जिभेला हाड असावे
आमच्या लहानपणी “ जिभेला हाड नसते “ हा वाक्यप्रचार खुप वेळा ऐकायला मिळत असे. आमच्या बालपणीच्या त्या बोलण्याचे तसे पाहिले तर खुप कौतुक व्हायचे , पण हा वाक्यप्रचार कानी पडला की, आपण उगाचच जास्तीचे बोलत आहोत, ह्याचे ते सुचक असायचे आणि मग आम्ही आपल्या जिभेला थोडा विश्राम देत असू. ह्यासोबत कधी कधी समोरच्या व्यक्तीला थोडा राग आला तर , तो थोड्या उंच स्वरात “ उचलली जीभ आणि लावली टाळूला “ , असा एक वाक्यप्रचार वापरत असे, तेव्हा मात्र, आता आपण चुप बसायचे आहे, हा नियम होता. पुढे जेव्हा मी डॉक्टर झालो तेव्हा कळले की , बोलणे हे तर स्वरयंत्राचे काम आहे आणि छातीतील हवा वेगवेगळ्या प्रकारे त्यावरून जाते आणि आवाज निर्माण होतो. ह्या आवाजनिर्मितीत जीभ आपले काम आपल्या थोड्या वेगळ्या पद्धतीने करत असते . त्यातच जीभेला हाड नसते, ही एक विज्ञानिक वस्तुस्थिती सुद्धा आहे . पण त्यानंतर वैद्यकीय व्यवसायानिमित्त जेव्हा लोकांशी माझा संवाद सुरू झाला तेव्हा त्यांची गाऱ्हाणी ऐकून तर एकसारखे वाटायचे की, देवाने जर जिभेला हाड दिले असते तर , किती बरे झाले असते .
अगदी लहानपणी आपल्याला बोलायला शिकवले जात असते आणि एकदा आपण बोलायला शिकलो की , मग जन्मभर आपल्याला परिस्तिथी चुप बसायला शिकवित असते. एव्हाना “ मौनम सर्वार्थ साधनं “ ही विवेक बुद्धी यायला डोक्यावरच्या केसांना पांढरे व्हावे लागते .बरेचदा तर अगदी वयोवृद्ध असलेल्या लोकांमध्ये सुद्धा ह्या विवेक बुद्धीचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. आधीच्या पिढीतील लोकांमध्ये असलेला सुसंवाद आताच्या पिढीत बऱ्यापैकी कमी झालेला दिसतोआहे. त्याचे एक कारण आताची समाजमाध्यमे आहेत. एव्हाना आताची ही समाज माध्यमे इतकी चिवचिव करत असतात की , खरे कोण आणि खोटे कोण , हेच समजत नाही,कारण दोन्ही पक्ष आपापला विषय एकसारख्याच त्वेषाने व्यक्त करत असतात. रोज नवनवीन विषय घेऊन अगदी वीट येईपर्यंत वादविवाद करीत आणि तेच ते वारंवार बोलत ही माध्यमे आपले मनोरंजन करत असतात.तेव्हा तर राहून राहून वाटते की , त्यांच्या जीभेला हाड असते तर खरेच ह्यातुन आपला जीव सुटला असता,असो.
आपल्या भारतीय घटनेने आपल्याला दिलेले व्यक्ती स्वातंत्र आणि सोबत दिलेले बोलण्याचे स्वातंत्र्य घटनाकर्त्यांनी काय विचार करुन दिले असेल , ह्यावरच आता आपण सर्वांनी विचार केला पाहिजे , असे मला वाटते. आपल्या समाजाकडुन ह्या स्वातंत्रासोबत काही जबाबदारीही अपेक्षित होती , हे आपण हेतुपुरस्सरपणे विसरलो आहोत , हे पदोपदी जाणवते. समाज माध्यमांवर तर सतत बोलण्याच्या नादात , आपण काय काय बोलत आहोत , हे बोलणारे पाच दहा मिनिटानंतर पुर्णपणे विसरुन गेलेले असतात आणि मग विवेकशून्य एकतर्फी संभाषण सुरु करतात. त्याचे हे संभाषण जेव्हा संपते तेव्हा एकतर आपला मेंदू पूर्णपणे सुन्न झालेला असतो किंवा त्यानंतरच्या प्रश्न वा उपप्रश्नावरील चर्चा ऐकण्याची आपल्यात शक्ती नसते . सुन्न पडलेला तो मेंदू घेऊन आपण जेव्हा ते माध्यम बंद करतो, तेव्हा इतकेच वाटत असते की त्यांच्या जिभेला हाड असते तर किती बरे झाले असते.
आपल्या जगाच्या इतिहासात , अगदी रामायण आणि महाभारत काळापासून आजपर्यंत , झालेले अनेक वाद वा युद्धे , का झाली असावीत , असा विचार केला तर , कोणाचे तरी बोलणे त्याला कारणीभुत असल्याचे दिसते. पण ते वाद टाळायचे असतील किंवा सुरू असलेली ती युद्धे थांबवायची असतील तर , योग्य ती बोलणी करून थांबवली पाहिजेत , ह्यावर मात्र सर्वांचे एकमत दिसते. म्हणजे जे बोलणे ह्या युद्धांचे किंवा वादाचे कारण असते तेच बोलणे त्यावर उपाय असतो, किती परस्पर विरोधी आहे ना ! . अगदी जगाचे सोडले तरीही , आपल्या व्यक्तिगत जीवनात सुद्धा हीच परिस्थिती असते, आपलेच बोलणे आपल्याच जीवनातील अनेक वादांच्या वा संकटाच्या मुळाशी कारण असते आणि बरेच वेळा आपण चुप असणे , हाच त्यावर एकमेव उपाय असतो . हा सोपा उपाय सहज शक्य असतो, पण आपल्यातील अहम आणि सारासार विवेक बुद्धीच्या अभावामुळे तो आपल्या वागण्यात दिसत नाही. आपल्या दैनंदिन जीवनात जर आपल्याला आपल्याच बोलण्यामुळे होणारा पश्चाताप नको असेल तर , आपण आपल्या जिभेला एक सारासार विवेकबुद्धीचे हाड लावून घ्यावे, असे मला वाटते.