हे समुपदेशनाचं काम करत असताना इतके विचित्र अनुभव येतात की सांगणाऱ्याची अन ऐकणाऱ्याच्या पण हसून हसून मुरकुंडी वळते. अगदी क्लिष्ट तांत्रिक बाबी सांगत बसत नाही पण काही किस्से सांगायची खरंच इच्छा आहे. ही माणसं तुम्हां आम्हा लोकांच्या अगदी आजुबाजुलाच असतात. जरा लक्षपूर्वक पाहिलं की लगेच ओळखू येतात. बघा तुम्हाला पण सापडातीलच.
प्लेस ऑफ बर्थ
ऍडमिशन करता अनिवार्य असलेला एक document म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट (रहिवासी दाखला.) ह्यात उमेदवाराच्या जन्म तिथी, जन्मस्थळ आणि राष्ट्रीयत्वाचा उल्लेख असतो. ते नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला बघतो. त्यात पण सहसा ह्याच सर्व गोष्टीचा उल्लेख केलेला असतो. म्हणजेच डोमिसाईल प्रमाणपत्र नसेल तर स्कूल लिविंग (सगळ्या गोष्टी मुद्रित असलेलं) चालतं
त्या दिवशी माझ्याकडे एक विद्यार्थी आला. म्हणाला माझ्या कडे डोमिसाईल नाही. मी म्हणालो स्कूल लिविंग सर्टिफिकेट काढ, आणि सांग…. जन्मतारीख ? त्यांनी सांगितली. राष्ट्रीयत्व लिहिलेले आहे का? तो हो म्हणाला. मी विचारलं, जन्म कुठे झाला? शांतपणे तो म्हणाला, मॅटर्निटी वॉर्ड, सिविल हॉस्पिटल. मला अपेक्षित उत्तर जन्म झालेल्या जिल्ह्याचं नाव होतं…..
पहिले मला कळलंच नाही. नंतर जेव्हा त्याचा चेहेरा पहिला, तो कोरा चेहेरा पाहून जास्त हसू आलं ….. तेव्हा पासून कोणीही प्लेस ऑफ बर्थ विचारलं की हसायला येतं.
नंबर ऑफ सिबलिंग्स
ऍडमिशन फॉर्म मध्ये आपली वैयक्तिक माहिती भरताना अनेक गोष्टी लिहाव्या लागतात. नवीन वातावरण, मोठं कॉलेज, गर्दी आणि आपण चुकू नये ही भीती यामुळे नकळत अनेक गोंधळ उडतात. म्हणून आम्ही ऍडमिशन करताना फॉर्म कसा भरावा हे प्रत्येकाला नीट समजावून सांगतो. आता प्रत्येक गोष्ट उलगडून सांगणं हे वेळेअभावी अशक्य असतं म्हणून काही गोष्टी ह्या विद्यार्थ्याला माहिती आहेत हे अध्यारूत धरून सांगतो. उदाहरणार्थ, नाव, वडिलांचा, आईचं नाव, फोने नंबर, पत्ता, वगैरे वगैरे….
एका मुलाने फॉर्म भरून आणला. तो पाहून अगोदर प्रश्न, नंतर हसू आलं ….. त्या फॉर्म मध्ये विचारलं होतं “number of siblings”. समोरच्या रिकाम्या जागेत त्यांनी १० आकडी नंबर लिहिला होता. शक्यतो मी माझा चेहेरा कोरा ठेवून विचारलं, “हे काय लिहिलंय? ” तो तितक्याच शांतपणे म्हणाला, “तेच तर विचारलाय नं? बहिणीचा नंबर? काही चुकलं का?”
आता नंबर ऑफ सिबलिंग्स (किती भावंडं आहेत) ह्या प्रश्नाला तो भावंडांचा (फोन) नंबर समजतोय. आणि हे किती विनोदी आहे हे त्यालाच कळत नाहीये हे पाहून आम्ही अजून खो खो हसत सुटलो होतो.