.
मग म्हणाला—
“तुम्हाला माहितच आहे, मला स्मिता आवडायची. मी मंगळसूत्र बनवण्यापर्यंत तयारी ठेवली होती. पण प्रपोज करण्याची हिम्मत कधी झाली नाही.”
आम्ही त्याला समजावलं.
“अरे, इतक्या वर्षांनी कशाला तेच आठवतोयस?”
पण तो म्हणाला—
“नाही. मुद्दा तो नाही.”
तो थोडा थांबला.
“तिच्या नवऱ्याने मला सांगितलं की तिला मी आवडत होतो. मी प्रपोज केलं असतं तर कदाचित तिने हो म्हटलं असतं.”
क्षणभर सगळे शांत झाले.
मग दिलीप आणि राजेश एकमेकांकडे पाहून हसायला लागले.
हर्षित चिडला.
“काय झालं?”
दिलीप म्हणाला—
“तिच्या नवऱ्याने तुला हेच सांगितलं?”
“हो.”
राजेश हसत म्हणाला—
“अरे, त्याने तुला उल्लू बनवलं!”
हर्षितच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणात नाहीसा झाला.
“काय बोलताय?”
दिलीप म्हणाला—
“त्याने मला आणि राजेशलाही अगदी हेच सांगितलं.”
हर्षित काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिला.
आता सगळं स्पष्ट होत होतं.
तिघेही एकाच गोष्टीचे शिकार झाले होते.
आणि मी मात्र गप्प होतो.
कारण माझ्याबाबतीतही त्याने तेच केलं होतं.
मी काहीच बोललो नाही.
काही गोष्टी सांगितल्या तर त्या क्षणाची गंमत संपते.
म्हणून मी शांत बसलो.
थोड्या वेळाने आम्ही तिथून निघालो.
रात्री या तिघांना परत कारने आणताना मला नेहमी फार जिवावर यायच. नशेत त्यांची प्रचंड बडबड सुरू असायची.
पण आज मात्र मला ती बडबड ऐकायला फार मजा येत होती.
ते तिघेही स्मिताच्या नवऱ्याच्या नावाने खडे फोडत होते.
“काय माणूस आहे हा!”
“आपल्याला तिघांनाही उल्लू बनवून गेला!”
“आपल्याला चक्क उल्लू बनवून गेला!”
रस्ता पुढे सरकत होता.
मागच्या सीटवर स्मिताच्या नवऱ्याला शिव्या घालण्याचा कार्यक्रम सुरूच होता.
आणि मी?
मी काहीही न बोलता, फक्त हसत होतो.
#सुरपाखरु #३०दिवसात३० #प्रयोग